केबलवाल्याच्या कृपेने परवा केबल बंद पडले. बराच काळ सुरू होईना. घरात सगळ्यांचा मूड तर मनोरंजनाचा होता. मग इतर उपलब्ध साधनांमधून मनोरंजन कसे करायचे ? याचा शोध सुरू झाला आणि सिंहासन सिनेमा पुन्हा घरात लागला.
१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडल्यात त्यावर अरूण साधूंच्या लेखणीतून भाष्य करणा-या "सिंहासन" आणि "मुंबई दिनांक" या दोन कादंब-यांवर आधारित जब्बार पटेलांची ही कलाकृती.
१९७९ मध्ये ज्यावेळी हा पहिल्यांदा पडद्यावर आला तेव्हा राजकारण आणि सत्ताकारण एव्हढ्या गांभीर्याने आणि अनेकपदरीपणे समजून घेण्याचे वय नव्हते. साधारण १९९० च्या दशकात हा चित्रपट पाहिला आणि आवडला. चित्रपट पाहिल्यानंतर मूळ कादंबरी वाचावी अशी ओढ लागावी असे चित्रानुभव विरळाच.
कादंबरीशी ब-यापैकी प्रामाणिक असलेला चित्रपट म्हणजे सिंहासन आणि अलिकडल्या काळातले "शाळा" आणि "निशाणी डावा अंगठा".
१९७९ मध्ये ज्यावेळी हा पहिल्यांदा पडद्यावर आला तेव्हा राजकारण आणि सत्ताकारण एव्हढ्या गांभीर्याने आणि अनेकपदरीपणे समजून घेण्याचे वय नव्हते. साधारण १९९० च्या दशकात हा चित्रपट पाहिला आणि आवडला. चित्रपट पाहिल्यानंतर मूळ कादंबरी वाचावी अशी ओढ लागावी असे चित्रानुभव विरळाच.
कादंबरीशी ब-यापैकी प्रामाणिक असलेला चित्रपट म्हणजे सिंहासन आणि अलिकडल्या काळातले "शाळा" आणि "निशाणी डावा अंगठा".
सुंदर कथा, अरूण सरनाईक, श्रीराम लागू, रीमा लागू, सतीश दुभाषी, दत्ता भट, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, निळू फ़ुले, श्रीकांत मोघे, माधव वाटवे आणि अत्यंत छोट्या भूमिकेत नाना पाटेकर अशी अत्यंत तगडी स्टारकास्ट आणि त्याच्या तोडीस तोड जब्बार पटेलांची पटकथा आणि दिग्दर्शन. त्याकाळी हा चित्रपट हिट झाला की नाही कळले नाही पण हा चित्रपट बघताना आजही मजा येत होती. आजही सी.एम. आणि त्यांच्या आसपासची माणिकराव, दत्ताजी, विधानसभाध्यक्ष, दाभाडे ही सगळी मंडळी आजच्या राजकारणात अनुभवायला येतात. ४० वर्षांनंतरही आजच्या राजकारणाशी ह्या चित्रपटाचे धागे जुळतात हे या कथालेखकाचे आणि दिग्दर्शकाचे मोठ्ठे यश समजावे लागेल. कालातीत असलेली कलाकृती ती ही.
तस पहायला गेल तर एका राजकारणपटासाठी गीते, संगीत इत्यादी गोष्टी दुय्यम ठरतात. पण साक्षात सुरेश भटांच्या कविता गीते म्हणून आणि त्यावर संगीतसाज चढवणारे हृदयनाथ मंगेशकरांसारखे जबरदस्त संगीतकार यामुळे ती बाजूही भक्कम झाली. "उष:काल होता होता", "मेंदीच्या पानावर" "मालवून टाक दीप" सारख्या सुंदर गझला योग्य त्या प्रसंगी चित्रपटात येतात. १९७०-८० च्या दशकातली मुंबई आणि तिच्यातले तत्कालीन समाजजीवन अभ्यासण्यासाठीही हा चित्रपट मैलाचा दगड ठरतो.
त्यानंतर राजकारणातील सत्तास्पर्धेवरचा आणखी एक चांगला चित्रपट १९९४ मध्ये आला. अशोक सराफ़, विक्रम गोखले आणि आश्विनी भावे चा "वजीर". उज्जवल ठेंगडी या एका चांगल्या लेखक दिग्दर्शकाच्या, १९८६-८७ महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ८ पारितोषिकांनी गौरविलेल्या नाटकावर आधारित हा चित्रपट. श्रीधर फ़डकेंच संगीत. त्यातल आशाताईंनी गायलेल "सांज ये गोकुळी" गाण खूप श्रवणीय ठरल आणि गाजलही. घाणेरड्या सत्तास्पर्धेत मूल्य कशी पायदळी तुडवली जातात आणि सारासारविवेकबुद्धी कशी गहाण टाकावी लागते त्यावरचा हा चित्रपट.
नाटक या साहित्यप्रकाराच्या काही मर्यादा असतात. सगळ्या प्रकारच्या साहित्यात नाटक हा सगळ्यात कठीण साहित्य प्रकार गणल्या जातो तो या मर्यादांमुळेच. पण याच मर्यादा एखाद्या नाटकाचे बलस्थान ठरतात. "वजीर" नाटक त्या माध्यमात अत्यंत छान वाटल असणार. त्यातली प्रतिकात्मकता नाटक या माध्यमात एक बलस्थान ठरले असणार पण चित्रपटात कधीकधी प्रतिकात्मकता कथावस्तूला मारक ठरते. (शांतारामबापु, मला माफ़ करा. तुमच्या चित्रपटातली पराकोटीची प्रतिकात्मकता आमच्या पीढीला कधी पटलीच नाही. त्यावर "मु.पो.बोंबिलवाडी" या नाटकात मस्त प्रच्छन्न टीका केलेली आहे.) आणि म्हणूनच हा चित्रपट सिंहासन चित्रपटासारखा वारंवार बघावासा वाटत नाही. सार्वका्लीक कलाकृती ठरत नाही. अशोक सराफ़, विक्रम गोखलेंच्या तगड्या अभिनयाच्या टक्करीसाठी हा चित्रपट फ़क्त दोन तीनदाच पाहिल्याचे स्मरते. अशोक सराफ़चा एक दोन प्रसंगातला मुद्राभिनय अभिनयाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरावा असाच.
त्यानंतर १९९८ मध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावर आधारीत "सरकारनामा" हा चित्रपट आला. या चित्रपटातली पार्श्वभूमी १९९२-९३ मध्ये महाराष्ट्राने अनुभवलेल्या, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची होती. ह्या चित्रपटालाही यशवंत दत्त, अजिंक्य देव, मिलींद गुणाजी, दिलीप प्रभावळकर, प्रतीक्षा लोणकर, सुकन्या कुळकर्णी, उपेंद्र लिमये, नंदू माधव, यतीन कार्येकर, शर्वरी जमेनीस अशी तगडी स्टारकास्ट लाभली होती. कथा पटकथा सुंदर बांधली होती. कुठेही सैल, विस्कळीत न होता पटकथा वेगवान रूपात सादर होऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवत होती. त्या काळी खूप आवडला होता हा चित्रपट. चारपाच दा बघितला होता. पण आज विचार करतोय की "हा चित्रपट कालातीत असा म्हणता येईल का ?" उत्तर ठामपणे "नाही" असे येतेय.
No comments:
Post a Comment