Showing posts with label चातुर्मास. Show all posts
Showing posts with label चातुर्मास. Show all posts

Wednesday, July 17, 2024

चातुर्मास संकल्प : चिंतन २०२४


आज आषाढी एकादशी. आजपासून आपला चातुर्मास सुरू. दिवाळी, दसरा, गणपती, महालक्ष्म्या यासारखे सणवार आणि श्रावण महिन्यासारखा संपूर्ण उत्सवी महिना याच कालावधीत येतो. आपल्यापैकी अनेक जण या कालावधीत काहीतरी संकल्प करीत असतात आणि थेट कार्तिकी एकादशीपर्यंत त्याचे पालन करीत असतात. या चार महिन्यांच्या कालावधीत एखादा पदार्थ जेवणातून पूर्ण वर्ज्य करणे, श्रावण महिन्यात रोज एकवेळेसच जेवणे वगैरे शारिरीक तपाचे संकल्प त्यात असतात तर एखादी पोथी, एखाद्या संताचे चरित्र रोज वाचणे, रोज श्रीविष्णुसहस्रनाम म्हणणे वगैरे अध्यात्मिक तपाचे संकल्पही त्यात असतात. तप म्हणजे तापून निघणे. शरीरासाठी रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे करून त्यात शरीर तापवायचे तसेच मनासाठी अशा अध्यात्मिक संकल्पांचे पालन करून त्याला वळण लावणे हा या संकल्पांमागचा हेतू.


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संकल्पांविषयी म्हणतात "संकल्प छोटा असला तरी चालेल पण तो रोज पाळता येईल असा, शाश्वताचा असावा. सातत्याला इथे फ़ार महत्व आहे." आपले मन हे आजवरच्या आपल्या कर्मांमुळे एखाद्या कठीण दगडासारखे झालेले आहे. त्या दगडावर थेंबथेंबच का होईना पण सातत्याने पाणी पडत गेले तर काही कालावधीत त्या दगडाला वेगळा आकार प्राप्त होईल पण हेच लाखो लिटर पाणी एकदमच त्या दगडावर ओतले तर तो दगड काही काळ ओला होईल पण पाणी वाहून गेल्यानंतर पुन्हा कोरडाच्या कोरडा. म्हणून एखादी गोष्ट सतत करत राहण्याला महत्व.


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या संकल्पांविषयी पुढे असेही म्हणतात "चातुर्मासात कांदा लसूण खाणार नाही हा शारिरीक तपाचा संकल्प तर महत्वाचा आहेच पण त्याहूनही महत्वाचा संकल्प म्हणजे चातुर्मासात मी कुणाचे मन दुखावणार नाही असा मानसिक तपाचा असू शकतो." हा मानसिक तपाचा संकल्प वरवर पाहता सोपा वाटतो खरा पण तो पालन करण्यास अत्यंत अवघड असा आहे. त्यासाठी संपूर्ण चातुर्मास आपल्याला आपले मन सजग ठेवावे लागेल आणि सतत ते मन विविध कसोट्यांवर घासून बघावे लागेल. या चातुर्मासात देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) ला देव झोपी जातात आणि थेट उत्थापिनी एकादशी (कार्तिकी एकादशी) ला देव त्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात अशी मान्यता आहे. अशावेळी आपण मनुष्यमात्रांचे मन कायम जागृत रहायला हवे म्हणून ते मानसिक तपाचे संकल्प.


या संकल्पांमध्ये "मी कुणाचीही निंदा नालस्ती करणार नाही." हा सुद्धा एक चांगला आणि तितकाच पाळायला कठीण असा मानसिक तपाचा संकल्प आहे. रोजच्या आयुष्यात इतरांच्या बद्दल आपण न्यायाधीश होण्याचे इतके प्रसंग येतात की असे एखाद्याबद्दल टीकाटिप्पणी न करता राहू शकणे ही अशक्य गोष्ट वाटते. पण परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज महाराज म्हणतात "अशी एखाद्याची निंदा करणे आवडणे म्हणजे शेण खाणे आवडण्यासारखे आहे." निंदानालस्तीचा अध्यात्मिक फ़टका फ़ार जोरदार बसतो आणि मुख्य म्हणजे आपल्याला तो कधीच कळत नाही. 


अशा संकल्पांमध्ये "मी कायिक वाचिक मानसिक हिंसा करणार नाही. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. त्या व्यक्तीने केलेली एखादी कृती मला कितीही न आवडणारी असली तरी ती त्याने मुद्दाम केलीय की त्याच्याकडून अनवधानाने झाली याचा विचार मी करेन." हा संकल्पसुद्धा जगातला किती ताप, संताप दूर करणारा ठरेल याचा विचार करा. आपण सर्वसामान्य प्रापंचिक माणसे. आपल्या आयुष्यातले जास्तीत जास्त ताप हे आपल्याच विचारांमुळे उत्पन्न होत असतात आणि त्यावरअधिकाधिक प्रतिक्रिया देऊन देऊन आपणच हे खूप मोठे करीत असतो. त्यापेक्षा या सांसारिक तापांवर या छोट्याच मानसिक तपाचा उपचार केला तर आपण सुखी राहू शकू असे नाही का वाटत ?


बरे आपण अशा मानसिक तपांना, संकल्पांना आजपासून सुरूवात केली तरी मानवी मन इतके विचित्र आहे की या तपाचा प्रभाव तत्काळ दिसावा अशी इच्छा ते करते. रोज रोज त्या तपाचा प्रभाव किती झाली याची परिक्षा घेण्याची आपल्याला इच्छा होते. अशावेळी श्रीदत्तसंप्रदायातील एक सत्पुरूष परम पूजनीय श्रीकृष्णदास आगाशे काका काय म्हणतात हे आपण पक्के ध्यानात ठेवलेच पाहिजे. आगाशे काका म्हणतात "एखादे बी आपण जमिनीत पेरले आणि झाड उगवण्याची वाट बघू लागलो तरी ते बीज फ़ळायला, अंकुरायला त्याला हवा तितका वेळ आपण द्यायलाच हवा. ताबडतोब ते झाड मोठे व्हावे हा अट्टाहास चुकीचा आहे आणि रोज ते झाड किती मोठे झाले हे जर आपण त्या पेरलेल्या जागेवर पुन्हा पुन्हा खणून बघू लागलोत तर ते झाड कधी रूजणारच नाही मग ते मोठे होण्याचा प्रश्नच नाही." तसेच आपल्या संकल्पाचे होईल. म्हणून आपल्या संकल्पाला किती फ़ळ आले याची लगोलग परिक्षा करीत बसून नये. आपण नेमाने ही मानसिक तपे आचरत गेलो तर आपल्या व्यक्तीमत्वातला फ़रक हा आपल्या सहवासातील इतरांना योग्य काळानंतर जाणवेल. तो जाणवून देण्याची घाई नसावी. संकल्पाचा अनुभव घेण्याची घाई नसावी. जगातले ताप संताप भगवंत जेव्हा दूर करतील तेव्हा करू देत पण आज माझ्या आतला ताप संताप माझ्या आतला भगवंत दूर करतोय का  हा अत्यंत गूढ, गुह्य आत्मिक अनुभव माझा मलाच घेणे आवश्यक आहे ही भावना असावी. आणि प्रत्येकाने हा विचार केला तर जगातले सगळे ताप संताप दूर होण्यासाठी भगवंताला अवतार घेण्याचीही गरज नाही.


मग करायची आजपासून ही सुरूवात ? अत्यंत सात्विक भावाने, वृत्तीने, केवळ भगवंतासाठी सोडायचे हे संकल्प ? असे भगवंतासाठी संकल्प सोडलेत तर त्याच्या फ़ळांची आस आपल्याला लागत नाही. घेता देता तोच आहे. त्याच्या मनाला वाटेल आणि माझे पूर्वकर्म जसे असतील त्याप्रमाणे, त्यावेळी तो मला फ़ळ निश्चित देईल. त्यावर माझा अधिकार नाही ही भावना मनात असली की मोकळेपणाने, मुक्त मनाने संकल्प आचरता येतील.


आपणा सर्वांना चातुर्मास संकल्प घेण्यासाठी आणि निष्काम आचरणासाठी अगदी मनापासून शुभेच्छा.


- आपल्या सर्वांच्या कृपेचा अभिलाषी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, July 8, 2020

पुरणपोळी : एक चिंतन

चातुर्मास म्हणजे पुरणपोळी करण्याचे भरपूर प्रसंग येणार. आखाडी चे पुरण, जिवतीचे पुरण, नागपंचमीचे कुळाचाराचे पुरणाचे दिंड मग काय पुरणच पुरण.

देशस्थांच्या पूजाविधानात "गोदावर्याः उत्तरे तीरे / दक्षिणे तीरे" चा उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे तसेच महाराष्ट्रीय माणसांच्या पुरणपोळीच्या प्रक्रियेत "गोदावरीचा उत्तर तीर की दक्षिण तीर" हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यातली मऊ, लुसलुशीत पुरणपोळी खाल्लेल्या व्यक्तीला गोदावरीच्या दक्षिण तीरावर केली जाणारी कोरडी, भगराळ पुरणपोळी पसंतच पडत नाही. मालेगाव आणि नाशिक फक्त ८० मैल दूर आहेत. पण पुरणपोळी करण्याच्या प्रक्रियेतला गोदावरीचा उत्तर तीर आणि दक्षिण तीर यातला फरक लगेच लक्षात येतो.
मुळात पुरणपोळी म्हणजे भरगच्च भरलेले ओले पुरण आणि वर जाणवेल न जाणवेल असा पोळीचा पापुद्रा अशी असते. साध्या पोळीत पुरणाचे कोरडे सारण भरलेला खुळखुळा म्हणजे पुरणपोळी नव्हे.
माझ्या आजवरच्या आयुष्यात मी खाल्लेल्या अविस्मरणीय पुरणपोळ्यांच्या तीन प्रमुख आठवणी.
१. औरंगाबादच्या माझ्या मावशीने (कै. सौ.मंदाताई पिंगळीकर) यांनी एकदा नागपूर मुक्कामात पुढाकार घेऊन आम्हा सर्वांना हौसेने खाऊ घातलेली पुरणपोळी. २७ वर्षांनंतरही ती पुरणपोळी आणि त्याची चव माझ्या स्मरणात आहे.
२. माझ्या आईने आणि माझ्या मामींनी (कै. सौ. मंगलामामी सगदेव) यांनी असंख्य वेळा खाऊ घातलेल्या पुरणपोळ्या. या दोघींच्या "हातची पुरणपोळी बिघडली" असे कुणी कधीही ऐकले अगर पाहिले नाही.
३. खान्देश वास्तव्यात असंख्य मित्रांकडे आणि मालेगावच्या "साई कार धाब्या"वर खाल्लेली पुरणपोळी.
पुरणपोळी करण्याच्या कौशल्याबाबत मी मराठवाडा, खान्देश, विदर्भ, गोवा (हो, पणजी शहरात एके ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पुरणपोळी मी खाल्लेली आहे. अगदी विदर्भाच्या तोडीची.) आणि नंतर पश्चिम महाराष्ट्राचा क्रम लावेन.
मुंबईत अजून पुरणपोळीचे नामकरण Stuffed Sweet Paratha असे झाले नाही इतकच. पुरणपोळी करण्याच्या आणि खाऊ घालण्याच्या बाबतीत "आनंदीआनंद"च आहे.
- महाराष्ट्राच्या खाद्य सांस्कृतिक भुगोलाचा आद्य व सखोल अभ्यासक, आपला खादाडखाऊ भोजनभाऊ, रामभाऊ पुरणपोळीकर.

Tuesday, July 4, 2017

कथा नवमीच्या कांद्याची

गेल्या पाच वर्षात दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र फ़िरून कायमचे स्थायिक व्हायला यंदा नागपूरला आलो आणि पुन्हा छानपैकी कांदेनवमी साजरी केली. मधल्या काळात हा सण विसरूनच गेलो होतो. आषाढी नवमीला (एकादशीच्या दोन दिवस आधी) या मोसमातले कांदे खाऊन संपवायचे. त्यांचे विविध प्रकार करायचेत. कांद्याच्या चकल्या (खास त्यासाठी आमचे आजोबा, काकेआजोबा, काका, मावसोबा आपापल्या धर्मपत्न्यांना, लेकी सुनांना उन्हाळ्यातच थोड चकलीच पीठ खास ठेवून द्यायला लावायचेत.) कांद्याची भजी, कांदेभात, कांद्याची थालीपीठ, कांद्याच पिठल हे सगळे पदार्थ विदर्भात काही वर्षांपूर्वी तरी मोठ्या उत्साहात होत असत. अजूनही ग्रामीण विदर्भात होत असतील. शहरे मात्र सगळी आता "मेट्रोज" झाल्यामुळे तिथले खाद्यसंस्कार बदलणे अपरिहार्य आहे.

आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास सुरू होतो त्यात कांदे, लसूण, वांगी इत्यादी पदार्थ ब-याच घरांमधून खाण्यासाठी वर्ज्य होतात. म्हणून मग मोसमातला शेवटचा कांदा, नवमीलाच खाऊन घ्यायचा हा या प्रथेमागचा उद्देश. मग "चातुर्मास कांदा आदि पदार्थ वर्ज्य का ?" या विषयावर आमच्या बालपणी आम्ही उगाचच हुच्च्पणाने घरातल्या वडीलधा-यांशी घातलेला वाद आठवला. तरूण वयात "वातूळ" शब्दाशी परिचय झालेला नसतो. वातविकार म्हणजे काय ? आणि हे विकार माणसाला काय "वात" आणतात हे जाणायला वयाची किमान चाळीशी तरी गाठावी लागते. मग एखाद्या वेळी पालेभाजी, वांग्याची भाजी नीट न पचल्यामुळे पोटात वात धरतो, कूलरसमोर रात्रभर झोप घेतल्यानंतर हाताची बोटे आखडतात. आणि मग वातूळ पदार्थ का खाऊ नयेत ? याच आपणच उपदेशन करायला लागतो.

मग आता चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे दिवस. पचनशक्ती नैसर्गिक रित्याच कमजोर झालेली असते त्यात पुन्हा वातूळ पदार्थ खाणे म्हणजे शरीर नामक यंत्रावर अत्याचार करणेच. म्हणून मग चातुर्मास कांदा लसूणादि वातूळ पदार्थ वर्ज्य. मग कांदेनवमीलाच घ्या सगळे हाणून.

पुन्हा मनात विकल्प आलाच की मग नवमीला का ? दशमीला का नाही ? व्रताचा आरंभ जर एकादशीपासून असेल तर मग मध्ये हे एक दिवसांचे बफ़र का ? मग हळूहळू आधुनिक विज्ञानाने उत्तर दिल की मानवी पचनसंस्था शाकाहारी पदार्थ पचवायला ३६ तासांपर्यंत वेळ घेत असते. मग नवमीला खाल्लेला कांदा पचन व्हायला एकादशी उजाडतेच. आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक ज्ञानाबद्दल अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टींमधली ही एक गोष्ट. कथा नवमीच्या कांद्याची.