Wednesday, December 29, 2021

मातृभाषा मराठीविषयी बदलत जाणारे समाजमन : एक चिंतेचा आणि चिंतनाचाही विषय.

 परवा एका घरी सहजच जाणे झाले.

घरातल्या बाबांचा आणि पहिल्या वर्गातल्या मुलाचा संवाद सुरू होता.
"अरे, ते नुसते युट्युब व्हिडीओजच काय बघत बसलाय ? टेबल्स पाठ झालेत का मॅम ने सांगितलेले ?"
मला आश्चर्यच वाटले. नवीन शिक्षण पध्दतीत कार्यानुभव म्हणून सुतारकामाचे प्रात्यक्षिक टाकलेय की काय ? पण पहिल्या वर्गात टेबल्स बनविण्याइतके अवघड काम ? आम्हाला इंजिनीअरींगच्या पहिल्या वर्षातही वर्कशाॅप विषयाच्या सुतारकाम विभागात इतका कठीण job करायला सांगितलेला नव्हता. कारण मला वाटले की त्या बिचार्या छोट्याने टेबल बनवलाय फक्त टेबलची पाठ आता तासून बनवायची राहिलीय.
इकडे माझ्यासोबत तिथे गेलेल्या पत्नीचीपण अशीच अवस्था झाली. तिला वाटले की त्या लहानग्याने घरात वागताना काहीतरी चूक केलीय म्हणून टेबलाकडे पाठ करून बसण्याची शिक्षा त्याला मिळतेय.
थोड्या वेळाने आम्हा मराठी माध्यमात शिकलेल्या अडाण्यांना शहाणपण आले. टेबल्स पाठ म्हणजे "टू वन्जा टू, टू टूजा फो". आजच्या (नव्वद्दोत्तरी मराठी समाजात) मुलाला "पाढे पाठ कर रे." म्हणणे अगदीच मागासलेपणाचे लक्षण झाले आहे. "टेबल्स रिमेम्बर" करणे अपमार्केट आहे.
बरं ते "टू वन्स आर टू, टू टूज आर फोर" हे आपले तर्खडकरी इंग्रजी इथे चालत नाही. पण अगदी Wren & Martin च्या पुस्तकात किंवा Oxford dictionary तही Two ones are two चा उच्चार 'टू वन्जा' असा आढळत नाही हो. पण म्हटलं असेल एखाद्या इंग्रजी "चाटे" ची शिकवणी. आपल्याला काय ? आपण आपले अडाणी.
त्या मुलाच्या बापाला आणि आईलाही मी त्यांच्या बालपणापासून ओळखतो आहे. एस एस सी ला इंग्रजी आणि गणितात काठावर पास झालेला बाप आणि याच दोन विषयांमध्ये आषाढी कार्तिकीच्या वार्या करकरून, १७ नंबरचे फाॅर्मस भरभरून, शेवटी खेडेगावातले सेंटर निवडून, पास झालेली त्याची आई. दोघेही आता "नाही, इंग्रजी म्हणजे न जगाची ज्ञानभाषा आहे" वगैरे मला ऐकवत होते. नुकताच "Careers in Germany" चा एक सेमिनार ऐकून मी तिथे गेलो होतो. त्या वक्त्याने "जर्मनीत जायचे असेल तर जर्मन भाषा अतिशय चांगल्या पध्दतीने आत्मसात करायलाच हवी" असे सांगितलेले मनात घोळतच होते. त्याच्या apple चा लॅपटाॅपवर सगळ्या बटन्स जर्मन भाषेतल्या होत्या. जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमध्ये १० व्या नंबरवर असलेल्या माझ्या मराठी भाषेतल्या अशा बटन्स कधी लॅपटाॅपवर येतील आणि माझी दूरवर खेड्यांमध्ये राहणारी भावंडे, मायमाऊल्या कधी आपल्या मराठी भाषेतून जगाला, नव्या तंत्रज्ञानाला सामोरे जातील ? हे विचार मनात असतानाच हा "टेबल्स" चा धक्का बसला.
जागतिक ज्ञानगंगा मराठी भाषेत आणणार्या भगिरथांपेक्षा, इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे (अशी चुकीची समजूत करून घेऊन) त्या प्रवाहात उडी मारणार्या (आणि बहुतांशी वेळा गटांगळ्याच खाणार्या) प्रवाहपतितांची संख्याच जास्त आहे हे सत्य आम्हा उभयतांना उमगले. "लोकाचारे वर्तावे" हे समर्थवचन लक्षात ठेऊन आम्ही तिथून काढता पाय घेतला.
- संपूर्ण शालेय जीवनात मराठी ही प्रथम भाषा आणि इंग्रजी ही तृतीय भाषा घेऊन शिकूनही, जगभर वावरण्यात आणि इंग्रजी लिहीण्याबोलण्यात कुठेच काहीच न अडलेला राम पर्खडकर मास्तर.

No comments:

Post a Comment