Saturday, December 25, 2021

क्रिकेट : एका डेव्हिड आणि गोलिएथच्या सामन्याची आठवण

 क्रिकेट हा खेळ असा आहे की तो कुठल्याही रूपात खेळायला मजा येते. भारतात हा खेळ उगाचच लोकप्रिय झालेला नाही. आम्ही भारतीयांनी या खेळाला आपापल्या साच्यात बसवून तो खेळला आहे आणि त्याची मजा लुटली आहे. या खेळासाठी मोठे मैदान, २२ यार्ड खेळपट्टी, पॅडस, हेल्मेट, ग्लोव्हज वगैरे आवश्यक आहेत ही समजूत आपण बालपणापासूनच हद्दपार केलीय. मग एकाच मैदानावर अनेक टीम्स खेळताना, एका टीमचा थर्ड मॅन हा दुस-या टीमचा डीप फ़ाईन लेग असतो. बॅटींग करणा-या टीमचाच एखादा खेळाडू अंपायर बनतो. एखादा खेळादू दोन्ही टीमकडून खेळणारा असू शकतो. अगदी घरातल्या घरात खेळताना आपल्या शालेय दप्तरातल्या इंचपट्टीची बॅट आणि पिंगपॉंगच्या आकाराच्या छोटा प्लॅस्टिक बॉल यांची मजा एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याइतकीच लुटल्या जाऊ शकते.

१९८३ ला भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लगेच १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियातली बेन्सन ऍण्ड हेजेसची वर्ल्ड सिरीज जिंकली होती. तेव्हा सुनील गावस्कर संघाचा कप्तान होता. त्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही आमच्या आजोळी साधारण १० मीटर लांबीच्या आणि ३ मीटर रूंदीच्या चिंचोळ्या खेळपट्टीवर ही सिरीज पुन्हा खेळली होती. आम्ही आते, मामे, मावस भावंडांनी एकेक टीम वाटून घेतली होती. माझ्या मामेभावाला शाळेतल्या एका स्पर्धेत मिळालेला चषक, त्याला सोनेरी पॉलिश वगैरे लावून बेसन ऍण्ड भजे कप म्हणून आम्ही खेळपट्टीशेजारील मामांच्या घराच्या खिडकीत ठेवत असू. प्रत्येकाने आपापल्या मूळ टीममधल्या खेळाडूंसारखे उजव्या किंवा डाव्या हाताने बॅटींग आणि बॉलिंग करायची. आमच्या एका मामे भावाच्या वाट्याला ऑस्ट्रेलियन टीम आलेली होती. त्याची फ़ार पंचाईत व्हायची कारण तेव्हाच्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये खूप डावखुरे खेळाडू होते. आणि हा तर उजव्या हाताने खेळणारा. तो लवकर स्पर्धेबाहेर पडणार ही तर काळ्या दगडावरची रेघ होती. प्रत्येकी १० ओव्हर्सची आणि १० विकेटसची मॅच. आमच्या एका मावशीच्या मिस्टरांनी ऑफ़िशियल स्कोअरर म्हणून जबाबदारी पार पाडली होती. साधारण ४ ते ५ दिवस ही सिरीज चालली. त्याच्या आठवणी आजही आम्हा सगळ्यांच्या मनात ताज्या आहेत.

 मी साधरणत: ४ थ्या किंवा ५ व्या वर्गात असताना सुनील गावस्करचे "सनी डेज" वाचले होते. नंतर त्या पुस्तकाची अनेक पारायणे केलीत. त्याला इतक्या जुन्या जुन्या सामन्यांचे इतके सगळे बारीक सारीक तपशील कसे लक्षात राहात असतील ? याचा तेव्हा मला खरोखर अचंभा वाटलेला होता. पण नंतर लक्षात आले की एखादी गोष्ट आपण अगदी समरसून जगत असलो तर त्या आठवणी आपल्या मनातून कधीही पुसल्या जाऊ शकत नाहीत.

 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला आम्ही गेलोत आणि नाट्य, साहित्य, काव्य वगैरे क्षेत्रात आमची मनसोक्त मुशाफ़िरी सुरू झाली. मैदानी खेळांच्या बाबतीत आमची भूमिका फ़क्त प्रेक्षकांची आणि समालोचकाचीच असायची. पण १९९१ च्या वार्षिक स्नेहसंमेलन खेळांच्या वेळी आमच्या महाविद्यालयात डबल विकेट टूर्नामेंटची घोषणा झाली आणि आमच्यातल्या हौशी खेळाडूने उचल खाल्ली. ही टूर्नामेंट आमच्या महाविद्यालय परिसरात अगदी मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या मैदानावर खेळवली जाणार होती. मुख्य म्हणजे टेनिस बॉलने. दोन दोन जणांच्या संघात हे सामने होणार होते. प्रत्येकी ३ ओव्हर्सची मॅच. दोन जणांच्या संघानेच बॅटींग आणि बॉलिंग करायची. महाविद्यालयातले इतर ९ खेळाडू फ़क्त फ़िल्डींग करायला मदतीला असणार होते. बॅटींग करताना एकवेळा आऊट झाला तर बॅटींग करणा-या टीमला ५ धावांचा भुर्दंड भरावा लागणार होता. मैदान आपल्या नेहेमीच्या क्रिकेट मैदानापेक्षा थोडे छोटे (किंवा न्युझीलंडमधल्या मैदानांइतके)  म्हणजे साधारण ५० - ५५  मीटर बाऊंड्री असलेले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप संघांच्या समावेशामुळे ही नॉक आऊट टूर्नामेंट असणार होती. एकदा झालेली हार त्या टीमला स्पर्धेबाहेर करणार होती.


Govt. College of Engineering, Karad.

मी आणि माझा स्थापत्य अभियांत्रिकीतला माझा वर्गमित्र सुशील सोहोनीने एक टीम बनवली आणि डबल विकेट टूर्नामेंटसाठी आमची एन्ट्री दिली. सुशील सोहोनी म्हणजे तसा फ़ास्ट बॉलर आणि ब-यापैकी बॅटसमन होता. रशियन गो-या वर्णाचा आणि धष्टपुष्ट कोकणस्थ. त्यामानाने आम्ही म्हणजे अस्सल देशस्थी वर्णाचे, किडकिडीत अंगकाठीचे. आमच्या बॉलिंगचा वेग म्हणजे मोहिंदर अमरनाथच्या वेगाइतकाच. फ़क्त नकलाकार घराण्यातला जन्म असल्याने मैदानावर बॅटिंग करताना आमच्या आयडॉलची, सुनील गावस्करची, नक्कल आणि बॉलिंग करताना वेगवेगळ्या बॉलर्सची नक्कल करणे, मॅच सुरू होण्याआधी पिचमध्ये किल्ली खुपसून बघत, पिचवर पंजा आपटत अगदी बिल लॉरीच्या थाटात पिच रिपोर्ट देणे, टेनीस बॉलने मॅच खेळत असतानाही आकाशाकडे नजर टाकत "This is quite overcast over here and ball will swing intiallly and will come on the bat nice and even, after 5 overs" असे भाकीत करून मॅचमध्ये मजा आणणे या कामांसाठीच आम्ही जास्त प्रसिद्ध होतो.

 


Dwaraki RaghuNandan, Sushil Sohoni and me at Hostel Block C terrace.

सामन्यांचे ड्रॉ पडलेत आणि आमच्या टीमची पहिलीच मॅच अशोक पाळदे आणि कणसे यांच्या संघाविरूद्ध असल्याचे "शुभ" वर्तमान कळले. ही जोडगोळी म्हणजे केवळ आमच्या महाविद्यालयालाच नव्हे तर सातारा जिल्ह्याला आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारी. दोघेही ओपनिंग बॅटसमन आणि फ़ास्ट बॉलर्स. आमचा ड्रॉ पाहिल्यावरच आमच्या मित्रांनी "अरे तुम्ही आता खेळूच नका. यांना वॉकओव्हर देऊन टाका. किमान तुमची सार्वजनिक बेईज्जती तरी टळेल." असे सल्ले द्यायला सुरूवात केली. पण आम्ही दोघेही मागे हटणारे नव्हतो. "हरायचय तर खेळून हरू. आपल्याच मित्र मंडळींसमोर कसली आलीय बेईज्जती वगैरे ? या निमित्ताने पाळदे आणि कणसे जोडीशी खेळल्याचा अनुभव तर मिळेल." या भावनेने झुंजायला तयार झाले होतो. आमचापाशी क्रिकेटच्या मैदानावर गमावण्यासारखे काहीही नव्हते. हरलो तर आमच्या महाविद्यालयातल्या सर्वोत्तम जोडीशी खेळून हरू अशीच आमची भावना होती.

 
सामन्याच्या दिवशी हॉस्टेलची आमची सगळी मित्रमंडळी मॅच बघायला आवर्जून उपस्थित होती. अशोक पाळदे आणि कणसे हे दोघेही आमच्यापेक्षा दोन वर्षे सिनीयर. हे त्यांचे महाविद्यालयातले अंतिम वर्षे होते. आम्ही व्दितीय वर्षात होतो. त्यांचीही मित्रमंडळी मॅचसाठी मैदानात हजर होती. नेहेमी हे दोघेही आमच्या महाविद्यालयासाठी आणि सातारा जिल्ह्यासाठी आपापला सर्वोत्तम खेळ करायचेत त्यामुळे ही मॅच त्यांना जिंकायला फ़ार श्रम पडणार नाहीत याची सगळ्यांनाच खात्री होती.


Sushil Sohoni on the second floor, trying to be in the photo with Atul Limaye and Vijay Kulkarni. Hostel Block C

 
सोहोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेतली. आम्ही दोघे बॅटिंगला उतरलो. बॅटिंग करताना सांभाळून खेळायचे आणि शक्यतो विकेट गमवायची नाही असे आम्ही दोघांनीही एकमेकांना बजावले. विकेट गमावल्यावर ५ धावा आमच्या धावसंख्येतून कमी होणार होत्या आणि ते परवडण्याजोगे नव्हते.
 
पहिला ओव्हर सोहोनीने खेळून काढला. दोन दोन धावा आम्ही दोन वेळा पळून काढल्यात. कणसे तुफ़ान वेगाने आणि टेचात बॉलिंग करीत होता. आणि वेस्ली हॉल समोर बॅटिंग करण्यासाठी फ़ारशा उत्सुक नसलेल्या एकनाथ सोळकरप्रमाणे (ref: Sunny Days) मी कणसेसमोर बॅटिंग करायला फ़ारसा उत्सुक नव्हतोच. पहिला ओव्हर, आमची टीम, 4 / 0.
 
दुसरा ओव्हर अशोक पाळदेचा. बॅटिंगला मी. ओव्हरआधी उगाच अंपायरकडून लेग गार्ड घे, पीचवर पुढे येऊन बॅटने पीचवरील (नसलेले) खडे ठोकून घे, सगळ्या फ़ील्डर्सकडे एकदा दृष्टी टाकून त्यांच्यातल्या गॅप्स बघून घे वगैरे नकलांचे कार्यक्रम करून मी जमलेल्या प्रेक्षकांचे थोडे मनोरंजन केले. अशोक पाळदे चा पहिलाच बॉल मला दिसायच्या आत झूपकन विकेट कीपरच्या हातात स्थिरावला होता. मला हायसे वाटले. त्या ओव्हरमधले सगळेच बॉल त्याने असेच टाकले तरी माझी काहीच हरकत नव्हती.  विकेट गमावायची नाही या एकाच हेतूने आम्ही खेळत असल्याने पुढले सगळे बॉल्स मी सावधपणे खेळून काढले. रन एकही निघाला नाही पण विकेटही आम्ही गमावली नाही. दुसरा ओव्हर, आमची टीम, 4 / 0.
 
तिसरा ओव्हर पुन्हा सुशील सोहोनीने खेळून काढला. तिस-या ओव्हरच्या शेवटच्या (आणि आमच्या इनिंग्जच्याही शेवटच्या) बॉलवर सोहोनीची बॅट अचूक फ़िरली आणि आम्हाला चौकार मिळाला. आमचा एकूण स्कोअर 8 झाला.
 
तीन ओव्हर्समध्ये ९ धावा काढण्याचे हे आव्हान पाळदे आणि कणसे जोडीसाठी अगदीच लिंबूटिंबू होते. आमच्या टीमकडून पहिली बॉलिंग सुशील सोहोनीने करायला घेतली, अशोक पाळदे बॅटसमन होता आणि सोहोनीने पहिला ओव्हर चक्क मेडन टाकला. प्रेक्षकांमधून आता आम्हाला पाठिंब्याच्या आरोळ्या वाढल्या होत्या. त्याचा दबाव या दोघांवर पडलेला असणार हे नक्की होते. विरूद्ध टीम, 0 / 0.
 
माझ्याकडे दुसरा ओव्हर टाकण्याची जबाबदारी आली. समोर कणसे बॅटसमन म्हणून उभा होता. आता आमच्या टीममधला वीक बॉलर मीच होतो. "कणसे, ह्याच ओव्हरमधे मौका आहे. धूवून टाक याला." असे कोणीतरी (अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकीच) ओरडल्याचे ऐकूही आहे. खरेच होते ते.
 
मोहिंदर अमरनाथच्या स्टाईलने रनप घेत मी पहिला बॉल टाकला. कणसेने बॉलला बाऊंड्रीबाहेर फ़ेकून देण्यासाठी जोशात बॅट फ़िरवली. टेनिस बॉलने त्याचा अंदाज चुकवला. बॉल आकाशात उंच गेला आणि कुठल्यातरी फ़ील्डरने झेलला. पाळदे आणि कणसेची टीम -5 रन्स. आता आमच्या मित्रांच्या आरोळ्यांना सुरूवात झाली होती. विरूद्ध टीमवर एकदम दबाव वाढला. पुढले ४ बॉल्स कणसेने सावधपणे खेळून काढले आणि शेवटल्या बॉलवर मला चौकार खेचला. तरीही विरूद्ध टीम दुस-या ओव्हरनंतर -1 याच स्कोअरवर होती.
 
शेवटला पुन्हा ओव्हर सुशील सोहोनीकडे होता. त्याचा पहिलाच वेगवान बॉल अचूक टप्प्यावर पडला आणि अशोक पाळदेची बॅट उशीरा खाली आली तोपर्यंत त्याचा ऑफ़स्टंप उखडलेला होता. विरूद्ध टीम -6. आता आमच्या मित्रांना खूप जोश चढला तर अंतिम वर्षाच्या मंडळींच्या गोटात शांतता पसरली. पाळदे आणि कणसेंना पराभवाची चाहूल लागली. ते खचले. त्यांची आक्रमकता एकदम म्यान झाली. उरलेल्या ५ बॉल्समध्ये त्यांनी जेमेतेम ३ रन्स धावून काढलेत. त्यांचा अंतिम स्कोअर - 3. आम्ही चक्क ११ धावांनी सामना जिंकलेला होता.
 
आमची मित्रमंडळी मैदानात धावली. आम्हाला त्यांनी चक्क खांद्यावर उचलले. आज David कडून Goliath चा पराभव झालेला होता. पाळदे आणि कणसेची एक उत्कृष्ट जोडी स्पर्धेबाहेर झालेली होती. हे दोघे जर स्पर्धेत राहिले असते तर इतर जोड्यांसाठी तो कठीण मामला ठरला असता पण स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात एकंदर खेळाचा अंदाज न आल्याने एक सर्वोत्तम जोडी स्पर्धेबाहेर गेली होती. आम्ही "Giant keeler" ठरलेलो होतो.

 
स्पर्धेच्या दुस-याच सामन्यात आम्ही स्पर्धेबाहेर गेलो हे आठवतय. तो सामना तितका ठळक आठवत नाही. पण या सर्वोत्तम जोडीविरूद्धचा अशक्य कोटीतला विजय आमच्या मनात मात्र कायमचा कोरला गेला हे नक्की.
 
-  ९९ % नकलाकार असलेला १ % क्रिकेटर, राम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment