Showing posts with label ज्येष्ठा कनिष्ठा गौरी. Show all posts
Showing posts with label ज्येष्ठा कनिष्ठा गौरी. Show all posts

Monday, September 21, 2026

भाव तसा देव

18/09/2026

आज सकाळपासूनच (तसे तर काल संध्याकाळपासूनच) मनात अपार खिन्नता दाटून आली होती. तशी ती गेल्या ४ वर्षांपासून या दिवसांमध्ये मनात येतेच.

१९७७ पासून आमच्याकडे असलेल्या महालक्ष्म्यांच्या सणात, ज्येष्ठा कनिष्ठा गौरी व्रतात  गेली ४ वर्षे सुपत्नी नसल्याने खंड पडलाय. या दिवसांमध्ये मनात अपार उत्साह असायचा, कामे करण्याचा उरक असायचा, घरात दिवाळीपेक्षाही अधिक उत्साहाचे वातावरण असायचे.

पण पहिल्यांदा वडील गेलेत, मग आई आणि त्यानंतर लगेचच सुपत्नीही अचानक निवर्तली. या उत्सवाचा इतका मोठा उरक आणि तयारी बघता आम्हा बापलेकांकडून हे होणे शक्य नव्हते. गेली चार वर्षे या पारंपारिक व्रतात खंड पडलाय. पण अजूनही हे दिवस आलेत की जुन्या अनेक आठवणींचे मोहोळ भूतकाळातून उठते आणि वर्तमानात आपल्या मनाला चावून चावून त्याच्या चिंधड्या चिंधड्या करते. कालपासून अशाच विध्द, खिन्न मनाने मी वावरत होतो.

आज घरी स्वयंपाक सुध्दा करावासा वाटेना. मग घराजवळच असलेल्या आणि साधे, ताजे आणि शुध्द मराठी थाळी पोटभर देणार्‍या भोजनालयात जाऊन बसलो. तिथे कायम गर्दी असल्याने एकच टेबल अनेकविध जणांसह वाटून घ्यावे लागते.

मी जिथे बसलो त्याच टेबलवर माझ्या अगदी समोर एक माझ्यापेक्षा कमी वयाचा तरूण बसला होता. किडकिडीत शरीरयष्टीचा, खोल गेलेल्या डोळ्यांचा, साधेसे कपडे अंगावर असलेला. 

माझे ताट येईपर्यंत मी बाजूच्या काचेतून बाहेर रस्त्यावर नजर टाकत होतो. एक अॅक्टीव्हा त्या भोजनालयासमोर थांबली. सुरेख, सुंदर नवरा बायको आत आलेत. नवरा माझ्याशेजारी आणि अगदी नवर्‍यासमोर त्याची सुपत्नी बसून जेवणथाळीची वाट बघू लागलेत. दोघांचेही कपडे अगदी टापटिपीचे होते. त्या स्त्री च्या अंगाखांद्यावर भरपूर दागिनेही होते. एकंदर सुखवस्तू, संपन्न जोडपे होते.

आमच्या थाळ्या पुढ्यात आल्यात तोवर बाहेर एक क्रेटा येऊन थांबली आणि त्यातून अत्यंत साध्या, थोड्या मळलेल्या, चुरगळलेल्या कपड्यांतले, क्रेटातल्या प्रवाशांना विजोड वाटावे असे एक जोडपे उतरले. भोजनालय अगदी फुल्ल असल्याने ते दोघेही आमच्याच टेबलवर येऊन बसलेत. माझ्याशेजारच्या छान कपड्यातल्या पुरूषाशेजारी तो पुरूष आणि त्याच्या अगदी समोर त्याची ती बायको. आमचे टेबल आता पूर्णपणे भरले. सगळ्यांच्या थाळ्या पटकन आल्यात. हातातोंडाची लढाई लढत पटापट सगळ्यांचे भोजन सुरू झाले. भोजन नेहेमीप्रमाणेच साधे, ताजे आणि सुग्रास होते.

माझे भोजन आटोपले, सोबतच दोन्हीही जोडप्यांची भोजने आटोपली आम्ही हात धुवायला उठलोत सुध्दा, पण माझ्यासमोर बसलेल्या तरूणाच्या जेवणाचे मध्यंतर सुध्दा व्हायचे होते हे माझ्या लक्षात आले. जेवत असताना दुसर्‍याच्या ताटाकडे, खाण्याकडे मुद्दाम लक्ष देऊ नये असा एक सभ्यतेचा संकेत आहे पण मुद्दाम लक्ष न देतासुध्दा मला आपोआप जाणवले की समोरच्या तरूणाच्या शरीरयष्टीच्या मानाने त्याचे खाणे अवाढव्यच आहे.

हात तोंड धुवायला मी उठलो आणि आत्तापर्यंत माझ्या लक्षात न आलेली एक गोष्ट चटकन माझ्या दृष्टीस पडली आणि माझे डोळे पाणावले. त्या तरूणाचे उदर त्याच्या शरीरयष्टीच्या मानाने भलतेच लांब होते. मनाच्या अगदी खोल खोल आत जाणवले की अरे आपण ज्याच्या अथर्वशीर्षाची कायम सहस्रावर्तने करतो तो लंबोदर तर हाच. आपल्या कल्पनेतल्या रूपातच देवाने आपल्याला दर्शन द्यावे हा आपला अट्टाहासच आपल्याला अनेक अलौकिक अनुभवांपासून वंचित ठेवतो.

अंतर्मनात ही जाणीव झाल्यासरशी मी त्या दोन जोडप्यांकडे पुन्हा बघितले आणि जाणवले की अॅक्टीव्हावरून आलेले सुंदर कपड्यातले, दागदागिने घातलेले जोडपे म्हणजे ज्यांच्या सहस्रनामांचा उच्चार आपण रोज करतो ते भगवान विष्णु आणि पुत्र नसला तरी आपला अत्यंत लाडक्या असलेल्या लंबोदराच्या बाजूला बसून भोजन करणारी श्रीविष्णुंची सुपत्नी महालक्ष्मी आणि साध्या कपड्यातले पण क्रेटातून आलेले अत्यंत श्रीमंत जोडपे म्हणजे प्रत्यक्ष माता पार्वती आणि पिता श्रीशंकर. मनोमन नमस्कार केला. मनातली खिन्नता पार पळाली होती. वर्षानुवर्षे ज्यांची आराधना केली, ज्यांची सूक्ते गायली, सहस्रनामजप केलेत, अभिषेक केलेत, ज्यांना नैवेद्य दाखवून भोजनाचे निमंत्रण केले ती सगळी मंडळी आज माझ्या मनाच्या खिन्न अवस्थेत अगदी अनपेक्षितपणे माझ्या पंक्तीला जेवलेली होती. माझ्या मनातला भाव तसा होता. आणि भाव तसा देव यावर माझी पूर्ण श्रध्दा आहे.

वाॅशबेसिनवर चूळ भरल्यानंतर हात तोंड पुसायला खिशातला रूमाल काढला खरा पण हाता तोंडाच्या ओलाव्यापेक्षा तो माझ्या डोळ्यांमधून वाहणार्‍या अश्रूंच्या ओलाव्यानेच जास्त भिजला. 

झाले, संपलेच ना आता इथले काम. मनुष्यजन्माला येऊन आता काय मिळवायचे राहिलेय इथे ? आपण आजवर करीत असलेल्या अनुष्ठानांची, व्रतांची, उपोषणांची सांगता आज झाली. आपण भरून पावलोत.

- "भाव तसा देव" यावर दृढ विश्वास असलेला आणि देव कुठल्याही रूपात आपली अनुभूती मनुष्यमात्रांना देऊ शकतो याचा अनुभव घेतलेला एक कृतकृत्य जीव, राम. 



Friday, September 18, 2026

महालक्ष्म्या (ज्येष्ठा कनिष्ठा गौरी) पूजन २०२०

* ज्येष्ठा कनिष्ठा गौरींनी आगमनाआधी पाहिलेली तन, मन आणि धनाची परीक्षा. मर्यादित संसाधनांची उपलब्धता.

* आजच्या दिवशीचा नेमका मुहूर्त साधून स्वयंपाक व इतर सेवा पुरवणार्‍यांनी वाढवलेले अव्वाच्या सव्वा दर.

* "मारे 'शेफ, शेफ' म्हणून मिरवत असतोस ना, मग दाखव आता तुझी शेफगिरी" हा गौराई कडून आलेला आणि हृदयाला जाणवलेला संदेश.

* "चला, आता या परीक्षेला बसून उत्तीर्ण होऊनच दाखवू" हे स्वीकारलेले आव्हान.

* सहधर्मचारिणीच्या साथीने पहाटे पासूनच अक्षरशः कंबर कसून (उत्तरीय कंबरेला बांधून) स्वयंपाकघरात केलेला प्रवेश.




* आपल्या आईला आज आपल्याकडूनच ही सेवा करून घ्यायची आहे या जाणीवेने आलेला अमाप उत्साह.

* पती पत्नींच्या सहा, साडेसहा तासांच्या मेहेनतीनंतर तयार झालेला प्रसाद.





* प्रसाद ग्रहण करणार्‍या अभ्यागतांनी त्यावर उत्तम अभिप्राय नोंदवल्यानंतर, डोळ्यांच्या कडांशी दडवलेले अश्रू.

।। सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा।। 

Thursday, September 17, 2026

महालक्ष्म्यांचा (ज्येष्ठा कनिष्ठा गौरी) सण आणि पाहुणवेडे आम्ही

आम्ही सगळेच पाहुणवेडे आहोत. बालपणापासूनच घरी आमचे दादामामा, मामी किंवा इतर मावशी, काका काकूमंडळी येणार असली की आमचा दसरा दिवाळीच सुरू व्हायची. या मंडळींबरोबर "नागपूर बससेवेचा गाईड" या नात्याने नागपूरात मनसोक्त भटकता यायचे. खूप निरनिराळ्या आप्त, संबंधी मंडळींची गाठभेट व्हायची. शाळा, क्लासेस बुडविण्याची आॅफिशियल परवानगी घरून असायची. मग काय ? आनंदा नाही तोटा.

महालक्ष्म्या घरी असताना मला अगदी तसेच वाटायला लागते. आपले कोणी तरी ज्येष्ठ, प्रेमळ नातेवाईक आपल्या घरी त्यांच्या मुलाबाळांसह मुक्कामाला आलेले आहेत. त्यांच्यासाठी काय करू ? आणि काय नको ? अशी मनाची लहान मुलासारखी अवस्था होऊन जाते.



 आपण एवढ्यातच एक नवीन सूक्त शिकलोय. ते त्यांना म्हणून दाखवूयात ? की परवा आपण एक नवीन भजन शिकलोय. तेच म्हणूयात ? मनाची अशी अवस्था. स्वतःला ३० वर्षे लहान करून टाकणारी.

जाणते झालो. जबाबदार्‍या अचानक अंगावर पडायला लागल्यात. पती झालो, बाप झालो. मुले मोठी व्हायला लागलीत. आजही अशा महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी अचानक मुलांच्या वयाचे आपण आपल्यालाच दिसू लागतो. आपल्या वयाचे आपले वडील असतानाचा काळ जाणवू लागतो. अक्षरशः १२५ स्केअर फुटांच्या, मातीच्या भिंती  असलेल्या जुन्या घरात महालक्ष्म्या करताना त्यांची कल्पकता, त्यांचे कष्ट प्रकर्षाने जाणवतात.  बरे प्रसादासाठी निमंत्रित मंडळीही भरपूर. सगळी प्रेमाची मंडळी गैरसोयी सोसून, ऊनपाऊस झेलत सहभागी व्हायची. ते दिवसही प्रकर्षाने डोळ्यात दाटून येतात.

"आठवणी दाटून आलेल्या,

ओल्या पापण्यांत जपाव्यात.

आणि डोळ्यांतील पाण्यानेच,

आठवणींची पाने उलटावीत."

।। बारम्मा ।।

।। भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ।।

- कृपाभिलाषी (शरीराने वाढलेला असला तरी मनाने अजूनही शालेय वयाचा असलेला) चि. राम प्रकाश किन्हीकर,

कुहीकर वाडा, पोथी गल्ली, इतवारी, नागपूर.

Sunday, September 19, 2021

भक्ताचे मनोव्यापार आणि भगवंताची रूपे

 मनापासून प्रार्थना करून बोलावल्यानंतर भगवतीच्या आगमनाच्या दिवशीचा त्यांच्या चेहेर्‍यांवरचा आनंद.




प्राणप्रतिष्ठापूर्वक षोडशोपचार पूजा करून, पंचदश संस्कारांप्रीत्यर्थ ॐ कार जपून केलेल्या पूजनानंतर आणि नैवेद्य निवेदन केल्यानंतरची आई जगदंबेच्या चेहेर्‍यावर आलेली तृप्ती.



विसर्जनाच्या दिवशी "यांतु देवगणाः सर्वे....पुनरागमनायच" म्हणताना आपल्या घशात आवंढा आलेला असतो त्यावेळी आलेले जगज्जननीच्या चेहेर्‍यावरचे व्याकुळ भाव.



भक्ताच्या मनोव्यापारांशी भगवंताची अशी नाळ जुळलेली असणे हेच आपल्या सण वारांचे खरे फलित.
मग महालक्ष्म्यांच्या या तीन दिवसांमध्ये १२५ चौरस फुटांच्या, मातीच्या भिंती आणि शेणाने सारवावे लागणार्‍या flooring वर अत्यंत चणचणीच्या आर्थिक परिस्थितीत आपल्या आईवडीलांनी अतिशय आनंदाने साजर्‍या केलेल्या महालक्ष्म्या आठवतात. उपाशीपोटी फुलोरा करायचा असल्याने सकाळची शाळा करून संध्याकाळपर्यंत उपाशी राहून फुलोरा करून पहिल्या वर्षी महालक्ष्म्या मांडण्याचे कार्य सुकर करून देणारी आपली दिवंगत आत्या आठवते. दरवेळी नैवेद्य प्रसाद करताना त्या त्या गोष्टींशी जुळलेल्या आठवणी दाटतात आणि दिवंगत आजी, आजोबा, वडीलांची आठवण येते.
श्रध्दापूर्वक स्मरण फक्त श्राध्दाच्याच दिवशी करायचे असते असे कुठाय ? अशा सणावारांमधूनही ते घडते आणि मग महालक्ष्मी आपल्या आईच्या रूपात दिसू लागते, तिची बाळं हे आपलेच सवंगडी वाटू लागतात आणि माहेरवाशिणीला निरोप देताना मन जड होऊन जातं.
कन्यारत्नाच्या लग्नाला अजून अर्धे तप तरी वेळ आहे पण तोपर्यंत माहेरवाशिण कन्येची पाठवणी करण्याचा प्रसंग या उत्सवांमधूनच अनुभवायचा असतो.
ताई, पुन्हा लवकर परतून ये बाई.
- श्रुतीस्मृती पुराणोक्त पूजेइतकाच भावपूर्ण आळवणीवर विश्वास असणारा एक व्याकुळ भक्त, राम प्रकाश किन्हीकर.