आम्ही सगळेच पाहुणवेडे आहोत. बालपणापासूनच घरी आमचे दादामामा, मामी किंवा इतर मावशी, काका काकूमंडळी येणार असली की आमचा दसरा दिवाळीच सुरू व्हायची. या मंडळींबरोबर "नागपूर बससेवेचा गाईड" या नात्याने नागपूरात मनसोक्त भटकता यायचे. खूप निरनिराळ्या आप्त, संबंधी मंडळींची गाठभेट व्हायची. शाळा, क्लासेस बुडविण्याची आॅफिशियल परवानगी घरून असायची. मग काय ? आनंदा नाही तोटा.
महालक्ष्म्या घरी असताना मला अगदी तसेच वाटायला लागते. आपले कोणी तरी ज्येष्ठ, प्रेमळ नातेवाईक आपल्या घरी त्यांच्या मुलाबाळांसह मुक्कामाला आलेले आहेत. त्यांच्यासाठी काय करू ? आणि काय नको ? अशी मनाची लहान मुलासारखी अवस्था होऊन जाते.
आपण एवढ्यातच एक नवीन सूक्त शिकलोय. ते त्यांना म्हणून दाखवूयात ? की परवा आपण एक नवीन भजन शिकलोय. तेच म्हणूयात ? मनाची अशी अवस्था. स्वतःला ३० वर्षे लहान करून टाकणारी.
जाणते झालो. जबाबदार्या अचानक अंगावर पडायला लागल्यात. पती झालो, बाप झालो. मुले मोठी व्हायला लागलीत. आजही अशा महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी अचानक मुलांच्या वयाचे आपण आपल्यालाच दिसू लागतो. आपल्या वयाचे आपले वडील असतानाचा काळ जाणवू लागतो. अक्षरशः १२५ स्केअर फुटांच्या, मातीच्या भिंती असलेल्या जुन्या घरात महालक्ष्म्या करताना त्यांची कल्पकता, त्यांचे कष्ट प्रकर्षाने जाणवतात. बरे प्रसादासाठी निमंत्रित मंडळीही भरपूर. सगळी प्रेमाची मंडळी गैरसोयी सोसून, ऊनपाऊस झेलत सहभागी व्हायची. ते दिवसही प्रकर्षाने डोळ्यात दाटून येतात.
"आठवणी दाटून आलेल्या,
ओल्या पापण्यांत जपाव्यात.
आणि डोळ्यांतील पाण्यानेच,
आठवणींची पाने उलटावीत."
।। बारम्मा ।।
।। भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ।।
- कृपाभिलाषी (शरीराने वाढलेला असला तरी मनाने अजूनही शालेय वयाचा असलेला) चि. राम प्रकाश किन्हीकर,
कुहीकर वाडा, पोथी गल्ली, इतवारी, नागपूर.

No comments:
Post a Comment