Saturday, September 26, 2020

बालपणापासून पाहिलेला आंतरराज्य मार्ग

 

आमच्या बालपणापासून आम्ही हा मार्ग बघत आलोय.
नागपूर जलद धर्मपुरी
मार्गे जांब, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर,राजुरा, आसिफ़ाबाद, मंचेरियल.
नागपूर - २ डेपो (सध्याचा गणेशपेठ डेपो) ची ही गाडी धर्मपुरीला मुक्कामी असते.
MH - 40 / N 8912
TATA 1512 C
मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर (म.का.ना.) ने बांधलेली टाटा बस.
२ बाय २ आसनव्यवस्था, एकूण प्रवासी ४३ + १ वाहक



गंमत म्हणजे बालपणी नकाशात वाराणसी - कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर तामिळनाडूत धर्मापुरी नावाचे गाव बघितल्यावर आम्हाला आपली महाराष्ट्राची एस. टी. पार तामिळनाडूपर्यंत जाते याचा अभिमान वाटायचा. नंतर कळले की हे धर्मपुरी म्हणजे गोदावरीकाठचे आंध्र प्रदेशातले (सध्याच्या तेलंगणमधले) तीर्थस्थळ.
ही गाडी अगदी ४५ वर्षांपासून (मी बघत आलेला हा काळ) नागपूरवरून दुपारी १०.०० ला निघते आणि चंद्रपूरवरून नागपूरसाठी दुपारी १४.३० ला. दोन्हीही गाड्या (नागपूर - धर्मपुरी आणि धर्मपुरी - नागपूर) एकमेकींना चंद्रपूरला भेटत असत.
आमच्या बालपणी आजोळी, चंद्रपूरला, जाण्यासाठी आमची पसंती सकाळी ६.००, दुपारी १२.००, संध्याकाळी ६.०० किंवा रात्री १०.०० च्या बसेस ना असायची. चंद्रपूर डेपो आपल्या ताफ़्यातल्या सर्वोत्कृष्ट गाड्या या वेळांवर पाठवित असे. गाड्यांना पांढरा पट्टा असायचा. या गाड्या फ़क्त जांबचाच थांबा घ्यायच्या. भद्रावती, वरोरा चे प्रवासी या गाड्यात नसायचेच. ब-याच वेळा १ ते ५ ही आसने सोडलीत (* यासंबंधी टीप खाली परिशिष्टात लिहीलेली आहे.) तर सगळी गाडी पूर्ण आरक्षित असायची. गाडी फ़लाटावर लागल्यावर दार उघडताना कंडक्टर काकांचा "गाडी फ़ुल्ल रिझर्व आहे" हा आवाज ऐकताना, आपले रिझर्वेशन असेल तर अभिमान वाटायचा आणि रिझर्वेशन नसेल तर राग यायचा. मानवी स्वभाव, दुसरे काय ?
संध्याकाळी ६.०० ची आणि रात्री १०.०० ची नागपूर - चंद्रपूर बसेस गावात गांधी चौकापर्यंत जायच्यात. रात्री बेरात्री प्रवाशांना स्टॅण्डवरून गावात जायला रिक्षा किंवा अन्य साधने मिळतील न मिळतील म्हणून एस. टी. ने प्रवाशांच्या सेवेसाठी हे आपले नाव सार्थ केले होते.
नागपूर - धर्मपुरी ही १०.०० ची बस म्हणजे नागपूर - चंद्रपूर १२ वाजताची सुपर बस न मिळाल्यास करावी लागणारी एक तडजोड होती. नागपूर - २ डेपोही या आंतरराज्य महामार्गावर आपल्या फ़ार नवीन बसेस पाठवीत नसे. त्यामुळे १२ ची सुपर ३ तासात किंवा ३ तास १५ मिनिटांत चंद्रपूरला पोहोचायची पण ही १०.०० ची जलद ३ तास ४५ मिनिटे ते ४ तास वेळ घेत असे.
चंद्रपूरवरून परततानाही तेच. आमचा पसंतीक्रम सकाळी ६.०० (सुपर), दुपारी १२.०० (सुपर), दुपारी ३.००(सुपर) किंवा सकाळी ५.३०(जलद) असा असे. (** यासंबंधी टीप खाली परिशिष्टात लिहीलेली आहे.) संध्याकाळी चंद्रपूरवरून निघून रात्री नागपूरला फ़क्त झोपण्यापुरते जाणे आम्हाला आणि आमच्या चंद्रपूरमधल्या सगळ्या माया करणा-या व्यक्तींना मान्य नसे. "घरी जाऊन झोपायचेच आहे नं ? मग इथेच मुक्काम करा, गेले उद्या सहाच्या बसने." असा आग्रह नेहमी व्हायचा. त्यामुळे चंद्रपूरवरून निघायचे असेल तर शेवटली बस म्हणजे दुपारी ३.०० ची सुपर.
पण सीझनमध्ये कधी कधी तिचेही रिझर्वेशन मिळत नसे. अशा वेळी १४.३० ला निघणा-या या धर्मपुरी - नागपूर मध्ये हमखास जागा मिळायची.
असा हा आंतरराज्य मार्ग आणि त्याच्याशी संबंधित आठवणी. आठवणी या मधमाशांच्या मोहळासारख्या असतात नाही ? एक काढली तर असंख्य तुमच्यासमोर येऊन पिंगा घालत बसतात.
परिशिष्ट * :
आसन १ आणि २ महाराष्ट्र एस. टी. त आमदार खासदारांसाठी राखीव आहे. एकेकाळी तसे त्या आसनांच्या मागे लिहीलेले असायचे. ऐनवेळी कुणी आमदार खासदार आले नाहीत तर ही आसने सर्वसामान्य माणसांना उपलब्ध व्हायचीत.
आजवर केवळ शेकापच्या गणपतराव देशमुखांचा अपवाद वगळता मी कुठल्याही आमदार किंवा खासदाराला एस. टी. तून नियमित प्रवास करताना बघितलेले नाही. आणि आसन क्र. ३,४,५ ही पत्रकारांसाथी राखीव असायचीत. त्यामुळे त्यांचे आरक्षण द्यायचे नाहीत. ऐनवेळी येणा-या प्रवाशांना ही आसने उपलब्ध व्हायचीत.
परिशिष्ट ** :
सकाळी ५.३० ला निघणारी बस अगदी एवंगुणविशिष्ट असायची. साडेपाचची बस गाठायची म्हणजे पहाटे चारला उठून सगळी आन्हिके उरकावी लागायचीत. अगदी अंघोळ वगैरे सुद्धा. कारण नागपूरला सकाळी ९.०० ला पोहोचल्यानंतर वाड्यात नळ गेलेला असायचा. मग कसली अंघोळ आणि कसली आन्हिके ? स्वयंपाकापुरते आणि दिवसभर पिण्यापुरते घडाभर पाणीसुद्धा शेजारून मागून आणावे लागायचे.
पहाटे साधारण सव्वापाचच्या सुमारास चंद्रपूरला स्टॅण्डवर
पोहोचलो की साडेपाचची नागपूर, सहाची नागपूर आणि सहाची चंद्रपूर - शेगाव या तिन्ही गाड्या चंद्रपूर डेपोच्या प्रवेशद्वाराशी थांबलेल्या असायच्यात. त्यात "नेमकी नवी गाडी आज साडेपाचची देऊ देत" म्हणून आम्ही प्रार्थना करायचो पण ९९.९९ % वेळा ही प्रार्थना फ़लद्रूप व्हायची नाही. बाहेर अजूनही अंधार असल्याने आत सगळे दिवे लावलेली साडेपाचची जलद डेपोबाहेर यायची आणि फ़लाटावर लागायची.
त्याकाळी सुपर बसचे रिझर्वेशन करायचे असेल तर संपूर्ण प्रवासभाडे आणि १ रूपया रिझर्वेशन शुल्क असे आगाऊच भरावे लागे. (चंद्रपूर - नागपूर प्रवासभाडे १८.९० रूपये + १ रू आरक्षण शुल्क असे १९.९० रूपये प्रतिव्यक्ती भरावे लागे. हे शुल्क कमीतकमी १० वर्षे तरी तसेच होते.) पण जलद बसला फ़क्त १ रूपया रिझर्वेशन शुल्क भरून जागा आरक्षित करता येत असे. उरलेली रक्कम बसमध्ये वाहकाला द्यायची आणि तिकीट घ्यायचे अशी प्रथा होती. साडेपाचची बस अशीच १.०० रूपया आरक्षणाची होती.
ही साडेपाचची बस जरा लेकुरवाळ्या स्वभावाची असे. ही बस चंद्रपूरवरून निघाली की भद्रावती गावाआधी असलेल्या भद्रावतीच्या आयुध निर्माण वसाहतीत जायची. ही एकमेव बस या मार्गे जायची. मग तिथले प्रवासी घेऊन, भद्रावती शहरात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा महामार्गावर परतणे, वरो-याला रेल्वे फ़ाटक ओलांडून गावात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा फ़ाटक ओलांडून महामार्गावर येणे, या गदारोळात एकदा किंवा दोन्हीवेळा रेल्वेचे फ़ाटक बंद असले की खोळंबा सहन करणे या सगळ्या निवांतपणात सहाची सुपर भद्रावती आणि वरोरा थांबे न घेता पुढे निघून गेलेली असायची. जांब बसस्थानकात साडेपाचची बस शिरताना, सहाची बस वाकुल्या दाखवत निघायच्या तयारीत असायची. त्यामुळे आपण साडेपाचच्या बसमध्ये असलो की सहाच्या बसचा राग यायचा आणि सहाच्या बसमध्ये असलो की साडेपाचच्या बसची कीव यायची.
काय आहे की मूळ मजकुरात आठवणींनी कंसात ( ) गर्दी केली की मूळ मजकुराचा धागा कदाचित तुटण्याचा संभव असतो. म्हणून ही परिशिष्टे.
- आठवणींच्या जंजाळात हरवलेले, परिशिष्टांवर परिशिष्टे लिहीणारे, (पण तरीही शिष्ट नसलेले) बसगाड्यांचे डॉ. राम प्रकाश किन्हीकर.

2 comments:

  1. Excellent! But water shortage in Chanda and Nagpur???????

    ReplyDelete
    Replies
    1. No shortage as such. But during those days it was total lack of planning by Municipal authorities.

      Delete