Showing posts with label Sanskrit language. Show all posts
Showing posts with label Sanskrit language. Show all posts

Friday, December 22, 2017

संस्कृत सुभाषिते - ९ (घर की मुर्गी ....)

"अतीपरिचयाद्वज्ञा, संतत गमनादनादरो भवती
मलये भिल्ल पुरंध्री, चंदनतरूकाष्ठमिंधनम कुरूते"

अती परिचयामुळे अनादर आणि उपेक्षा होते. (नेहेमीच्या व निकट परिचयामुळे समोरच्या माणसाला गृहीत धरले गेल्यामुळे तर असे होत नसेल ?)
नेहेमी नेहेमी गेल्याने अनादर होतो. (शाळा आणि नोकरीधंद्याच्या ठिकाणी मात्र नेहेमी जाणे आवश्यकच आहे,)
याच उदाहरण म्हणजे मलय पर्वतावरच्या (ज्या ठिकाणी खूप चंदनाची झाडे आजुबाजूला आहेत, त्यांचा निकट परिचय आहे त्याठिकाणच्या) भिल्ल महिला चंदनतरूंचा वापर सरपण, इंधन म्हणून करतात.

आपण उर्दूतला "घरकी मुर्गी दाल बराबर" वाक्प्रचार नेहेमी वापरतो पण त्याआधी कित्येक वर्षे आपल्याच संस्कृत भाषेतले हे याच अर्थाचे सुभाषित आपल्याला आठवतही नाही म्हणजे आपण संस्कृत भाषेला "घरकी मुर्गी..." चीच वागणूक देतोय. खरे ना ?

Monday, August 7, 2017

संस्कृत सुभाषिते - ८

संस्कृत सुभाषितांमधल्या अर्थांतरन्यासाचे आणखी एक उदाहरण आपण बघूयात. आपले संस्कृत सुभाषितकार फ़ार पुराणे असले तरी पुराणमतवादी वगैरे नव्हते बर का ! खुद्द प्रभू रामचंद्रांनाही वेळप्रसंगी खडे बोल सुनावण्याची त्यांची तयारी होती हे खालील सुभाषितावरून कळून येईल.

" न भूतपूर्वो नच केन दृष्टो, हेम्नःकुरंगो न कदापि वार्ताः
तथापि तृष्णा रघुनंदनस्य, विनाशकाले विपरीत बुद्धी: "

यापूर्वी कधी झाला नाही, कुणी पाहिला नाही, सुवर्णमृगाविषयी कुणी बोलले्पण नाही तरीही प्रभू रामचंद्रांना त्याची आस लागावी ना ? अरेरे "विनाशकाले विपरीत बुद्धी" हेच खरे. यातले "विनाशकाले विपरीत बुद्धी" हे तर आपण ब-याचदा वापरून चुकलेलो आहोत. त्यामागील सुभाषित हे असे आहे.

Tuesday, July 11, 2017

संस्कृत सुभाषिते - ७

संस्कृत सुभाषितांमध्ये अन्योक्ति, चमत्कृति, अर्थान्तरन्यास, नीती असे अनेक प्रकार आढळतात. प्रत्येक प्रकाराचे एक छान असे वैशिष्ट्य आहे. आता अर्थान्तरन्यासाचेच उदाहरण घ्या ना. आपण सर्व आपापल्या लिखाणात, व्याख्यानांमध्ये गेला बाजार शालेय निबंधांमध्ये यातल्या एका चरणाचा वापर नक्की केलाय पण त्या चरणामागचे संपूर्ण सुभाषित जर आपल्याला कळले तर त्या सुभाषित्कर्त्याबद्दल आणि आपल्या शहाण्या पूर्वजाबद्द्ल आदर द्विगुणीतच काय पण शतगुणीत होतो.

आता हेच बघाना "अती सर्वत्र वर्ज्ययेत" या चरणाचा वापर आपण बराच केला असेल. पण त्यामागील तीन चरण आपणापैकी फ़क्त संस्कृतच्या अभ्यासकांनाच माहिती असतील.

" अतिदानाद बलिर्बद्धो ह्यतिमानात सुयोधनः
विनष्टो रावणो लौल्याद, अती सर्वत्र वर्ज्ययेत."

{अती दान केल्याने बळीराजा बांधला गेला. तरी शुक्राचार्यांनी सांगितले होते की आता बास. हा बटू वामन तुझा शत्रू आहे पण बळीराजा दान देण्याचे थांबला नाही. अती मानामुळे (अहंकारामुळे) दुर्योधनाचा नाश झाला. युधिष्ठीराप्रमाणे महाभारतकारही या ज्येष्ठ कौरवालाही त्याच्या ख-या नावानेच नेहेमी हाक मारतात. त्याचे खरे नाव सुयोधन. त्याच्या कृत्यांमुळे बिचारा "दुर्योधन" या नावास प्राप्त झाला. अती कामवासनेमुळे रावणाचा नाश झाला. तस्मात "अती सर्वत्र वर्ज्ययेत", अती करू नये अशी शिकवण या सुभाषितातून आपल्याला मिळालेली आहे. }

हे अर्थान्तरन्यासाचे एक उदाहरण. इतरही उदाहरणे म्हणजे "वचने किं दरिद्रता ?", "देवो दुर्बल घातक:" , योजकस्तत्र दुर्लभः",  "सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते". 

या सर्व अर्थान्तरन्यासांचे संपूर्ण सुभाषित काय आहे याचा शोध लागतोय का बघा. नाहीतर इथे थोड्या प्रतीक्षेनंतर मी लिहीतोच आहे.

Saturday, March 5, 2016

आत्मनो मुख दोषेण..... : संस्कृत सुभाषिते - ६

वाचा : संस्कृत सुभाषिते - १
          संस्कृत सुभाषिते - २
          संस्कृत सुभाषिते -३  
          संस्कृत सुभाषिते - ४
          संस्कृत सुभाषिते - ५


                                                  " आत्मनो मुख दोषेण, बध्यन्ते शुक सारिकाः
                                                     बकास्तत्र न बध्यन्ते, मौनं सर्वार्थ साधनम "


अर्थ : आपल्या मुख दोषांमुळे (गोड गळ्यामुळे) पोपटाला आणि कोकिळेला बंधनांमध्ये (पिंज-यात) रहावे लागते. (कोकिळ पक्षी हल्ली कुणी पाळत नसले तरी पूर्वी पाळत असावेत.) पण बगळा मात्र त्याच्या मौनसाधनेमुळे बंधनात अडकत नाही. तस्मात मौन हे सर्व गोष्टी साधून देणारे साधन आहे. आजच्या युगातले " येडा बनके पेडा खाना" प्रकारचे.

याच आशयाचे एक बोधचित्र सोशल मेडीयावर फ़िरत होते म्हणून या संस्कृत सुभाषिताची आठवण झाली.



पण आजकाल मात्र जोराने ओरडून विकणा-यांचे पेरूही विकले जातात आणि न ओरडता शांत बसून विकणा-यांचे (हापूस) आंबेही न विकल्या जाता पडून रहातात अशी परिस्थिती आहे. खरेच आहे ते. आजचा जमानाच मुळी जाहिरातबाजीचा आहे. जाहिरात ही पासष्ठावी कला म्हणून विकसित झालेली आहे आणि मान्यताही पावलेली आहे. आमच्या पूर्वजांचा फ़ार बोल बच्चनपणावर विश्वास नव्हता किंवा त्याकाळी एखादी गोष्ट पटवून सांगायची असेल तर वारंवार ओरडण्याची गरज नसावी. शब्दांवर विश्वास ठेवण्याचा तो काळ होता.

हा बदललेल्या काळाचा महिमा की आपणा सगळ्यांनाच कशाचे ना कशाचे बंधन अगदी मनापासून आवडायला लागले आहे ? न कळे. हो, नक्कीच आपणा सगळ्यांनाच पैसा, मान, मरातब, लौकिक इत्यादी भौतिक गोष्टींमध्ये रमायला आवडायला लागलेले आहे. म्हणून मग मुख दोष हा मुख दोष नसून जाहिरातीची कला बनते. अर्थात मूर्ख माणसांनी तोंड उघडले की त्यांच्या विद्वत्तेचे पितळ उघडे पडतेच. तो भाग अलहिदा. पण आजकाल आपण फ़ार वाचाळ झालोय हे खरे. एखाद्या दिवसभराचे मौनही आपल्याला सोसवत नाही. (बाकी, माझ्या स्वतःच्या मौनाच्या प्रयोगांवर लिहीण्यासाठी मी माझा पुढला लेख राखून ठेवतोय.)

जरा अंतर्मुख होऊन विचार केलात तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला अशी अनेक मंडळी असतील की जी आपला माल ओरडून विकत नाहीत पण ती मंडळी अनंत गुणांनी युक्त अशी गुणी मंडळी आहेत. त्यांचा शोध घेणे अवघड नाही. जरा नजर उघडी ठेवली आणि साक्षेपी दृष्टीने आजूबाजूला पाहिले की अशी मंडळी आपल्या दृष्टीला पडतीलच. त्यांचा मान ठेवूयात. त्यांची खरी किंमत ओळखून त्यांना आदर देवूयात.

Friday, January 15, 2016

संस्कृत सुभाषिते - ५ गोड (च) बोला

वाचा:
संस्कृत सुभाषिते - १
संस्कृत सुभाषिते - २
संस्कृत सुभाषिते - ३ 
संस्कृत सुभाषिते - ४  

संस्कृत सुभाषित आहे,

"सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात
न ब्रूयात सत्यमप्रियम
प्रियं च नानृतम ब्रूयात
देश धर्म सनातनः "

अर्थ : खरे बोला पण प्रिय वाटेल असे खरे बोला. खरे पण अप्रिय असे बोलू नका. प्रिय वाटणारे पण खोटे फ़क्त देश आणि धर्म वाचवण्याच्या वेळेस (आपदधर्म म्हणून) बोला. 

दरवर्षी मकर संक्रांत आपल्याला सत्य बोला पण प्रिय बोला असे बजावून सांगत असते आणि आज जेव्हा मी माझ्याच जीवनाचा विचार करतोय तो कळतय की ज्यावेळी मी नको तेव्हढं परखड बोलून (असते एक तारूण्याची धुंदी. जेव्हा माणस जपण्यापेक्षा आपली मतं महत्वाची वाटत असतात. वाद घालण्याची आणि निभावून नेण्याची खुमखुमी असते.) माणस दुखावली, त्यावेळेस जर मी तेच म्हणण वेगळ्या शब्दांमध्ये, वेगळ्या आवाजाच्या पट्टीत मांडल असत तर माणस दुखावली गेली नसती. पण आज हे कळतय यालाच अनुभव म्हणत असावे.

असो. हा लेख लिहीण्याचा प्रपंच माझ्या सर्व तरूण मित्रांसाठी. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा व्हावा" या हेतूने. केवळ मकरसंक्रातीलाच नव्हे तर सदैव गोड आणि गोडच बोला.

Wednesday, January 6, 2016

संस्कृत सुभाषिते - ४

वाचा: संस्कृत सुभाषिते - १
 संस्कृत सुभाषिते - २
 संस्कृत सुभाषिते - ३


मराठीत आपण ब-याचदा सवयीने वापरतो तो शब्द संस्कृत सुभाषितातला आहे.

" अयं निजः, परो वेती, गणना लघुचेतसाम
उदार चरितानांतुम, वसुधैव कुटुम्बकम " 

(हा माझा, हा परका अशी गणना छोट्या (कोत्या) मनाची माणसे करतात पण उदार हृदयाच्या माणसांसाठी तर हे जगच एक कुटुंब असत.)

यातला वसुधैव कुटुम्बकम हा शब्द आपण मराठीत खूपदा सवयीने वापरतो. मला या ठिकाणी माझ्या ज्ञानोबामाउलीची ओवी आठवली. 

" हे विश्वची माझे घर
ऐसी जयाची मती स्थीर
किंबहुना चराचर
आपण जाहला " 

ही ओवी मूळ संकृतातल्या सुभाषितापेक्षा गोड वाटतेय न ? त्याला माउलींचा अमृतस्पर्श झालाय म्हणून.
 



Sunday, January 3, 2016

संस्कृत सुभाषिते - ३

वाचा : संस्कृत सुभाषिते - १

           संस्कृत सुभाषिते - २



आपण मराठीत बरीच संस्कृत सुभाषिते त्यांच्या संदर्भाविना वापरतो. कधी कधी तरी मराठीत अर्थविपर्यास होत असला तरी वापरतो. त्यातलेच हे एक.

"शतेषु जायते शूरः, सहस्त्रेषुच पण्डितः
वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवती वा न वा. "

(शंभर जणांत एखादा शूर निपजतो, हजारांमध्ये एखादा विद्वान होतो, दहा हजारांत एखाद्यालाच वक्तृत्वकला वश होते पण दाता या शंभर, हजार,  दहा हजारातही कुणी नसतो. दात्यांची सर्वत्र वानवाच असते.)

आपण यातलं " वक्ता दशसहस्त्रेषु" हे मोठ्या गौरवाने वापरतो. तसा हा थोडा वक्तेपणाचा गौरवही आहेच पण त्यानंतरच्या "कुणाच्याही दाता नसण्याच्या" खंतीची आपण दखल घेत नाही. आहे की नाही मजा ?

Saturday, November 14, 2015

संस्कृत सुभाषिते - २


" भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गीर्वाणभारती
तस्याम ही काव्यम मधुरम, तस्मादपी सुभाषितम "

(संस्कृत गद्य भाषा ही तर मधूर आहेच पण त्यापेक्षाही त्यातले काव्य मधूर आणि त्यापेक्षाही सुभाषिते मधूर.)

असे का म्हटले आहे याचे प्रत्यंतर हे सुभाषित पाहून येईल. वक्रोक्ती (लेकी बोले सुने लागे) छापाचे हे सुभाषित आहे. सुभाषितकार म्हणतात 

" असारे खलु संसारे, सारम श्वशुरमंदिरम,
हरो हिमालये शेते, हरः शेते महोदधौ "

या जगात सगळ्याच गोष्टी अर्थहीन आहेत. फ़क्त सासुरवाडी तेव्हढी खरी. पहा बरं भगवान शिव हा हिमालयातच (आपल्या सासुरवाडीत) राहतो आणि भगवान विष्णू हे क्षीरसागरात (त्यांच्या सासुरवाडीत) वास्तव्य करतात.

आता तुम्हाला ते हिंदी चित्रपटातले " सासू तिरथ, ससरा तिरथ...." गाणे आठवले असेल. मला नव्वदोत्तरी सुशिक्षित घरांमध्ये मुलीच्या माहेरच्यांचा वाढलेला अती हस्तक्षेप आठ्वला. या विषयावर आमच्या अपर्णाताई रामतीर्थकरांच एक सविस्तर भाषण पण आहे. त्याची लिंक नंतर कधीतरी देईन.

Wednesday, October 28, 2015

संस्कृत सुभाषिते - १

आज माझ्या मुलीचा संस्कृत चा प्रथम सत्र परीक्षेचा पेपर होता. पेपरच्या आधी अभ्यास वगैरे घेण्याचे काम आमच्या सौभाग्यवतींकडे असले तरी परतल्यानंतर "पेपर कसा गेला ?" " बघू, कायकाय आलं होतं ते ?" वगैरे विचारपूस करण्याचं पितृकर्तव्य मात्र अस्मादिकांकडे असतं.

तसंच आज तिचा पेपर बघताना मन भूतकाळात ३० वर्षे मागे गेल. सी.पी. ऍण्ड बेरार शाळेत शिकताना आम्हाला श्री. हरीभाउ महावादीवार म्हणून संस्कृतचे उत्तम शिक्षक होते. तेव्हा संस्कृत भाषा प्रचारणी सभा, नागपूर तर्फ़े इयत्ता ५ वी, ६ वी आणि ७ वी साठी संस्कृत परीक्षा घेतल्या जायच्या. (राष्ट्रभाषा प्रचारणी सभा, वर्धा तर्फ़े हिंदीच्या आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फ़े मराठीच्या परीक्षा घेतल्या जायच्यात. आमची गणना स्कॉलर विद्यार्थ्यांमध्ये उगाचच होत असल्याने, या सगळ्या परीक्षा देणं आम्हाला अनिवार्य असायचं) त्या ३ वर्षांमध्ये  त्यांनी शिकवलेली सुभाषितमाला मला अजूनही तोंडपाठ येते. इतकं जबरदस्त पाठांतर त्यांनी आम्हा सगळ्यांचच करून घेतलं होतं. 

आजही अगदी " अयं निजः परोवेती " पासून म्हणायला सुरूवात केली की आमची गाडी " तपः सर्वं समाप्ययेत " पर्यंत न अडखळता घडाघड म्हणू शकतोय. त्यातलंच एक मजेशीर सुभाषित आज आठवलं. ते सुभाषित आणि त्याचा अर्थ इथे आज सर्व गीर्वाण प्रेमींसाठी देतोय. त्या काळात देवांची ही टिंगल संस्कृत सुभाषितकार करू शकायचेत हे पाहून आश्चर्य वाटेल.

कमले कमला शेते, हरः शेते हिमालये
क्षीराब्धौच हरिः शेते, मन्ये मत्कुण शंकया.

लक्ष्मी कमळात वास करते, हर (शिव) हिमालयात वास करतो, हरी क्षीरसागरात वास करतो म्हणून कवी म्हणतो की यांच्या घरात मत्कुण (ढेकूण) झालेत की काय ? (यांना असे चांगले आपले घर सोडून इकडे तिकडे रहावेसे वाटतेय तर )

यात "मन्ये मत्कुण शंकया" या शब्दाचा इतरही काही अर्थ निघत असल्यास संस्कृतच्या जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.