स्वतःच्या कर्तृत्वाच्या तामसी अहंकारापेक्षा मी इतरांपेक्षा कुणीतरी वेगळा आहे, मोठा आहे, ईश्वराचा लाडका आहे, सदगुरूंच्या जवळचा आहे हा आध्यात्मिक अहंकार जास्त घातक असतो.
काय होतं ? एखाद्या व्यक्तीला योग्यवेळी योग्य तो सत्पुरूष भेटतो, त्याला जीवनाचे योग्य ते मार्गदर्शन मिळते आणि त्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते. या प्रवासात सातत्य राखले तर त्या व्यक्तीला काही सिद्धींची प्राप्ती सुद्धा होते. दुस-याच्या मनातले ओळखणे, दुस-याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणून घेता येणे, बोललेले वाक्य खरे होणे वगैरे. या सिद्धी खरे तर भगवंताची कृपा असतात पण इथेच ती व्यक्ती फ़सण्याची शक्यता असते. ती व्यक्ती या सिद्धींना आपले साध्य मानते आणि त्यातच अडकून राहते. ही सिद्धी मला मिळाली म्हणजे मी कुणीतरी विशेष आहे अशी तिची भावना होते.
मग सुरू होते इतर जगाविषयी, जगातल्या इतर कमी नशिबवान व्यक्तींविषयी अनादराची भावना. तुच्छतेची भावना. आपण कुणीतरी विशेष आहोत, ईश्वराचे लाडके आहोत ह्या विशेषाधिकाराची भावना. इथेच त्या साधकाची आध्यात्मिक आणि आधिभौतिक घसरण सुरू होते. या क्षणैक सिद्धी लयाला जायला आणि त्या साधकाला आत्त्तापर्यंत गाठलेल्या साधनेच्या पायरीवरून पुन्हा तळाशी यायला वेळ लागत नाही.
पुरातन काळी एखाद्याने फ़ार तपःश्चर्या सुरू केली आणि तो देवलोकात सामील होण्यास पात्र होऊ लागला की त्यात अडथळे आणण्यासाठी देवलोकच पुढाकार घ्यायचेत. त्या तपस्वीसमोर ही देवमंडळी प्रलोभनांचे अनेक निसरडे डोंगर उभे करीत असत. जो तपस्वी हे अनंत प्रलोभनांचे, जगातल्या मोठेपणांचे डोंगर पार करून आपली तपस्या, साधना कायम राखीत असे, तोच शेवटी देवपदाला जाऊन पोहोचत असे. तसे आजही होत आहे.
या जगात मिळणारा मान, मोठेपणा हा महत्वाचा ? की आपल्या सदगुरूने सांगितलेल्या मार्गावरून जाऊन शेवटी होणारी परमेश्वराची प्राप्ती महत्वाची ? हा विचार प्रत्येक ख-या साधकाने आपल्या मनाशी करून इथल्या प्रलोभनांमध्ये, मान मरातबात, वैभवात किती गुंतायचे हे निश्चित करायला हवे. कारण या मार्गाच्या सुंदरतेतच गुंतून राहिलोत तर अंतिम ध्येय कसे आणि कधी गाठणार ? प्राचार्य राम शेवाळकरांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "येथल्या खेळात पाची प्राण माझे गुंतलेले" अशीच अवस्था आपल्या सगळ्यांची राहणार. आणखी किती कोटी जन्मे ? कुणास ठाऊक ? म्हणून इथे न गुंतता, आपल्या साधनेचा, आजवर आपण गाठलेल्या आध्यात्मिक उंचीचा अहंकार अजिबात न बाळगता, त्याविषयी अजिबात कुठेही वाच्यता न करता आपला मार्ग क्रमित राहणे हाच खरा ध्येयापर्यंत निश्चित पोहोचण्याचा उपाय आहे.
- सायंचिंतन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर, भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १९४८, 30/09/2026

No comments:
Post a Comment