लेखाच्या सुरूवातीलाच एक disclaimer देतोय की हा लेख महाराष्ट्रातल्या अनंत एस. टी. स्टॅण्डसवर असलेल्या रसवंत्यांविषयी नाही. किंवा रस्त्याच्या कडेला जे हातठेले उभे राहून रसविक्री करतात त्यांच्यावर नाही.
उन्हाळ्याची चाहूल लागली की साधारण मार्च महिन्याच्या मध्यात शहरातल्या थोड्या मोकळ्या जागांवर मांडव लागायचे. शंभर एक पान जेवून उठेल अशा विस्ताराचा मांडव. त्यातल्या एका कोपर्यात उसाचा रस काढणारे ते एवंगुणविशिष्ट मशिन स्थापले जायचे. त्याबाजूला एक गल्ला गोळा करणारे व ग्राहकांना हाफ ग्लास, फुल ग्लास रस असे वेगवेगळ्या रंगातले प्लॅस्टिकचे बिल्ले देणारे टेबल टाकले जायचे.
इतर परिसरात ग्राहकांना बसण्यासाठी प्लॅस्टिकच्या टेबल खुर्च्यांची रचना व्हायची. गल्ल्याजवळच एक मोठा टकारा टेप आणि त्याची गाणी ग्राहकांच्या कानावर नीट आदळावीत म्हणून मांडवाच्या सगळ्या कोपर्यात भले मोठे स्पिकर्स लावले जात. रसवंतीवर ते गाणे वाजतेय, गाजतेय म्हटल्यावर ते गाणे सुपरहिटच असले पाहिजे हा अंदाज जाणकारांना येई. "क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहके" किंवा "हवा हवा ऐ हवा" ही गाणी आम्ही प्रथम रसवंतीमधेच आपल्या कर्णरंध्रांमध्ये साठवून घेतली होती.
मार्च महिन्यात जरी अशी रसवंती स्थापन झाली तरी त्यांची खरी गिर्हाईकी सुरू होई ती मुलांच्या परिक्षा संपल्यानंतर. साधारण एप्रिल मध्यात. परिक्षा सुरू असेपर्यंत रसवंतीत जाऊन तिथला बर्फ घातलेला थंडगार रस प्यायला बहुतेक पालकांचा कडाडून विरोध असे. एप्रिल मध्यात परिक्षा संपून शाळांना सुट्या लागल्यात की मग मुलांना थोडे स्वातंत्र्य मिळत असे. एका वर्षाची परिक्षा संपल्यानंतर लगेच पुढचा उन्हाळाभर पुढल्या वर्गाचे क्लासेस सुरू करून विदर्भातल्या भर एप्रिलच्या उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना शाळा करावी लागण्याचा सीबीएसई नामक दळभद्रीपणा तेव्हा इथे रूजलेलाच नव्हता ही किती आनंदाची गोष्ट !
मग अशाच एखाद्या संध्याकाळी बाळगोपाळ मंडळी आपापल्या मित्रांसह किंवा वयाने थोड्या मोठ्या असलेल्या भावा (आणि/ किंवा) बहिणींसह रसवंतीत दाखल होत असत. एखाद्या संध्याकाळी त्यांचे पालकसुध्दा तिथे त्यांच्यासोबत येत असत . दुपारी खेळल्या गेलेल्या पत्त्यांच्या डावात सत्तीलावणी किंवा नाठ्याठोम खेळात हरलेल्या भिडूवर सगळ्यांच्या रसाचा खर्च करण्याची जबाबदारी असे. बाळगोपाळांच्या मनात दुपारचा खेळ आपण जिंकून काहीतरी मोठ्ठी कामगिरी केलीय असा भाव असे. त्या विजयाचे सेलिब्रेशन असे रसवंतीवर होत असे.
मांडवात असलेली, संध्याकाळी त्याच रसवंतीवर असलेल्या एखाद्या कामगाराने जमिनीवर सुरेख सडा शिंपडून मस्त गारवा आणलेली आणि ओल्या मातीचा धुंद करणारा सुगंध येणारी रसवंती. आत साध्या ट्युबलाईटसचाच पण देखणा प्रकाश देणारी प्रकाशयोजना असे. बहुतांशी ट्यूबलाईटसना हिरवे, निळे, तांबडे पारदर्शक कागद लावून त्या त्या रंगाचा प्रकाश निर्माण केला जात असे. हे अगदी विलोभनीय दृश्यमिश्रण असे.
मग दादा / ताई कुणीतरी जाऊन रसाची आॅर्डर देऊन येत. गप्पा, गंमती करीत चेष्टामस्करी सुरू असतानाच काचेच्या ग्लासांध्ये बर्फ घातलेला थंडगार रस घेऊन तिथला एखादा कर्मचारी येत असे. रस पिताना गप्पा बंद पडत असत पण मग कानांचे काम सुरू असे. त्या त्या वर्षातली trending गाणी कानांवर पडत असत, त्यात रूची निर्माण होत असे. घरोघरी टेप किंवा म्युझिक सिस्टीमचा अभाव असण्याचे ते दिवस होते.
रस पिऊन संपल्यावर ग्लासात खाली उरलेला गाळ कम फेस पिण्याचा प्रयत्न बाळगोपाळांकडून होत असे. मोठ्यांना त्याबद्दल क्वचित रागवावे सुध्दा लागे.
अशा प्रकारे थोड्या तृप्त बर्याचशा अतृप्त मनाने बाळगोपाळ मंडळी घरी परतत असत. "आपण मोठे होऊन कमवायला लागलो ना की एकदम तीन तीन ग्लास उसाचा रस एकट्यासाठीच आॅर्डर करूयात आणि मनसोक्त पिऊयात ही मनिषा अनेकांच्या मनात असे.
या रसवंत्या आता कुठेच दिसत नाही. त्या नाहीशा होताना त्यांच्याबरोबर किती मोठी संस्कृती, किती भावभावनांची वादळे लयाला गेली याची जाणीव आज फार कमी लोकांच्या मनात उरलेली आहे.
कोल्हापूर, सांगली सारख्या ऊससमृध्द भागांमध्ये ह्या रसवंत्यांची एक वेगळीच तर्हा मला बघायला मिळाली होती. तिथे रस असा ग्लासावर नाही तर तांब्यावर किंवा पाण्याच्या जगावर (डोलची) मिळत असे. बर्फ वेगळ्या ताटलीत आणून ठेवला जाई. ज्याला लिंबू पिळून रस प्यायचाय त्याच्यासाठी लिंबाच्या फोडी आणि मीठ वेगळे दिले जाई. विना बर्फ टाकलेला तांब्याभर रस रिचवायचा म्हणजे भल्याभल्यांच्या कोठ्याची परिक्षा असे.
आजकाल मात्र रसवंत्या ह्या केवळ एस टी स्टॅण्डसच्याच आश्रयाला उरल्यात. तिथे वेळेला पांस्थतांची क्षुधा शमत असेलही बापडी पण एखाद्या उन्हाळ्याच्या संध्याकाळी रसवंतीत जाऊन तिथला रस पिण्याची, थोडी हुरहुर लावणारी, थोडी सुखावणारी आमच्या बालपणची संस्कृती मात्र नक्की हरवलीय.
- अजूनही कुठल्या गावात अशी उपरोल्लिखीत रसवंती संस्कृती असेल तर नक्की काॅमेंटसमध्ये कळवा. मी स्वखर्चाने तिथे येऊन माझे बालपण पुन्हा जगेन ही आस बाळगणारा, बालक वैभवीराम प्रकाश किन्हीकर