Wednesday, September 2, 2026

दहिहंडीचे बदलते स्वरूप आणि आपल्या सगळ्यांचीच परिस्थितीशरणता

पुण्यातल्या गणेशोत्सवातल्या ध्वनीप्रदूषणाबद्दल आणि त्या उत्सवाच्या एकंदरच बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल समस्त पुणेकरांनी आवाज उठवायला सुरूवात केलेली ही एक अतिशय चांगली बाब गेल्या आठवड्यात घडलेली आहे. मला वाटतं, सगळ्या मराठी माणसांनी दहिहंडीच्या बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल सुद्धा असाच आवाज उठवायला हवा. पण अनेक वर्षांपासून आपण दहिहंडीचे सध्याचे स्वरूप पाहत आल्याने आपण सर्वांनी हेच स्वरूप वास्तव म्हणून स्वीकारलेय की काय ? अशी शंका मला येते. किंवा सध्याचे दहिहंडीचे स्वरूप बरोबर नाही पण आपण काहीही करू शकत नाही अशी परिस्थितीशरणता आपल्यात आलेली आहे की काय ? अशीही शंका माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात येते.


अनेक वर्षांपासून मुंबई ठाण्यात चाललेल्या या अतिशय फालतू चालिरीतीचे खूळ हळूहळू, गेल्या दहा पंधरा वर्षात चाणाक्ष आणि संतुलित समजल्या जाणार्‍या वैदर्भिय जनतेच्या मनात भरवून देण्याची टूम इथल्याही काही काही दिखाऊ, शोबाज राजकारण्यांमधे येत चाललेली पाहून मी अस्वस्थ झालो होतो. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा न ऐकता, "तो एक खेळ आहे" वगैरे भंकस युक्तिवाद करत, सोयीस्कर पळवाट काढून, सर्वपक्षीय राजकारण्यांनी ती दहिहंडी आपल्या बोकांडी मारलेलीच आहे. 


ती जास्तीत जास्त थरांची जीवघेणी स्पर्धा, त्यात ही असली जत्रा भरवून, आपला मोठेपणा दाखवण्यासाठी, भव्य मंच वगैरे उभारून, आपलीच तरूण मतदार मंडळी जखमी होताना, मरताना निर्विकारपणे पाहणारे, मध्ययुगीन राजे सरदारांच्या मानसिकतेचे आपले राजकारणी आणि कोट्यावधी रूपयांच्या लालसेला भुलून आपला आणि आपल्या सहकार्‍यांचा जीव पणाला लावणारी ती भुरटी दहीहंडी मंडळे. हे लोण विदर्भात कधीही नकोय.



विदर्भात गोकुळाष्टमी म्हणजे घरोघरी कान्होबाची मूर्ती आणून अष्टमीच्या रात्री तिची पूजा, रात्री भजन, मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचा आनंदोत्सव आणि दुस-या दिवशी घरच्या आणि आसपासच्या बाळगोपाळांसाठी छोटीशी दहीहंडी असे स्वरूप असते. दुस-या दिवशी इष्टमित्र, सोयरे धायरे यांच्यासह भोजन करणे असा आनंदी उत्सव असतो.



दहीहंडी उत्सवाचा आत्मा हा असा फार निराळा आहे रे. हे बाजारू स्वरूप म्हणजे दहीहंडी नाही. श्रीमदभागवतात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सामान्य कुटुंबातील सोबत्यांना, सवंगड्यांना दूध दुभत्याचा लाभ व्हावा, त्यांचीही शरीरे पुष्ट व्हावीत, त्यांना पुरेसे पोषण मिळावे म्हणून दहीदुभत्याच्या हंड्या फ़ोडल्या होत्या. आणि त्यातल्या मेव्याचे वाटप सगळ्यांना केले होते. वनात गुरे राखयाला जाताना श्रीमंत गरीब सगळ्यांनी एकत्र शिदोरी खाताना कुठलीही उच्च नीच भावना मनात सवंगड्यांपैकी कुणाच्याही मनात राहू नये, गरीबाला आपली शिदोरी सगळ्यांसोबत वाटून खाल्ल्याचे समाधान मिळावे म्हणून सगळ्यांच्या शिदोरीचा एकत्र गोपालकाला करून खाल्ला होता. ती भावना आजसुद्धा आपण रोजच्या व्यवहारात जोपासली तर आपल्या आपल्या सामाजिक वर्तुळात नकळतपणे किती समरसता आपोआप साधली जाईल याचा विचार आपण करायला हवा. तो खरा गोपालकाला, तो त्या श्रीकृष्णाचा संदेश. आज दहीहंडी साजरी करताना, गोपालकाला खाताना किती जणांना हे आठवते ?


बाय द वे, उंची वाढवण्यासाठी म्हणून ती क्रेनला बांधलेली दहीहंडी पाहून सूटबूट, गॉगल आणि मोजे घालून देवपूजेला बसणार्‍या बावळट माणसाला पाहिल्यासारख वाटत.

 

काहीही थेरं!


- दरवर्षी उत्सवात दहीहंडी फोडल्यावर त्या हंडीच्या आतले अस्सल सायीचे गोड दही मटकावणारा आणि दोन्ही मुठी भरून गोपालकाला खाणारा, पुराणकालीन कृष्णसखा, पैंदाराम.


No comments:

Post a Comment