Thursday, December 30, 2021

चंद्रपूर - नागपूर खाजगी बसेसची कथा

साधारण १९९२ च्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी बसेसचे पेव फ़ुटले. त्या बसेसनी महाराष्ट्र एस. टी ची कुठल्याही दोन शहरांमधल्या प्रवासाची मोनोपॉली मोडीत काढली. (महाराष्ट्र एस. टी. तून केलेल्या नागपूर - चंद्रपूर - नागपूर प्रवासाच्या आठवणी इथे आणि इथे) नागपूर - चंद्रपूर मार्गावरही खाजगी बसेस साधारणतः याच सुमारास दिसू लागल्या होत्या.

सुरूवातीच्या काळात हिंदुस्थान ट्रॅव्हल्सने इंदूर येथील विविध बॉडी बिल्डर्सने (सनातन, माळवा, भगिरथ) बांधलेल्या प्रकारच्या आणि डब्ब्यासारख्या चौकोनी (बॉक्सी) डिझाइनच्या बसेस नागपूर - चंद्रपूर मार्गावर पाठवल्या होत्या. २ बाय २ बसण्याची सोय, मनोरंजनासाठी टी. व्ही. आणि त्याला जोडलेला व्हीसीआर, पत्र्याच्या पण उंच पाठीच्या व ब-यापैकी जाड कुशन्स असलेल्या सीटस यामुळे खाजगी गाड्यांनी प्रवास करणे छान वाटायला लागले. बरे महामंडळाची एस. टी. नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी तेव्हा ३८ रूपये घ्यायची आणि हिंदुस्थान ट्रॅव्हल्सचे भाडे फ़क्त ४० रूपये. २ च रूपये जास्त देऊन आराम बसने प्रवास ही कल्पना प्रवाशांना आवडण्यासारखी होती. आणि त्यामुळे नागपूरला अगदी बसस्थानकाशेजारून सुटणा-या आणि चंद्रपूरला जटपुरा गेट्च्या अगदी बाहेरून सुटणा-या या गाड्या लोकप्रिय झाल्यात.




इंदूर बस बॉडीच्या बसचे हे फ़ोटो प्रातिनिधिक

MH - 31 / 6999, MH - 31 / 6200, MH - 31 / 7711 (ACGL made AC bus) ह्या बसगाड्या "हिंदुस्थान"कडे असल्याचे आठवते. नंतर मात्र हिंदुस्थानच्या मुस्लीम मालकाने मुस्लीम धर्मीयांमध्ये पवित्र मानल्या गेलेल्या 786 या अंकांना घेऊन गाड्यांचे पासिंग सुरू केले. मग "हिंदुस्थान" च्या गाड्या 1786, 2786, 3786, अशा नंबरच्या यायला लागल्यात.

तेव्हा आपल्या महामंडळाच्या बसेस ३ बाय २ अशा आसनव्यवस्थेच्या असत. पाठ टेकायला अतिशय कमी जाडीचा फ़ोम आसनांना असायचा आणि डोके टेकवण्याच्या जागी ब-याच वेळा मऊ आसनांऐवजी शहर बस सेवेत असतो तसा स्टीलचा दांडा असे. 


आ्पल्या एस. टी. च्या बसमधील ही आसने.

या बसेसना स्पीड लॉक असायचे. त्यामुळे बस जास्तीत जास्त ६५ किमी प्रतितास वेग धारण करू शकायची आणि त्यामुळे नागपूर ते चंद्रपूर या १५३ किमी च्या प्रवासासाठी (भद्रावती - वरोरा व जांबहे थांबे पकडून) ३ तास २० मिनीटे ते ३ तास ४० मिनीटे इतका वेळ लागायचा. त्यामानाने हिंदुस्थानची बस हा प्रवास अवघ्या ३ तासात पार पाडे. सोबत प्रवासात एक सिनेमाही बघून व्हायचा. मोबाईल्स, ओटीटी प्लॅटफ़ॉर्म्स यांच्या आगमनापूर्वीचा तो काळ होता. त्यामुळे प्रवाशांना त्या तीन तासातल्या करमणुकीचे आकर्षण असणे स्वाभाविक होते.

त्याच सुमाराला नागपूर - चंद्रपूर मार्गावर "मारवाह" नावाच्या ट्रॅव्हल्सने एकाच बसच्या माध्यमातून दिवसाच्या चार फ़े-या सुरू केलेल्या होत्या. नागपूरवरून सकाळी ६ व दुपारी २ तर चंद्रपूरवरून सकाळी १० व संध्याकाळी ६ अशा फ़े-या "मारवाह"ची ती एकुलती एक बस मारीत असे. ही बस सकाळी नागपूरवरून आपला प्रवास लॉ कॉलेज चौकातल्या पेट्रोल पंपापासून सुरू करीत असे आणि रात्री ९ वाजता आपला प्रवास तिथेच संपवत असे. त्यामुळे पश्चिम नागपुरात राहणा-यांना ही बस चंद्रपूरला जायला आणि यायला सोयीची पडत असे. या प्रवाशी मंडळींचा गणेशपेठ बसस्थानकापासून पश्चिम नागपूरातील त्यांच्या घरापर्यंत जाण्यायेण्याचा खर्च ही बस कमी करीत असे. पण या बसचे तिकीट "हिंदुस्थान" ट्रॅव्हल्सच्या तिकीटापेक्षा तब्बल २५ % नी महाग असायचे. "हिंदुस्थान" नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी ४० रूपये आकारत असे तर "मारवाह" मधल्या त्याच प्रवासाचे ५० रूपये द्यावे लागत. त्यामुळे "हिंदुस्थान" म्हणजे "दीवान - ए -आम" सफ़र असायची तर "मारवाह" म्हणजे "दीवान - ए - खास".

"मारवाह" ची बसही आझाद या बस बॉडी बिल्डरकडे बांधलेली असायची. त्याकाळी दक्षिणेकडील सगळेच बस बॉडी बिल्डर्स बसेस बांधताना समोर ग्रीलसाठी, आत खुर्च्यांसाठी, खिडकीच्या सुरक्षा बार्ससाठी भरपूर स्टेनलेस स्टीलचा वापर करीत असत. "आझाद" कडे व्होल्वो बांधण्याचे काम आल्यानंतर आणि "सतलज" बांधणीच्या गाड्या त्यांच्या मोल्डेड फ़ायबर पॅनेल्सच्या वापरामुळे जास्त लोकप्रिय होऊ लागल्यानंतर सगळेच दाक्षिणात्य बॉडी बिल्डर्स मोल्डेड फ़ायबर पॅनेल्स कडे वळलेत. "मारवाह" च्या बसचे तिकीट जास्त असल्याने की काय ? या बसेस आतून बाहेरून चकाचक असायच्यात. साधारण १९९४ नंतर या बसेस आणि ही ट्रॅव्हल दिसणे बंद झाले.


मारवाहच्या बंगलोर बॉडीच्या बसचे हे फ़ोटो प्रातिनिधिक

साधारण १९९१-१९९२ मध्ये गोव्याच्या एसीजीएल (Automobile Corporation of Goa Limited) ने थोड्या सुबक बांधणीतल्या बसेस बाजारात आणायला सुरूवात केली. या बसेसमध्ये त्यांनी फ़ायबर पॅनेल्सचा वापर मोठ्या प्रमाणात करायला सुरूवात केली. दिसायला सुबक आणि आत थोडी आरामदायक अशी ही बस अल्पावधीतच लोकप्रिय झाली. बसेसमध्ये ए.सी. लावण्याचे प्रयोग इंदूरमधल्या बस बॉडी बिल्डर्सनीही केलेले होते पण ACGL चे एअर कंडिशनिंग आणि त्याचे डक्टस जास्त सुबक आणि आटोपशीर होते. नागपूर - चंद्रपूर मार्गावर "परफ़ेक्ट ट्रॅव्हल्स"ने अशी ACGL body ची पहिली ए.सी. लक्झरी बस आणलेली आठवते. (MH 34 / A 8589)


पण १९९२ च्या डिसेंबरमध्ये चंद्रपूरचे तत्कालीन नगराध्यक्ष श्री गयाचरण त्रिवेदी उर्फ़ धुन्नू महाराज यांनी "गणराज ट्रॅव्हल्स" या नावाने नवीन बस कंपनी उघडून या मार्गावर पुढील १७-१८ वर्षे अनिभिषिज्ञ राज्य केले. पांढ-या रंगावर लाल + हिरवा + काळा पट्टा असलेल्या एकसारख्या रंगसंगतीच्या, आरामदायक, वेळेवर निघणा-या आणि अगदी वेळेवर पोहोचणा-या, नागपूर आणि चंद्रपूर दोन्ही बाजूंनी सोयीच्या वेळा असणा-या या बसेस अतिशय लोकप्रिय झाल्यात. या बसेसचे बुकिंग किमान १ दिवस आधी करावे लागत असे. सगळ्या बसेस एअर कंडिशन्ड होत्या.







गणराज ट्रॅव्हल्सच्या बसेसची सुरूवातीची आणि नंतरची रंगसंगती. All ACGL bodies.

या बसेसचे तिकीट म्हणजे जणू विमानाच्या तिकीटासारखेच असे. या बसने प्रवास करणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. नागपूरला अगदी बसस्थानकाशेजारी तर चंद्रपूरला जटपुरा गेटच्या आतून या बसेस निघायच्यात. सुरूवातीच्या काळात चंद्रपूरवरून आणि नागपूरवरूनही सकाळी ६.००, १०.००, दुपारी २.०० आणि संध्याकाळी ६.०० अशी ही बससेवा उपलब्ध असे. MH - 34 / A 8886 आणि MH - 34 - A 8889 अशा दोन बसेसनी सुरू झालेली ही सेवा नंतर विस्तारत गेली. धुन्नू महाराजांना 88 आकड्याचे विशेष आकर्षण असावे. कारण या बसेससोबत त्यांनी ACGL ची एक छोटी बस पण चंद्रपूर - सिरोंचा प्रवासासाठी घेतली होती तिचा नंबर  MH - 34 / A 8887 असा होता तर त्यासोबतच त्यांच्या स्वतःच्या टाटा इस्टेट कारचा नंबर MH - 34 / A 8888 असा होता. एव्हढेच नाही तर या बसेसना मिळणारा तुफ़ान प्रतिसाद पाहून त्यांनी यानंतर जो बसेसचा ताफ़ा घेतला त्यांचे नंबर्सही MH - 34 / A 8882, MH - 34 / A 8884, MH - 34 / A 8883, MH - 34 / A 8891  असेच होते. आता दररोज एकाबाजूने ४ फ़े-यांऐवजी एकाबाजूने ८ फ़े-या व्हायला लागल्यात. सोमवारी सकाळी किंवा एखादी मोठी सुट्टी संपण्याच्या पहिल्या दिवशी सकाळी सकाळी ६.०० वाजताच्या चंद्रपूर - नागपूर बसचे बुकिंग तुफ़ान वाढल्यास सकाळी ६.३० वाजता दुसरी शॅडो बस सोडण्याचेही नियोजन गणराज ट्रॅव्हल्स करू शकत असे. 





हेच ते विमानाच्या तिकीटाच्या धर्तीवर दिले जाणारे गणराज ट्रॅव्हल्सचे तिकीट.




आणि हे मूळ इंडियन एअरलाईन्सचे तिकीट. किती साम्य आहे नाही ?

त्यादरम्यान नागपूर - चंद्रपूर प्रवासासाठी बागडी ट्रॅव्हल्सनेही स्वतःची बस उपलब्ध करून दिलेली होती. पहाटे ५.४५ वाजता चंद्रपूरच्या गांधी चौकातून बस सोडून शहरवासियांचा शहरातून जटपुरा गेट आणि बसस्टॅण्डपर्यंतचा (५ रूपये प्रतिमाणशी) रिक्षा खर्च वाचविण्याची क्लृप्तीही त्यांनी सुरूवातीला शोधून काढलेली होती. पण गणराजच्या स्पर्धेत ते टिकू शकले नाहीत. पहाटेची फ़ेरी सोडली तर अजूनही बागडी ट्रॅव्हल्सच्या रोजच्या फ़े-या तेव्हढ्याच आहेतच पण गणराज ट्रॅव्हल्सएव्हढे नाव ते कमावू शकले नाहीत.

वरो-याच्या बाबु गोवर्धन ट्रॅव्हलनेही या मार्गावर आपल्या गाड्या पाठविल्याचे स्मरते. त्यांच्याही बसेस टिपीकल इंदूरी बांधणीच्या असायच्या. काही विशेष गोष्ट त्यांच्या बसमध्ये नसल्याने ते सुद्धा also ran  या गटात सामील झालेत. बससेवेतून निवृत्त झाल्यानंतर बरीच वर्षे वरो-यात व्होल्टास फ़ॅक्टरीनंतर एका शेतात त्या बसेस पडून राहिल्या होत्याचे आठवते. MH - 34 / A 9000 आणि MH - 34 / A 0009 अशा उलटसुलट नंबरच्या त्यांच्या बसेस असायच्यात.

महाकाली ट्रॅव्हल्स, धनश्री ट्रॅव्हल्स या गाड्याही त्याकाळी एक जाण्याची आणि एक येण्याची फ़ेरी चालवायच्यात. मला कौतुक वाटते ते "महाराजा" ट्रॅव्हल्स नामक ट्रॅव्हल्सचे. विदर्भाच्या अगदी टोकाला असलेल्या गडचांदूर या अडनिड्या गावातून गेली २८ वर्षे ते आपली एअर कंडिशन्ड आराम गाडी सकाळी ६.०० वाजताच्या वेळेवर चालवताहेत. सकाळी ७.३० ला ही फ़ेरी चंद्रपूरवरून नागपूरसाठी निघते आणि परतीच्या नागपूर - गडचांदूर प्रवासाला ही फ़ेरी नागपूरवरून संध्याकाळी ५.०० वाजता निघते. "महाराजा" ही एकच गाडी चालवतो. ही गाडी छान, नीटनेटकी आणि कायम व्यवस्थित निगा राखलेली असते. एव्हढ्या वर्षात "महाराजा" ट्रॅव्हल्सने अनेक गाड्या बदलल्यात पण वेगवेगळ्या नंबर सिरीजमधले त्यांचे नंबर्स मात्र एकच. 009. 

काळ हळूहळू पुढे सरकला. जुन्या मोठ्या टीव्ही खोक्यांऐवजी एल इ डी स्क्रीन्सचे टीव्ही आलेत. जुन्या व्हीसीआर ऐवजी साधा पेन ड्राइव्ह टीव्हीला लावून मनोरंजनाची सोय झाले. नागपूर - चंद्रपूर रस्ता पूर्णपणे चार पदरी झाला. एस. टी. च्या बसेससुद्धा ३ तासात हा मार्ग कापू लागल्यात. पण खाजगी वाल्यांची हाव वाढायला लागली. ३५ ऐवजी ५० प्रवासी बसवून बसेस जायला लागल्या. ३५ आसनव्यवस्था, ५ प्रवासी केबिनमध्ये, आणि १० प्रवासी दोन आसनरांगांमध्ये प्लॅस्टिकच्या खुर्च्या / स्टूल्स टाकून. मग गेल्या १० वर्षांपासून पूर्ण ३५ आसनांची बस भरून नेण्याऐवजी २० - २२ आसनांच्या मिनी बसेस लवकर भरतील आणि डिझेल खर्चालाही परवडतील असे सगळ्यांच्या लक्षात आले. महाकाली, बागडी, हिंदुस्थान यांनी या मिडी बसेस आणल्यात आणि फ़े-या सुरू केल्यात. गणराज ने ही नवीन बसेस मोठ्या न आणता अशा मिडी बसेस आणून सेवा द्यायला सुरूवात केली. पण त्यात सगळ्यांचाच दर्जा घसरला. आता वेळांविषयी, सेवांविषयी, विशिष्ट रंगसंगतीविषयी सांगावे असे काही राहिले नाही. नाही म्हणायला मधल्या काळात गणराजने ६० आसनी मल्टी ऍक्सल मर्सिडीज बसेस (ज्यात शेवटल्या प्रवाशालाही सिनेमा नीट दिसावा म्हणून तीन तीन टी. व्ही स्क्रीन्स लावलेल्या होत्या) नागपूर - चंद्रपूर प्रवासासाठी आणल्या होत्या पण काही कारणांनी हा प्रयोग अयशस्वी ठरला. या बसेस गेली दोन तीन वर्षे जांबला खाजगी जागेत पडून राहिलेल्या आहेत.



याच त्या "गणराज’ ने चालवलेल्या पण काही कारणांस्तव यशस्वी न होऊ शकलेल्या मर्सिडीज बसेस. सध्या जांबला हॉटेल अशोका शेजारी नुसत्या पडून आहेत.

गेल्या ५ वर्षात गणराज सारखीच डीएनआर नावाची एक नवी ट्रॅव्हल कंपनी नागपूर - चंद्रपूर मार्गावर आपला दबदबा प्रस्थापित करते आहे. एकसारख्याच तांबेरी (copper) रंगाच्या बसेस, सगळ्या बसेसचे शेवटले दोन नंबर 77. (या ट्रॅव्हल मालकाला 77 हा नंबर लकी दिसतोय. कारण त्यांचे सगळे फ़ोन नंबर्सच्या पण शेवटी 77  च आहेत.) बहुतेक सगळ्या बसेस वीरा कोच, बंगलुरू कडून बांधून घेतलेल्या. एखादीच ACGL वाली बस यांच्या ताफ़्यात असेल. सगळ्या बसेस एकजात वातानुकुलीत. व्यवस्थित निगा राखलेल्या. त्यामुळे गणराज मधून प्रवास करणारा अभिजन वर्ग (Elite Class) यांनी आजकाल स्वतःकडे खेचून घेतलेला आहे. 




DNR च्या बसेस.

जेव्हा या खाजगी गाड्या नव्या नव्या सुरू झालेल्या होत्या तेव्हा त्यांच्यात दाखवण्यात येणा-या सिनेमांची सगळ्या लोकांमध्ये एक क्रेझ होती. असाच एक प्रसंग. आम्ही नागपूरवरून चंद्रपूरला निघालो होतो. बसमधल्या टी. व्ही वर नुकताच आलेला एक रहस्यमय सिनेमा लावलेला होता. तीन तासांच्या प्रवासात तो सिनेमा जवळजवळ संपतच आलेला होता. त्यातले रहस्य उलगडायला आलेले होते. इतक्यात चंद्रपूर शहराच्या पहिल्या थांब्यावर बस पोहोचलीदेखील. "बापट नगर वाले उतरून घ्या" असे तो क्लीनर मोठ्याने ओरडला. एक दोन प्रवासी उतरलेही पण एक प्रवासी मात्र उतरण्याच्या बेतात बसच्या दारापर्यंत गेलेला थांबला आणि म्हणाला जाऊदे, मी पुढल्या स्टॉपवर उतरतो. "काऊन गा, तुले त इथेच उतरायच होत न ?" क्लीनरने त्याला विचारले. त्याने कदाचित बसमध्ये बसतानाच क्लीनरला तसे सांगून ठेवलेले असावे आणि क्लीनर लोकांची स्मरणशक्ती याबाबतीत फ़ार तीक्ष्ण असते. "जाऊ दे न गा, जनता कॉलेजपाशी उतरतो." म्हणत तो प्रवासी उतरणा-या पाय-यांवर तिथेच तो उरलेला सिनेमा बघत बसला. जनता कॉलेज म्हणजे बापट नगरवरून बसने दोनच मिनीटांवर. तो सिनेमा संपलेला नव्हताच. मग तो प्रवासी म्हणाला, " चाल आता आखरी स्टॉपपावतरच येतो तुयासंग. हा पिच्चर त बहीन संपूनच नाही राह्यला." त्या सिनेमाच्या पटकथाकाराला, दिग्दर्शकाला ती खरी पावती होती. कारण सिनेमातले ते रहस्य उलगडावे म्हणून तो प्रवासी चक्क ५ किमी पुढे प्रवासकर्ता झाला होता. शेवटल्या स्टॉपवर (जटपुरा गेटला) तो सिनेमा संपला आणि तो प्रवासी उतरून पाच रूपयांचा शेअर रिक्षा करून बापट नगरला परत गेला. त्याच्या या अव्यवहारी पणावर आम्ही मात्र मनसोक्त हसलो. कारण तोच सिनेमा चंद्रपुरात त्यावेळी लागलेला होता आणि चंद्रपुरातल्या सगळ्यात प्रतिष्ठित समजल्या जाणा-या जयंत टॉकीजचे बाल्कनीचे तिकीट तेव्हा ३ रूपये ६० पैसे होते आणि बॉक्सचे ४ रूपये ५० पैसे. पण बसमधल्या फ़ुकट सिनेमाच्या मोहात त्या माणसाने रिक्षाला ५ रूपये खर्ची घातलेले होते.

- बसेस आणि रेल्वेचा एक विचक्षण अभ्यासक, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.







1 comment: