Saturday, February 26, 2022

सावध ऐका पुढल्या हाका

आजकाल आपण आपापल्या व्यापांमध्ये फार व्यस्त झालोय ? की व्यस्ततेचा हा व्याप आपण अकारणच आपल्यामागे लावून घेतलाय ?

वपु काळे म्हणतात की "नाटकाच्या १५ व्या रांगेतली तिकीटे काढलेल्या दोन माणसांनी एकमेकांना किती बिचकायचे ? एकमेकांपासून किती अंतर ठेऊन रहायचे ?"
मला वाटते हा तर्क कुठल्याही दोन व्यक्तींसाठी लागू होईल. नाटकाच्या पहिल्या रांगेतल्या दोन व्यक्तीही त्या तीन तासांसाठी एकाच सामाजिक आणि आर्थिक पातळीवर असतील ना ? त्यांनी उगाच एकमेकांशी "शिष्टपणा" करीत वागण्याचे काहीच कारण नाही.
पूर्वी प्रवासादरम्यान एकमेकांशी बोलणे व्हायचे. शिदोर्यांच्या गाठी सुटायच्यात तशा मनांच्याही गाठी एकमेकांसोबत सुटायच्यात. सुखदुःखांची देवाणघेवाण व्हायची. माझ्यासारखाच दुसरा कुणीतरी या जगात आहे या भावनेने मनाला आधार मिळायचा. आपल्यापेक्षा हुशार व्यक्ति भेटल्यानंतर त्या व्यक्तिचा आदर्श ठेवला जायचा. तो एक बेंचमार्क म्हणून बघितला जायचा. त्यामुळे आपलीही वाटचाल प्रगतीपथावर होत असे.
आज आपण अकारण "शिष्टपणा" करायला लागलोय हे माझे निरीक्षण आहे. प्रवासातल्या शेजारच्या माणसाचे तर सोडाच आपल्याला आपल्या शेजार्यांविषयी, सहकर्मचार्यांविषयीही फारशी माहिती नसते. एकमेकांना उगाच बुजून आपण संबंध फारसे वाढवीत नाही. वास्तविक समानशील व्यक्ती असतात, चांगली मैत्री होण्यासाठी वाव असतो, पण दोन्ही बाजूंकडला अकारण बुजरेपणा आड येतो.
अगदी रक्तातल्या नात्यातल्या नातेवाईकांबाबतही आपण असेच वागतो. कौटुंबिक व्हाॅटसॅप ग्रुपवर एकमेकांच्या प्रत्येक पोस्टसना थंब्सप (तिथेही आपली कंजुसी असतेच. वास्तविक एखादी गोष्ट आवडली तर मनमोकळेपणे काॅमेंट लिहून दाद द्या ना. पण तिथेही आपला शिष्टपणाच आड येतो.) देणारी दोन मंडळी एकमेकांच्या घरी (जर वर्षा दोन वर्षांनी वेळ आलीच तर...) फोन करून, व्यवस्थित अपाॅइंटमेंट वगैरे घेऊनच जातात. वास्तविक ज्याच्याकडे जायचय तो मनुष्य त्या सुटीच्या दिवशी बर्म्युडा घालून लोळत लोळत व्हाॅटसॅपच बघत बसलेला असतो पण त्याची "अपाॅइंटमेंट" वगैरे घ्यावी लागते.
याचा परिणाम असा झालाय की या personal space वगैरे पाश्चात्य कल्पनांना कवटाळण्यांच्या नादात आपण प्रत्येकजण एकटेपणाकडे वाटचाल करतो आहे. देश म्हणून, समाज म्हणून एवढेच काय कुटुंब म्हणूनही आपण विसविशीत होत चाललोय. नात्यांची घट्ट वीण हळूहळू का होईना उसवत चाललीय. एकमेकांचा आधार सुटत चालल्याचा भास होतोय. खरेतर थोडा मोकळेपणाने संवाद झाला आणि लक्षात आले की पुढली व्यक्ति सुध्दा आपल्यासारखीच मानवी सहचर्याला आसुसलेली आहे तर दोन व्यक्तिंमध्ये नवा पूल बांधला जाईल. विचारांचे दळणवळण सुकर होईल, आधार वाढेल, व्यक्ति, समाज आणि पर्यायाने राष्ट्र सुदृढ आधाराने उभे राहतील.
पुढल्या काही दशकांमध्ये मानसिक रोग हाच जगातला सगळ्यात मोठा आजार असेल असे तज्ञ भाकित करतात हे याच आधारावर. चला, अकारण शिष्टपणा टाळूयात, नैसर्गिक प्रेरणेने (अर्थात समाजव्यवस्थेचे सगळे नियम पाळतच) जगूयात, जे आपण नाहीत ते दाखवण्याचा, तसे जगण्याचा अट्टाहास आवरूयात.
"सर्वे भद्राणि पश्यन्तु" कडे सगळेच एकसाथ वाटचाल करूयात.
- अनोळखी व्यक्तिंशीही गप्पांमध्ये रमणारा, अघळपघळ नागपूरकर, रामभाऊ.

Wednesday, February 23, 2022

पहाटचिंतन

 "दुसऱ्या  कुणाच्याही दुःखाने मी आनंदित होणार नाही."

आणि
"दुसऱ्या कुणाचाही सुखामुळे मी व्यथित होणार नाही."
आपापल्या जीवनात ही इतकी साधी दोन पथ्ये पाळलीत की आपली सत चित आनंदाकडे निरंतर वाटचाल सुरू होते. आणि ही वृत्तीच हळूहळू आपला स्थायीभाव बनला की आपले स्वतःचे रूपच सच्चिदानंदरूप होऊन जाते.
याचा अनुभव घ्यायचा असेल तर गेल्या काही कालावधीत स्वतःला वाईट कधी वाटले होते ? याचा आपापल्या अंतर्मनात शोध घेतला तर आपले आपल्यालाच लक्षात येईल की ७५ % पेक्षा जास्त वेळा ही वर उल्लेखलेली पथ्ये न पाळून आपणच आपल्या स्वतःला दुःखी केलेले आहे. (दुसऱ्याच्या दुःखात वरवर जरी आपल्याला आनंद वाटलेला असेल तरीही आपले अंतर्मन हे वैश्विक योजनेचा एक भाग असल्याने, आपल्याही नकळत ते दुःखी झालेले असतेच असते.)
आपले वडिल, आजोबा ही मंडळी आपल्या तुलनेत अधिक सुखी आयुष्य जगलीत कारण त्यांनी ही पथ्ये त्यांच्या जीवनात कसोशीने पाळलीत. जीवनाकडे, इतर प्राणीमात्रांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा आपल्यापेक्षा अधिक निकोप, निरामय असा होता. आपण आज भौतिक सुखसोयींनी अधिक समृध्द असू पण त्यापाठी धावताना आपण अकारण स्पर्धा, अकारण तळमळ मागे लावून घेतली असे नाही वाटत ?
सुख मिळण्यासाठी भौतिक साधन हा हेतू आता लयाला जाऊन भौतिक साधने अधिकाधिक मिळवण्यासाठी सुखाचा त्याग असे आपण साध्य आणि साधनाला उलटसुलट करून आपल्या स्वतःला खोड्यात अडकवून घेतलेले आहे.
माऊलींच्या "किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी" या ओवींचा अनुभव एकदातरी आपल्या आयुष्यात आपल्याला घ्यायचाय नं ? मग करायची या अभ्यासाला आणि पथ्याला आजपासूनच जाणीवपूर्वक सुरूवात ?
- "पहाटचिंतन" राम प्रकाश किन्हीकर. (२३०२२०२२_०३५८)

Sunday, February 13, 2022

माघाची थंडी माघाची _ थंडी across सिझन्स.

(आजकाल असे mixed mode मध्ये लिहीण्याची फ़ॅशन का काय ते आहे म्हणे. मी म्हटले आपण ही लिहूयात. विचार पोहोचण्याला महत्व.)


आश्विन लागला आणि शारदीय नवरात्राला सुरूवात झाली की गुलाबी थंडीला सुरूवात होते. कपाटातले स्वेटर्स, शाली बाहेर काढल्या जातात. त्यांना दुपारचे ऊन दाखवले जाते. त्यांची धुलाई वगैरे होते. सकाळी सकाळी देवीच्या मंदिरात दर्शनाला जाताना अगदी थोडे गारठल्यासारखे होते पण तळहात एकमेकांवर घासले की पळून जाणारी. आश्विन संपता संपता दिवाळीच्या सुमारास थंडीत थोडी वाढ होते खरी पण दिवाळीच्या फ़टाक्यांच्या उष्णतेत आणि फ़राळाच्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात त्या थंडीची म्हणावी तेव्हढी जाणीव होत नाही.


कार्तिक सुरू झाल्यानंतर ८ -१० दिवसांनी कार्तिकाच्या बोच-या थंडीची जाणीव व्हायला सुरूवात होते. पण या थंडीचे कौतुकच जास्त असते. गेल्यावर्षी इतकी थंडी यावर्षी पडेल की नाही ? याचा अंदाज घेण्यात मंडळी दंग असतात. एखादे स्वेटर, जर्किन, विंडचिटर जास्त खरेदी होते खरे. शहरात उघड्यावर राहणा-या, झोपणा-या अभागी जिवांसाठी गरम कपडे गोळा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची टूम निघते आणि तरूण मंडळी उत्साहात त्यात सहभागी होतात.


मार्गशीर्ष येईपर्यंत थंडी चांगली स्थिरावलेली असते. मार्गशीर्षात श्रीगुरूचरित्र पारायणासाठी अगदी पहाटे उठून अंघोळ करावी लागल्यावर या बोच-या थंडीची जाणीव भाविकांना होते. पण श्रीगुरूचरित्र वाचनाच्या दृढनिश्चयापुढे भाविकांना या थंडीची तमा नसते. त्यातच या थंडीत पहाटे पहाटी दुलईच्या बाहेर निघण्याचा कंटाळा करणारी सूर्यवंशी मंडळी पहाटे उठून अंघोळ, पूजा करणा-यांचे कौतुक करून त्यांना हरभ-याच्या झाडावर चढवत असतात. त्या कौतुकाच्या धुंदीत पहाटेच्या थंडीचा बोचरेपणा बोचत नाही. पण मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीदत्तजयंती झाली की मग ही थंडी बोचायला लागते. "आपण एव्हढ्या थंडीत एव्हढ्या पहाटे उठून अंघोळ वगैरे कसेकाय आटोपत होतो ?" याचे स्वतःच स्वतःला कौतुक वाटण्याचा हा काळ. याच दरम्यान २२ डिसेंबरचा दिवस येतो. उत्तर गोलार्धात सूर्य पृथ्वीपासून सगळ्यात दूर असण्याचा हा दिवस. खगोलप्रेमी मंडळी "उद्यापासून सूर्य अधिकाधिक उत्तरेकडे सरकणार आणि त्यामुळे थंडी आता हळूहळू कमी होत जाणार." अशी मनाची "भौगोलिक" समजूत घालत मानसिक रित्या थंडी कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. 


पौष महिन्यात तर थंडी अगदी मी म्हणत असते. पौष महिना हा भारतीय परंपरेनुसार सूर्योपासनेचा महिना. दर रविवारी "पुषा इतवार" चे व्रत साजरे करणे, अंगावर उन्हे घेत वर्षभराचे व्हिटामिन डी साठवून घेणे. याच महिन्यात येणा-या मकर संक्रांतीच्या दिवशी (आणि नंतर पंधरवाडाभर) भरपूर तिळगूळ खाऊन शरीरात उष्णता साठवून घेणे अशा अनेक उपायांनी भारतीय जनमानस पौषाच्या थंडीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. सर्वसामान्यांसाठी "मकर संक्रांतीनंतर सूर्य तिळतिळ वाढून थंडी कमी होते." हा पारंपारिक शहाणपणा थंडीला मानसिक रित्या सहन करण्याची ताकद देतो. पण पौषापर्यंत थंडीला सगळे थोडे वैतागलेलेच असतात हे नक्की. "बापरे ! यावर्षी काय थंडी ! हा उदगार जवळपास प्रत्येकाच्या तोंडातून एकदातरी एव्हाना निघालेला असतो.


माघ महिना लागतो. वसंत पंचमी पासून वसंत ऋतू सुरू होतो. आता अत्यंत आल्हाददायक वातावरणाला सुरूवात होणार या जाणिवेने भारतीय मन हरखून जाते. रथसप्तमीपासून तर सूर्यनारायण आपल्या सातही घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन चौफ़ेर उधळणार या जाणिवेने मन सुखावते. उन्हाळा कितीही कडक असला तरी आता त्याची वाट पहाणे सुरू होते. आणि नेमके आताच थंडी जाताजाता तडाखा द्यायला सुरूवात करते. या अनपेक्षित हल्ल्याला आपण तयार नसतो. एकवेळ पौषातल्या थंडीला आपण सहन करतो पण थंडीने जाताजाता दिलेल्या या तडाख्या्ने मात्र आपण बावरून जातो. पौषातल्या थंडीत थोडावेळ सूर्यनारायणाच्या आस-याला गेलो तरी ती थंडी पळत असते पण आता माघात मात्र सूर्यनारायण सुद्धा आपली मजा पहात असतो. पौषापेक्षा माघात सूर्य अधिक जवळ आलेला आहे पण तरी थंडी पळवायला आपली मदत का करीत नाही ? हा प्रश्न आपल्यापैकी सगळ्यांना पडत असतोच. म्हणूनच "माघाची थंडी माघाची, थंडीची धुंदी थंडीची. अशा थंडीचा फ़ुललाय काटा..." वगैरे गीते प्रतिभवंतांना सुचली नसती तरच नवल. ज्या ठिकाणाहून आपल्याला धोका होणार नाही अशी खात्री असते त्याच ठिकाणाहून दगाफ़टका झाल्यावर जी मनाची अवस्था होते तशी या माघाच्या थंडीने होत जाते. "शिवरात्रीशिवाय थंडी कमी होणारच नाही." अशी काही जुनी जाणती मंडळी बोलायला लागतात. 


माघातली थंडी म्हणजे थोडी Love and Hate रिलेशनशिपसारखी असते. सुंदर थंडी निघून चालली म्हणून तिच्याविषयी ओढ आणि जाताजाता कसले असह्य तडाखे देतेय ! म्हणून तिच्याविषयी "जा की आता पीडा, टळ एकदाची" अशी भावना अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ.


अशातच फ़ाल्गुन येतो. होळीपासून अधिकृतरित्या थंड पाण्याने अंघोळ करण्याची परवानगी मिळते आणि उन्हाळ्याला सुरूवात होते. थंडीच्या आठवणी उरतात आणि पुढल्या वर्षीच्या थंडीची वाट पहाणे सुरू होते.


अर्थात हे सगळे वैभव सगळे ऋतू अनुभवणा-या मनांसाठीच बर का. सदानकदा ए. सी. त बसून राहणा-यांना कसले आलेय पौषाचे आणि माघाचे कौतुक ? शहरातल्या उंच उंच इमारतींमध्ये सूर्यदर्शन कधी होतेय ?, कधी नाही ? याची अजिबात तमा न बाळगणा-या तथाकथित ’उत्क्रांत’ लोकांकरिता कसली आलीय संक्रांत ? आणि कसली आलीय रथसप्तमी ? "सगळे जुनाट विचार आणि सण." असे मानणा-यांना निसर्ग समजेल कसा ? आणि केव्हा ?


- निसर्गासोबत स्वतःची दिनचर्या आखू इच्छिणारा, परमेश्वराच्या प्रत्येक नैसर्गिक देणगीबद्दल त्याचा आणि निसर्गाचा कृतज्ञ, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.