Tuesday, December 21, 2021

"आधा है चंद्रमा" ... महाविद्यालयीन जीवनातल्या एका टारगटपणाची आठवण.

दि. ९/२/१९९१, शनिवार. आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडचा संघ सातारा जिल्हास्तरीय युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी कराडवरून कोरेगावला निघाला होता. संघात एकल गायन स्पर्धेत सहभागी असलेले गायक, समूह गायन स्पर्धेतला चमू, छोट्या प्रहसनासाठी सहभागी आमचा चमू, मूक अभिनयासाठीचा चमू, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी वक्ते अशी २५ - ३० कलाकार मंडळी त्यात होतो. अशा स्पर्धांसाठी जाण्यायेण्याचा खर्च आमचे महाविद्यालय करीत असे. ज्या महाविद्यालयात युवक महोत्सवाचे आयोजन आहे तिथेच जेवण खाण्याची व्यवस्था, प्रसंगी राहण्याची व्यवस्थाही होत असे. त्यामुळे आमच्या अभियांत्रिकीच्या ४ वर्षांमध्ये अशा विविध स्पर्धांमध्ये आम्ही सहभाग घेऊन सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हे पालथे घातले होते.



दुपारी सगळ्या स्पर्धा झाल्यात. आम्ही अत्यंत हिरीरीने सहभाग घेतला होता. सगळ्या स्पर्धांचा निकाल युवक महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे रविवारी जाहीर होणार होता. पण आमचा पूर्ण संघ त्याच दिवशी संध्याकाळी परतीच्या प्रवासाला लागला. कोरेगाव ते सातारा अर्ध्या तासात आणि नंतरच्या प्रवासासाठी सातारा बसस्थानकातून जवळपास पाऊण तास वाट पाहिल्यानंतर नाशिक - मिरज बसने आम्ही निघालो. तत्पूर्वीच्या ४५ मिनीटात सातारा स्थानकातून कमीतकमी १० बसेस कराड कडे गेल्या. पण एका बसमध्ये विद्यार्थी सवलतीचे किती विद्यार्थी बसावेत ? याचे आपल्या एस. टी. चे नियम आहेत आणि त्यात आम्ही २५ - ३० जण बसत नव्हतो. मग एकेका एस. टी. त  ५ - ६ जण अशी व्यवस्था करून आम्ही परतत होतो. आमच्या नाटका्च्या आणि दुस-या एका संगीताच्या गटाचा नंबर या बसमध्ये लागला. आम्ही जवळपास १० जण या बसने निघालो.

बसमध्ये सुरूवातीला सगळे जिथे जागा मिळेल तिथे विखरून बसलेलो होतो. दिवसभराचा स्पर्धेचा कैफ़, दिवसभर स्पर्धेच्या निमित्ताने केलेली धमाल मस्ती आणि तारुण्याचा जोश या मूडमध्ये आम्ही सगळेच होतो. मी समोर बसलो होतो खरा पण सगळ्या गृपला बसच्या शेवटच्या लांब बाकड्यावर जागा मिळालेली होती. तिथून आमच्या नावाचा पुकारा सुरू झाला. त्यामुळे सातारा स्थानकातून बाहेर निघाल्यानंतर १० मिनीटातच आम्ही सगळ्यात मागच्या बाकावर आमच्या गृपमध्ये सामील झालो होतो.

आमच्या पुढल्या तीन सीटसवर तीन मध्यमवयीन गृहस्थ बसलेले होते. ते तिघे एकत्र प्रवासाला निघाले होते की नाही ? याची कल्पना नाही. पण तिघांनाही कमी अधिक प्रमाणात टक्कल पडलेले होते. आणि संधिकाळाचा प्रकाश गाडीच्या खिडकीमधून येऊन त्या तिघांच्या टकलांवर पडलेला होता. आम्हा सगळ्यांना जवळपास एकाच वेळी ही गोष्ट लक्षात आली. आणि मग काय विचारता आमच्या गान प्रतिभेला आणि टारगटपणाला बहरच आला.

"आधा है चंद्रमा रात आधी" हे एकाने सुरू केले. त्याचे गाणे संपते न संपते तोच लगेच दुस-याने "चॉंद फ़िर निकला" सुरू केले. आमच्यातलाच एका मराठी प्रेमीने लगेच "तोच चंद्रमा नभात" म्हणायला सुरूवात केली. आमच्यातली एक टारगट मुलगीही "चंद्र आहे साक्षीला" हे गाणे म्हणत आमच्या या थट्टेत सामील झाली. सगळे एकापेक्षा एक छान गायक आणि एस. टी. बसच्या खडखडाटात सगळ्यांचाच सुंदर सूर लागलेला. एव्हाना पुढल्या सीटवरच्या त्या तिघा गृहस्थांना ही थट्टा आपल्यासाठीच आहे याची जाणीव झाली असावी कारण त्यांनीही खेळकरपणाने आमच्या गाण्यांत सहभाग नोंदवायला सुरूवात केली. युवक महोत्सवाची दिवसभराची एक निराळीच झिंग, तो तरूणाईचा सळसळता उत्साह आणि सुसंस्कृत, मध्यमवर्गीय घरांमधून आलेल्या सगळ्याच क्षेत्रात अत्यंत बुद्धीमान असलेल्या तरूणांनी केलेली ही आगळीवेगळी थट्टा. तासा सव्वा तासात कराड आले. आम्ही सगळे बसमधून उतरून गेलोत पण आजही चांदण्या रात्रीतला तो प्रवास मला ठळक आठवतोय. निराळेच, भारलेले, मंतरलेले दिवस होते ते. आज मागे वळून बघितल्यावर माझे मलाच जाणवतेय की महाविद्यालयीन जीवनातला तो काळ आपण खरोखरच जगलोय. अगदी समृद्ध जगलोय. 


- खेळकर, खोडकर आणि टारगट महाविद्यालयीन विद्यार्थी, राम प्रकाश किन्हीकर.

3 comments:

  1. अतिशय सुंदर लिखाण. संपूर्ण प्रसंग अगदी नजरे समोर जिवंत उभा राहिला

    ReplyDelete
  2. Ram bhau, Good one: You enjoyed cultural events

    ReplyDelete
  3. वा रामराया तुम्ही एकदम कराड ला घेऊन गेलात.

    ReplyDelete