फार वर्षांनी परवा एका रेडिमेडच्या दुकानात "बॅगी पँट" दिसली आणि मी एकदम २५ वर्षे मागे गेलो.
आम्ही शिकत असताना मांड्यांमध्ये अती ढगळ पण पायांपर्यंत निमूळती होत जाणार्या बॅगीची फॅशन पुन्हा आली होती. "पुन्हा आली होती" म्हणायच कारण म्हणजे ही फॅशन १९६० च्या दशकात चलनात होती. त्याकाळातील दिलीपकुमार, शम्मी कपूर प्रभृतींनी ही पँट घातलेली पाहून आम्ही भावंडांनी बालपणी "किती ढगळ ?" म्हणून चेष्टा केल्याचेही स्मरत होती. मात्र महाविद्यालयीन जीवनात ह्या पँटस घातल्यावर आपल्या (तत्कालीन) किडकिडीत देहाला जरा भारदस्तपणा येतोय याचा साक्षात्कार झाल्याने की काय या बॅगी पँटस आवडल्या होत्या.
त्या पॅंटसना "बॅगी" हे नामाभिधान प्राप्त होण्याचे कारण म्हणजे त्याच्या खिशांमध्ये एखाद्या बॅगेसारखी अनंत वस्तू सामावून घेण्याची क्षमता असावी असे मला प्रामाणिकपणे वाटायचे. आमच्या किडकिडीत देहाने या पॅंटस घालून वावरण्यामध्ये एकच धोका होता तो म्हणजे एखाद्या पहाडावर, मोकळ्या पठारावर अती हवेच्या ठिकाणी आपण गेलो तर जोरदार वाहणारी हवा पॅंटमध्ये शिरून अपथ्रस्ट फ़ोर्सने आपण हवेत तरंगायला लागू की काय ? अशी आम्हाला कायम भिती वाटत राहिलीय.
१९९० च्या दशकात शाहरूखनेही ही फ़ॅशन पुन्हा आणण्याचा प्रयत्न केल्याचे स्मरते. आताही या पँटस तयार मिळण्याची तशी सोय असेल तर अशा हवेशीर, सुटसुटीत आणि आरामदायक पँटस पुन्हा घालायला आवडतीलही.
परवाच महानायकाचा "दोस्ताना" बघत होतो. १९७० च्या दशकातल्या बेलबाॅटम घालून बच्चनसाहेबच इतके बेंगरूळ ध्यान दिसत होते की आम्ही हसायलाच लागलो. बाकी कंबरेत, मांड्यांमध्ये अत्यंत अडचणीच्या आणि चालताना पायाने रस्ता झाडू शकतील अशा पँटस त्याकाळी भारतात लोकप्रिय तरी कशा झाल्यात ? कोण जाणे. १९७० चा काळ हा "सर्वशक्तीमान" अमेरिकेचे प्रचंड आकर्षण असण्याचा होता. (आताही आहे म्हणा. पण १९७० च्या दशकाची तोड त्याला नाही.) म्हणून तिथल्या हिप्पी संस्कृतीची बेल बाॅटम आपण तशीच्या तशी स्वीकारली. मध्ये २००० च्या आसपास या बेलबाॅटमची सख्खी धाकटी बहीण "बूटकट" या नावाने चंचूप्रवेश करू पहात होती पण तिची फारशी डाळ शिजली नाही.
आताही स्त्रियांच्या पोषाखात पलाझो का प्लाझो म्हणून जे काही येतय ते बेलबाॅटमचे सावत्र भावंड असल्यासारखेच आहे. बघूया त्याची किती सद्दी राहते ते.
तात्पर्य काय ? चार दिवस बॅगी चे, चार दिवस बेल बाॅटमचे. पण खुद्द भारतीय सिनेसृष्टीचे महानायक, बच्चनसाहेब, जी घातल्यावर अगदी गचाळ दिसायचे ती बेलबाॅटम पुन्हा येणे नाही. आली तरी घालणे नाही.
Ram Ji, Iwas into bell bottoms upto 1990! Then no pleats and now half pleated pant and other plain! WAs quite motu!
ReplyDeleteRamakrishna Naidu