Friday, October 16, 2026

दुर्मिळ ते काही - ११

कराडला शिकत असताना आम्हा नागपूरकर मुलामुलींना कराडला जायला आणि यायला एकमेव रेल्वेगाडी सोयीची होती ती म्हणजे महाराष्ट्र एक्सप्रेस. त्याकाळी पुणे ते कोल्हापूर हा रेल्वेचा एकेरी मार्ग होता. त्यामुळे नागपूर ते कराड जाताना कराडला कोल्हापूर ते मुंबई जाणारी कोयना एक्सप्रेस क्रॉसिंगची वाट बघत थांबलेली असे. आणि कराड ते नागपूर परतताना कराडला पुन्हा मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्सप्रेसचे कॉसिंग होत असे.


या गाडीतल्या प्रथम वर्गाच्या नॉन एसी (बिगर वातानुकुलीत) चेअर कार कोचने मला अक्षरशः भुरळ घातली होती. आपल्याकडे हवे तसे पैसे जमलेत ना की आपण या चेअर कार ने उगाचच एखादा प्रवास करूयात ही मनिषा मनात प्रबळ होती. पण हवेतसे पैसे जमेपर्यंत रेल्वेने ह्या प्रकारचा कोच गाडीला लावणेच बंद केले आणि याच्याऐवजी वातानुकुलीत चेअर कार या गाडीला लागायला लागली.


अगदी एव्हढ्यात आम्ही पाताळपाणी ते कालाकुंड ते पाताळपाणी या हेरीटेज रेल्वेने प्रवास केला. ही गाडी मीटर गेजची आहे. यात असलेल्या गार्ड कोचच्या अर्ध्या भागात प्रवाशांना बसण्यासाठी 2 बाय 2 अशा आसनव्यवस्थेची नॉन एसी (बिगर वातानुकुलीत) चेअर कार होती. या कोचने मी पुन्हा ३० - ३५ वर्षे मागे गेलो आणि भूतकाळात रमलो.


आधीच मीटर गेज दुर्मिळ. त्यात तिथल्या गार्डच्या अर्ध्या कोचमध्ये अशा प्रकारची सुंदर चेअर कार बघायला मिळणे दुर्मिळात दुर्मिळ.


या कोचचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कोचला असलेले संपूर्ण कोचच्या रूंदी इतके वॉशरूम. इतके मोठे वॉशरूम मी आजवर एखाद्या ब्रॉडगेज रेल्वेतही बघितलेले नाही. अक्षरशः एखादा टब बसेल एतकी रूंदी या वॉशरूमची होती. स्वच्छता छान होती. चेअर कारला लेगरूमही भरपूर होती. आधुनिक काळात आवश्यक असलेले मोबाईल चार्जिंग पॉईंटस पण प्रत्येक आसनांना होते. मस्त मोकळी ढाकळी अशी ही चेअर कार. दुर्मिळात दुर्मिळ.


- रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर



No comments:

Post a Comment