Friday, January 3, 2020

निरोपक्षण: एका कवितेची गोष्ट

कराडला असताना कराडचे चिमुकले स्टेशन हे माझ्यासारख्या रेल्वेवेड्यासाठी विरंगुळ्याचे ठिकाण नसले तरच नवल होते. सुट्टीच्या दिवशी, परीक्षे आधीच्या अभ्यासाच्या सुट्टीत (Preparation Leave) मध्ये मी आपली अभ्यासाची पुस्तके पाठीशी बांधून, हॉस्टेलमधल्या एखाद्या मित्राची सायकल घेऊन कराड स्टेशनची वाट धरीत असे. कराड स्टेशनच्या सातारा बाजूच्या आऊटर सिग्नलला खाली एक छान चौथरा होता. तिथे मी माझे अभ्यासाचे बस्तान बसवीत असे. आजुबाजूला अजिबात लोकवस्ती नव्हती. नुसती उसाची शेते. मी चक्क पुस्तकेच्या पुस्तके घडाघडा वाचीत असे. बालपणापासून अशीच अभ्यासाची, पाठांतराची सवय होती. हॉस्टेलला असे घडाघडा पाठांतर इतरांच्या अभ्यासात अडथळा आणणारे नक्की असणार हे मी जाणून होतो.

अशा आडजागी अभ्यासाला बसण्याचा आणखीही एक मोठ्ठा फ़ायदा होता तो म्हणजे येणा-या जाणा-या गाड्यांच्या वेळेवर स्टेशनवर जाऊन ती गाडी बघता यायची, नोंदी घ्यायच्या यायच्या. (अशाच एका नोंदीची कथा या ब्लॉगमध्ये आलेली आहे.)

त्या काळी कराड हे एक चिमुकले स्टेशन होते.पु.लं. च्या "काही अप्स काही डाऊन्स" मध्ये वर्णन केल्याप्रमाणेच. दिवसा फ़क्त तीनच प्रवासी गाड्या जाणा-या, तीन येणा-या. मिरज - पुणे पॅसेंजर, कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस, नागपूर- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस, मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस आणि पुणे - कोल्हापूर पॅसेंजर. बस्स. मालगाड्यांची वाहतूकही तुरळकच असायची.




सकाळी ८ वाजता मिरज - पुणे पॅसेंजरच्या वेळेला मी स्टेशनवर जात असे. पॅसेंजर पुण्याकडे गेली की स्टेशन्समोरच असलेल्या छोट्याशा हॉटेलमधे नाश्ता करून मी अभ्यासाला बसत असे. दुपारी ११ च्या सुमाराला कराड स्टेशनवर कोल्हापूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस आणि मुंबईकडे जाणारी कोयना एक्सप्रेस यांचे क्रॉसिंग होत असे. त्यावेळी पुन्हा प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन गाड्या बघून पुन्हा काहीतरी पोटात ढकलून मग मी थेट संध्याकाळी ४ पर्यंत अभ्यासात गर्क होत असे. मग नागपूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस बघून घेऊन चहा वगैरे पिऊन मी परतीची वाट धरीत असे. तोपर्यंत अभ्यासही छान झालेला असायचा. माझ्या अभियांत्रिकीच्या अभ्यासाशी रेल्वे अशी अविभाज्यपणे जोडल्या गेलेली आहे.

असाच एक दिवस. मिरज - पुणे पॅसेंजर कराडच्या फ़लाटावर आलेली होती. उतरणारे प्रवासी एखाददुसरेच. चढणारे पण हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच. मला कुठेच जायचे नसल्याने मी आपला निवांत एका बाकड्यावर बसून गाडी बघत होतो. 



गाडी सुटण्याची तयारी पूर्ण झालेली होती. इतक्यात एक मुलगा आणि एक मुलगी धावतपळतच फ़लाटावर आलेत. गाडी सुटलेली नाही हे पाहून उसासा टाकण्याचीही उसंत न घेता ती मुलगी गाडीच्या एका ड्ब्यात बसली. दोघांनीही क्षणभरच का होईना, हातात हात धरले होते आणि गाडी हलली.

गाडीने पुरेसा वेग घेईपर्यंत तो मुलगा त्या मुलीचा हात हातात घेऊन फ़लाटावर चालत होता. शेवटी वाढत्या वेगाने त्यांची ताटातूट केलीच. हातातून हात सुटले. मग गाडी दिसेनाशी होईपर्यंत तो मुलगा तिकडे बघत हात हलवीत होता. मुलीचाही हात गाडीतून असाच हलत असणार. जड पावलांनी तो मुलगा परतला. एकमेकांशी बरेच बोलायचे होते पण "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे" अशीच त्या दोघांचीही अवस्था मला बसल्या बसल्या भारावून टाकणारी, स्तब्ध करणारी होती.

त्या दोघांचे नक्की नाते काय होते ? याची आत्ता २७ - २८ वर्षांनंतरही मला कल्पना नाही. प्रियकर - प्रेयसी असतील, कदाचित खूप छान मित्र असलेले भाऊ - बहीण ही असतील. पण त्या घटनेने एका चांगल्या कवितेला जन्म दिला. ही माझी मी केलेली एक अत्यंत आवडती कविता आहे.

निरोपक्षण

निरोपक्षणी शब्द मुके, ओल्या काजळकडा
वसंतबहरात सुना, माझ्या बकुळीचा तो सडा.

काही देणे काही घेणे, राहूनच गेले तसे
क्षमेचे याचनेचे भान त्या हलत्या हातास नसे.

भावनालाटेवर स्वार, गहिवर आणि उमाळा
चित्र सारे धूसर दिसते, भरून आला डोळा.

अलविदाच्या अश्रूंत कृतज्ञता गोठलेली
संदर्भ पुसता सारे, घटना मनी कोरलेली.

                                                   - राम प्रकाश किन्हीकर




8 comments:

  1. खूप सुंदर वर्णन सर.... थोड्या वेळाकरीता अगदी मी सुद्धा कराड स्टेशन वरच आहे असे वाटले..

    तुमच्या स्मरणशक्तिला व सहज सुंदर लिखाणाला लाख सलाम.. 🙏🙏🙌🙌🙌

    ReplyDelete
  2. खूप सुंदर शब्दांकन सर.... थोड्या वेळाकरिता अगदी मी पण कराड स्टेशन वरच आहे असे वाटले..

    तुमच्या स्मरणशक्तीला व सहज सुंदर लिखाणाला लाख सलाम 🙏🙏🙌🙌

    ReplyDelete
  3. खूप सुंदर शब्दांकन सर.... थोड्या वेळाकरिता अगदी मी पण कराड स्टेशन वरच आहे असे वाटले..

    तुमच्या स्मरणशक्तीला व सहज सुंदर लिखाणाला लाख सलाम 🙏🙏🙌🙌

    ReplyDelete
  4. खूप सुंदर शब्दांकन सर.. 👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर आठवणी सर...कविता ही तशीच सुंदर.

    ReplyDelete
  6. खूप छान सर

    ReplyDelete