तसा महाराष्ट्र देश हा रेल्वे जाळ्याच्या बाबतीत मागासलेला आहे. मुंबईत भारतातली पहिली रेल्वे धावली आणि आज रोजच्यारोज भारतातल्या एकूण प्रवासी मंडळींपैकी 50 % प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात म्हणून रेल्वे प्रशासनाला थोडेतरी लक्ष तिकडे द्यावे लागते. पण ते ही पुरेसे नाही. इतर महानगरांमधल्या फ़ारशी प्रवासी संख्या नसलेल्या लोकल प्रवासी वाहतुकीकडे जे लक्ष दिले जाते तितके लक्ष मुंबई लोकल प्रवासी वाहतुकीकडे दिल्या जात नाही ही वस्तूस्थिती आहे.
कोकणात रेल्वेचे नियोजन तर 1970 च्या दशकात झालेले होते पण रेल्वे यायला
1998 उजाडले. अजूनही कोकण रेल्वेचा म्हणावा तसा फ़ायदा कोकणी जनतेला झालेला नाही.
पश्चिम महाराष्ट्र जरा विकसित पण रेल्वे जाळ्याच्या बाबतीत तिथेही बोंबच आहे. इतके वर्षात नीरा ते फ़लटण मार्ग अस्तित्वात आलेला आहे पण अजूनही बारामती - नीरा, फ़लटण - जरंडेश्वर, कराड - चिपळूण हे मार्ग रखडलेलेच आहेत. लोकमानसाचा अंदाज असलेले वजनदार राजकारणी इथे असूनही.
खान्देशात मुंबई - कलकत्ता / इटारसी आणि जळगाव - सुरत हे दोन मार्ग
वगळता काहीही नाही. मनमाड - मालेगाव - धुळे - इंदूर मार्गाची घोषणा झालीय खरी पण
तो अस्तित्वात येईल तेव्हा खरा असे म्हणायची पाळी इतर अनुभवांवरून येत आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी मराठवाडा तर निझामच्या ताब्यात होता. अजूनही पूर्वीच्या निझाम स्टेट रेल्वे (सध्याच्या दक्षिण मध्य रेल्वे) च्याच ताब्यात आहे. मराठवाड्याच्या रेल्वे विकासाचे त्यांना काहीही सोयरसुतुक नाही ही बाब तर उघड आहे पण आपल्या मातीतल्या राजकारण्यांना सुद्धा त्याचे काही वाटू नये ही खरी दुःखाची बाब आहे.
सगळ्यात शोचनीय अवस्था विदर्भाची आहे. इथले अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे (नव्हे पिढयानुपिढ्या) तसेच रखडलेले आहेत. त्यातल्याच काहींचा आढावा मी इथे घेणार आहे. विदर्भानंतर मराठवाडा - खान्देश - पश्चिम महाराष्ट्र - कोकण आणि सगळ्यात शेवटी मुंबई उपनगरीय रेल्वेचा आढावा मी इथे घेण्याचे ठरवलेले आहे.
1. मुंबई - हावडा मार्गाने विदर्भ भूमीत प्रवेश केल्या केल्या गेली 50
वर्षे रखडलेला जलंब - खामगाव - जालना
मार्ग.
यातला फ़क्त जलंब ते खामगाव हा मार्ग एव्हढा 15 किमीचा मार्ग अस्तित्वात
आलेला आहे. जलंब ते खामगाव या मार्गावर बरीच वर्षे रेल - बस चालायची. आता एक तीन
डब्यांची पॅसेंजर गाडी चालते. खरेतर मध्ये चिखलीपाशी थोडीशी डोंगररांग सोडली तर
जलंब ते जालना हा संपूर्ण मैदानी प्रदेशातून जाणारा मार्ग. ती डोंगररांगही अगदी
सह्याद्रीसारखी मोठी नव्हे. तर अगदीच पिटुकली. मग इथे आव्हान भौगोलिकतेचे नसून
इथल्या राजकारण्यांच्या इच्छाशक्तीचे आहे हे लक्षात येते.
हा साधारण 170 किमी चा मार्ग अस्तित्वात आला तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एक महत्वाचा दुवा अस्तित्वात येईल. आज नागपूर ते औरंगाबाद जाण्यासाठी अकोला - हिंगोली - पूर्णा - परभणी - जालना असे किंवा द्राविडी प्राणायाम करीत माजरी - वणी - आदिलाबाद - मुदखेड - नांदेड - पूर्णा - परभणी - जालना असे जावे लागते. ते अंतर कमी होईल. अकोला - बुलढाणा - जालना जिल्ह्याच्या कायम मागास भागाच्या विकासासाठी हा मार्ग संजीवनी ठरेल.
2. जलंब नंतर थोडे पुढे आल्यानंतर रूंदीकरण रखडलेला अकोला - खांडवा
मार्ग. एकेकाळी जयपूर - चित्तोडगड - रतलाम - इंदूर - महू - खांडवा - अकोला -
पूर्णा - काचीगुडा ते थेट मदुराई पर्यंत हा मीटर् गेज मार्ग होता. मीनाक्षी
एक्सप्रेस ही मीटर गेजचीए राणी एकेकाळी जयपूर ते मदुराई धावायची. हळूहळू मार्गाचे
रूंदीकरण होत गेले आणि मीनाक्षी एक्सप्रेसचा मार्ग आकुंचन पावत गेला. 2005 मध्ये
आम्ही या गाडीने इंदूर ते अकोला प्रवास केला तेव्हा ही गाडी जयपूर ते पूर्णा या
मार्गापुरती धावत होती.
3. वर्धा - यवतमाळ - नांदेड या प्रकल्पाला सुरूवात झालेली आहे. पण
प्रकल्पाचा वेग खूपच मंद आहे. वर्धेनंतर कळंब पर्यंत भरावाचे काम झालेले आहे.
यवतमाळ रेल्वे स्टेशनचेही काम झालेले दिसले. पण यवतमाळ - आर्णी - महागाव मार्गाचे
काम दृष्टीपथात नाही. नांदेड ते नागपूर जोडणारा हा मार्ग लवकरात लवकर होणे अत्यंत
आवश्यक आहे.
खरेतर या मार्गांना जोडणारे अधिकाधिक नवे मार्ग तयार व्हावेत आणि
विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला त्यांनी हातभार लावावा ही इथल्या जनतेची आंतरिक
इच्छा आहे.
दोन: मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गाचे रूंदीकरण झाल्यानंतर बडनेरा - कारंजा (जं) - वाशिम (जं) असा पश्चिम विदर्भाच्या हृदयातून जाणारा आणि या भागाचा सर्वांगीण विकास साधणारा मार्ग नियोजित करता येईल.
तीन : दुस-या महायुद्धात ब्रिटीश सरकारकडून डी पी मार्ग उखाडण्याची सूचना रेल्वेला प्राप्त झाली होती. खरेतर तो पोखरणकडून राजस्थानमधल्या सीमावर्ती भागात जाणारा एक रेल्वे मार्ग होता. (पी : पोखरण) पण तेव्हाचेही राज्यकर्ते विदर्भविरोधी होते की काय कोण जाणे ? त्यांनी डी पी चा अर्थ दारव्हा - पुसद असा लावून हा नॅरो गेज मार्ग उखडून टाकला होता. अजूनही या नॅरो गेज मार्गावरचे भराव त्या मार्गाच्या गत अस्तित्वाचे दाखले देत आहेत. दारव्हा मोतीबाग इथे नॅरो गेज एंजिनांचे वर्कशॉप होते आणि दारव्हा हे जंक्शन स्टेशन होते. आता यवतमाळ ते मूर्तिजापूर मार्गाचे रूंदीकरण झाल्यावर दारव्हा (जं) ते पुसद हा रेल्वेमार्ग उभारून त्याला पुढे वाशिम (जं) पर्यंत वाढवायला हवे आहे.
विदर्भाच्या विकासासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कामांकडे बारकाईने लक्ष देण्याची आणि नवनवीन मार्गांच्या उभारणीची मागणी करण्याची नितांत आवश्यकता आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत जागरूकपणे लक्ष देण्याची गरज आहे.
- महाराष्ट्राभिमानी रेल्वे प्रेमी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.
Wonderful 👍
ReplyDelete