Thursday, November 12, 2026

सायकल रिक्षा आणि पुन्हा बालपणात गेलेला राम

राजाभाऊ किन्हीकर आपल्या महाल कोतवालीजवळच्या दुकानातून दोन लहान नातवांना घेऊन गणेश नगरच्या आपल्या घरी निघालेत.

सिटी कोतवालीजवळ आल्यानंतर एका सायकल रिक्षाला हात केला जातोय,

"ए, रिक्षा खाली है क्या ?" ("नागपूरकर मराठी माणसाची मातृभाषा हिंदी असते" पु.ल. देशपांडेंचे मत)

"चलो ना साब. कहा चलना है?" बालाघाट, राजनांदगाव, छिंदवाडा येथून आलेला अस्सल हिंदी रिक्षावाला..

"आझमशहा ले आऊट, गणेश नगर. कितना लेगा ?" राजाभाऊंचा प्रश्न.

"सव्वा रूपय्या होगा साब" रिक्षावाला.

"हे ! कुछ भी. बारा आने मे चलो." अनुभवी राजाभाऊ.

"क्या साब, तीन सवारी है. बाराने मे कैसा जमेगा ?" रिक्षावाला.

"अरे तीन सवारी काहे के ? दो बच्चेही तो है. बराबर बोल." राजाभाऊंची घासाघीस.

"ठीक है साब. एक रूपया दे देना. चलो बैठो." म्हणत रिक्षावाला रिक्षाचे ताडपत्रीचे फोल्डेबल टप लावून घेत सवारींना आत बसवण्याची तयारी करतोय.

"नही नही, रूपया नही. चलो, अस्सी पैसे देंगे." राजाभाऊ किन्हीकर.

"नही ना साब, नही पुराता." रिक्षावाला.

"जाने दो." म्हणत राजाभाऊ ऐन उन्हापासून बचाव होण्यासाठी आपल्या हातातली छत्री उघडून नातवांना छत्रीच्या सावलीत घेऊन महाल चौकाकडे चालायला लागतात.

कल्याणेश्वर मंदिराजवळ ते पोहोचतात न पोहोचतात तोच तो मघाचा रिक्षावाला मागून येतो "चलो साब अस्सी पैसे मे, बैठो."

"नही. अब अस्सी पैसे कैसे. हमलोग इतना चलके आये. अब सिर्फ साठ पैसे दूंगा." अत्यंत व्यावहारिक असलेले राजाभाऊ.

"अरे क्या साब, चलो, बाराने मे चलो." रिक्षावाला

"नही, अब साठ पैसेही." ठाम असलेले राजाभाऊ.

"आजोबा, चला ना, लवकर जाऊ न रिक्षातून" चिमुकल्या पावलांनी कोतवाली ते कल्याणेश्वर हे ५० मीटर्सचे चिमुकले अंतर चालून थकलेल्या नातवांपैकी राम.

"थांब रे. तुला काय कळतंय ? चलो भैय्या सत्तर पैसे दूंगा." राजाभाऊ.

शेवटी तो सौदा पक्का व्हायचा. आम्ही रिक्षात चढायचो. आमच्या आजोबांच्या bargaining power चे कौतुक आणि उन्हातान्हात अंगमेहेनतीने रिक्षा चालवणार्‍या त्या गरीब रिक्षावाल्याची कणव अशा संमिश्र भावना मनात घेऊन.

त्यानंतर मोठे झाल्यानंतर स्वकमाईने बर्‍याच वेळा अशा सायकल रिक्षांमध्ये बसलोत. असंख्य वेळा रिक्षाला चढाव लागला की स्वतःहून खाली उतरून रिक्षा ढकलत रिक्षावाल्याला ते ओझे हलके करायला स्वयंस्फूर्तीने मदत केलीय, असंख्य आठवणी.

कालौघात सायकल रिक्षांऐवजी बॅटरीवर चालणार्‍या रिक्षा आल्यात. चार आणे, आठ आणे यांच्यासोबतच सायकल रिक्षांचाही काळ संपला. आजोबा गेलेत, आई वडील गेलेत, एकेकाळी जवळची असणारी नातेवाईक मंडळीही परकी झालीत.

पण अचानक २०२६ मध्ये असा एखादा सायकल रिक्षा महालात दिसतो, वर्तमानाला पंख फुटतात आणि ते पंख कुणा एका प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकरला ४५ वर्षांपूर्वीच्या छोट्या रामला त्याच्या आजोबांसोबतच्या भूतकाळात नेऊन सोडतात. त्या काळच्या आठवणींनी जीव एवढाएवढासा होतो. मन तिथेच रमते. परत यावेसे वाटत नाही. आपण आपल्या आजोबांचा हात सोडून मोठे का झालो ? हा प्रश्न सलत राहतो, छळत राहतो.

त्यावर कुणीही उत्तर देऊ शकत नाही कारण त्यावर उत्तर नसतंच मुळी. काळाच्या ओघात तुम्हाला मोठे व्हावेच लागते, तुमच्याकडे किंवा जगातल्या कुणाकडेही  त्याशिवाय दुसरा पर्याय काळाने ठेवलेला नसतो.

डोळ्यातले पाणी पाहून सोबत असलेली कन्या विचारते, "बाबा, काय झालं?"

"काही नाही गं. महालात धूळ किती झालीय हल्ली. तोच एक कण गेला बघ डोळ्यात." रूमाल डोळ्याला लागतो. जगाला डोळ्यातला कण काढताना दिसतो पण खरेतर आठवणींचे अश्रू पुसायला तो डोळ्यांना लागणार असतो.

- दिवंगत आप्तांच्या स्मृतींनी कायम गहिवरलेला, राम.



No comments:

Post a Comment