Tuesday, September 1, 2020

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला....

गणरायाच्या आगमनाआधी संपूर्ण सृष्टीमध्येच एक प्रकारचा उत्साह भरून राहिलेला आढळून येत असतो. गणपती येणार म्हणून सार्वजनिक आणि वैयक्तिक स्तरावरदेखील खूप लगबग चाललेली असते. आणि शेवटी हरितालिकेचा दिवस येऊन ठेपतो.

दरवर्षी हरतालिका आली की मी मनाने थेट १९८० च्या दशकात आणि आणि इतवारीतल्या आमच्या कुहीकर वाड्यात घालवलेल्या दिवसांत जातो. हरतालिकेच्या आठ दिवस आधीपासून बांबूने विणलेल्या परड्यांवर गौर काढण्याची लगबग वाड्यातल्या सगळ्या बायकांमधे असे. माझी आईही त्यांच्यातच सामील. रोज त्या गौरीला थोडे पाणी घालून तिची वाढ किती झाली ? ते बघायचे. या कामात आम्हा भावंडांचाही सहभाग असे. हरतालिकेपर्यंत ती गौर छान बहरून यायची.

तसेही कुहीकर वाड्यात नळ फ़ार लवकर येत असल्याने आम्हा सर्वांना पहाटेच उठावे लागत होते. पण हरतालिकेची पहाट निराळीच भासे. आई आणि वाड्यातल्या सगळ्या काकू, ताया लवकर उठून, छान तयार वगैरे होऊन, गौर काढायला म्हणून शुक्रवार तलावातल्या बेटावर जायच्यात. (तेव्हा ते बेट अगदी छान होते. एकट्यादुकट्या बायकांनी जाण्यासारखे, एखाद्या रविवारी कुटुंबांनी सहलीला जाण्याजोगे. आता तिथे दारूडे, गर्दुल्ले आणि असामाजिक तत्वांचा हैदोस चालतो.) साधारण सकाळी सहा साडेसहापर्यंत परतायच्यातही. 

मग सुरू व्हायची पूजांची धूम. सगळ्या गौरींची एकत्र पूजा, एकत्र आर्ती. सगळ्या सुवासिनींचे एकत्र फ़राळ. आमच्या त्या साध्याशा, मातीच्या खोल्या आणि पत्र्यांचे छप्पर असलेल्या, वाड्यात एकदम उत्सवी वातावरण व्हायचे. आनंदाला उधाण यायचे.

दुपारी किंवा संध्याकाळी जवळच असलेल्या चितार ओळीतून गणपतीची मूर्ती आणायला आम्ही तिन्ही भावंडे आणि आमचे दादा (वडील) जायचो. मग गणपती एकाने (बहुतेक मीच, कारण मी सगळ्यात थोरला भाऊ होतो.), उंदीर एकाने आणि गणपतीचे "गोफ़,जानवे" एकाने अशी जबाबदारीची वाटणी व्हायची. अजूनही चितारओळीतला "ए, गोफ़ जानवे, उंदीर" हा त्या विक्रेत्या मुलांचा आवाज माझ्या कानात गुंजतोय. गंमत म्हणजे गणपतीच्या निवडीपेक्षा उंदीरमामांच्या निवडीसाठी जास्त वेळ लागत असे. कारण उंदीरमामा घरातल्या धाकट्यांच्या पसंदीचा घ्यावा लागे. त्यात त्यांना कसलीही तडजोड चालत नसे.

गणपतीच्या दिवशी सकाळी आमचे परंपरागत उपाध्ये आणि आमच्या शाळेतले आमचे संस्कृत शिक्षक, श्री. हरीभाऊ महावादीवार सर यायचे. (आमचे दादा त्याच शाळेत मुख्य लिपीक असल्याने, "उशीरा याल तर यावर्षी इंक्रीमेंटमधे उशीर करेन" अशी गंमतीची धमकी त्यांच्या या मित्राला असायची.) अगदी साग्रसंगीत, विधीवत पूजा व्हायची. गणपती बाप्पा त्या छोट्याशा घरातही प्रसन्न मुद्रेने विराजमान व्हायचेत. आमच्याही आनंदाला उधाण यायचे. माझी आई अतिशय सुगरण. कोंड्याचा मांडा करूनही अतिशय सुंदर चव त्याला प्रदान करण्याची कला तिच्या हाताला आहे. त्यादिवशी किती मोदक फ़स्त व्ह्यायचे याची आम्ही भावंडे गणना करायचो नाही. आई आणि दादाही आमच्या त्या छोट्याशा जिवांच्या आनंदाकडे पाहूनच तृप्ती मानीत असावेत. "त्या दोघांना खायला किती मोदक उरलेत ?" हा प्रश्न आमच्या मनात तेव्हा कधीच शिवला नाही पण आज तो प्रश्न मनाचा थरकाप उडवतो. आहे त्या परिस्थितीत समाधानाने संसार करताना आपल्या मुलांपर्यंत त्या परिस्थितीची आच कधीच येऊ न देणारे आईबाप आपल्याला लाभलेत याचाच अर्थ आपण गेल्या जन्मी काहीतरी मोठ्ठे पुण्य केले असले पाहिजे हा माझ्या मनातला सिद्धांत दृढ होतो.


मग वाड्यात रोज संध्याकाळी आरत्यांची धूम होई. आमच्या घरी आणि आमचे वाडामालक, कुहीकर यांच्याही घरी गणपती, महालक्ष्म्या. मग आर्तीच्या वेळा ठरवल्या जाई. आमच्या घरची आर्ती वाड्यातली आणि कुहीकरांकडली मंडळी येईपर्यंत सुरू होत नसे आणि तसेच कुहीकरांकडलीही आर्ती. आर्तीनंतर मंत्रपुष्पांजली अगदी खणखणीत आवाजात म्हटली जायची. त्यासाठी आम्हा मुलांची आवाजाची आणि शुद्धतेची चुरस लागे. वाडा दणाणून जायचा. आमच्या वाड्यात अठरापगड जातींची मंडळी रहायचीत पण गणपती, महालक्ष्म्यांमधे हे भेद उरत नसत. सगळ्यांना सारखाच उल्हास वाटत असे.

गणपती बसलेत की लगेच महालक्ष्म्यांची (ज्येष्ठा - कनिष्ठा गौरी) घाई सुरू होई. महालक्ष्म्यांचा फ़ुलोरा आणि इतर तयारी. बघता बघता महालक्ष्म्य़ा बसायचा दिवस येई. १२५ चौरस फ़ुटांच्या आमच्या त्या घराला राजवाड्याचा थाट प्राप्त होत असे. साधीशी सजावट असली तरी महालक्ष्म्यांच्या आगमनाने प्रसन्न वाटे. आमचे नागपुरातले काका, कारंजा, मूर्तिजापूरचे, खामगावचे काका काकू सगळी मंडळी महालक्ष्म्या बसण्याच्या दिवशी यायचीत. घरात उत्सव सुरू झाल्यासारखा वाटे. (गौरी आगमनाच्या) पहिल्या दिवशी पासून दोन दोन पंक्तीत जेवणे व्हायची. बाहेरगावची मंडळी घरातली कामे संपलीत की संध्याकाळी उशीरा नागपुरातले सार्वजनिक गणपती पहायला म्हणून बाहेर पडायचीत. त्यांच्यासोबत आम्हा भावंडांपैकी एकाचा नंबर लागायचा (बहुतांशी माझाच.) गणपतीच्या दिवसांमध्ये नागपुरात शहराला रात्रीपर्यंत चांगली जाग असे. रात्री ११, ११.३० वाजताही शहर बस थांब्यांपासून घरी पायी परत येताना भिती वाटत नसे.




महालक्ष्म्या  जेवणाच्या दिवशी तर धमाल असे. घरची मंडळी, दादांच्या शाळेतली निमंत्रित मंडळी, काकांच्या ऑफ़िसमधली मंडळी असा एकूण ५० ते ७० लोकांचा तो समारंभ असे. पूजेला पुन्हा महावादीवार सरच असायचेत. स्वयंपाकाला मदतीला म्हणून दादांच्या शाळेतला आचारी (महाराज) असायचा. पण "तो तेल तुपाची खूप नासधूस करतो" असा आरोप दरवर्षी आई आणि इतर काकू मंडळी करायच्यात. "पुढल्या वर्षी याला बोलवायचेच नाही." हा संकल्प दरवर्षी व्हायचा आणि विरून जायचा. कमीत कमी संसाधनात केलेल्या महालक्ष्म्यांची सगळे निमंत्रित तारीफ़ करायचेत. स्वयंपाक तर अत्युत्कृष्टच झालेला असायचा. महालक्ष्म्या तृप्त होऊन आशिर्वाद द्यायच्यात. तिस-या दिवशी विसर्जनाचे हळदी कुंकू झाले की पाहुणे मंडळी दुस-या दिवशी सकाळच्या बसने, महाराष्ट्र एक्सप्रेसने परतायचीत. घर थोडे सुने सुने वाटयचे पण गणपती बाप्पाचा आधार वाटायचा. "तो अजून आपल्यात आहे" ही भावना खूप आश्वासक वाटायची.

किन्हीकरांकडे रोजच्या पूजेत गणपतीची मूर्ती नाही. पण म्हणून मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती येतो तो एक दिवस जास्त मुक्काम करतो. किन्हीकरांकडला गणपती थेट भाद्रपद पौर्णिमेला जातो. वाड्यातल्या इतर सगळ्यांचे गणपती एकादशी, व्दादशी, चतुर्दशीला विसर्जनासाठी जाताना आम्हाला मात्र आमचा बाप्पा एक दिवस जास्त मुक्कामाला आहे याचा अभिमान असे.

पौर्णिमेच्या दिवशी मात्र सकाळपासूनच आमचा चेहरा रडवेला व्हायचा. दहा दिवस आपल्या घरी आलेला आपला मित्र, आपला बुद्धीदाता बाप्पा आज आपल्या घरी जाणार याचे अपार दु:ख होत असे. कितीही "पुढल्या वर्षी लवकर या" म्हटले तरी अजून किमान ३०० - ३२५ दिवस तरी त्याचा विरह आपल्याला होणार ही भावना औदासिन्य आणणारी होती. विसर्जनालाही आई पुन्हा मोदक आणि मुरडकरंजीचा नैवेद्य दाखवित असे. गणपतीला आपण भक्तांची माया असावी आणि मुरडून मुरडून त्याला परतण्याची इच्छा व्हावी म्हणून मुरडकरंजी. सोबत प्रवासात पोटाला चांगला म्हणून दहीभाताचाही नैवेद्य असायचाच.

संध्याकाळी सहा वाजण्याचा सुमारास आमच्या वाड्यासमोर दादा एक सायकल रिक्षा ठरवून घेऊन यायचेत. हा ही एक अपूर्व प्रसंगच. कारण कुठेही जायचे म्हटले की थोडे चालत जाऊन भावसार चौकातून रिक्षा ठरवायचा ही आमची नेहेमीची रीत होती. वाड्यासमोर सायकल रिक्षा म्हणजे एक पर्वणीच होती. घरी आर्ती व्हायची. गणपती हातात घेऊन, डोक्यावर टोपी घालून पायात चप्पल न घालता दादा बाहेर निघायचे. आम्हीही एकाने उंदीर धरून, एकाने पूजासाहित्य घेऊन चप्पल न घालताच बाहेर पडत असू. रिक्षात बसताना आमच्याच वाड्यातील नव्हे तर शेजारच्या दोन वाड्यांमधली मंडळी घराबाहेर आलेली असायची. त्यांच्या सगळ्यांकडले गणपती एक किंवा दोन दिवस आधीच विसर्जन झालेले असायचेत.

"गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया"
"एक लाडू फ़ुटला, गणपती बाप्पा उठला"
"गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला" 

अशा घोषणा देत आमची ती रिक्षातली मिरवणूक निघायची. आई सहसा आमच्यासोबत येत नसे. आम्ही शुक्रवार तलावावरून परतेपर्यंत तिला गणपतीची जागा साफ़सूफ़ करून पुन्हा पूर्वीसारखे करायचे असे. १२५ चौरस फ़ुटांमधे वावरताना किती व्यवधाने पाळावी लागतात हे "जावे त्या वंशा तेव्हा कळे".

शुक्रवार तलावावर आमची मिरवणुक यायची. लेक व्ह्यु लॉजसमोरच्या तलावपाळीवर बाप्पा घटकाभर विराजमान व्हायचेत. शेवटली आर्ती व्हायची. आणि मग पाळीवरूनच पाण्यात बाप्पांचे आणि सोबत आणलेल्या उंदीराचे विसर्जन व्हायचे. सोबतचे निर्माल्यही पाण्यातच विसर्जन व्हायचे.

शरीरातली आणि मनातली शक्ती एकदम नाहीशी झाल्यासारखे वाटे. परतताना आम्ही सगळेच अनवाणी पायीपायी परतत असू. छोट्याशा अंतरासाठी सुद्धा रिक्षाचा, शहर बसचा आग्रह दादांकडे करणारी आम्ही भावंडे उदास अंत:करणाने पायीपायी चालत असू. रस्त्यावरचा एखादा चुकार खडा क्वचित बोचला तरी आम्हाला त्याचे काही वाटत नसे. आमच्या दादांचीही मन:स्थिती आमच्याहून वेगळी नसे. त्यांच्या आयुष्यातल्या खडतर संघर्षातला विसंगत हा एक छोटासा आनंदी एपिसोड आज संपला असे. असे आनंदी एपिसोड त्यांच्या आयुष्य़ात नंतर आमच्या निकालावेळी यायचे. आमचे सगळ्यांचेच कायम पहिल्या नंबरात पास होणे ही त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब होती. आम्हा दोन भावांना पहिल्यांदाच चांगली नौकरी लागल्याबरोबर त्यांच्या आयुष्यात, खूप दु:खाने दुपारभर भाजून काढल्यावर, सुखाच्या संध्याकाळची सुगंधी झुळूक आल्यासारखे झाले होते. पण आमच्या दुर्दैवाने ही सुखाची संध्याकाळ उपभोगायला ते फ़ारसे राहिले नाहीत. हे दु:ख, ही सल आम्हा भावंडांच्या मनात आयुष्यभरासाठी राहील हे निश्चित.

आज तर तलावांवर, नदींवर विसर्जन करायला बंदी आहे. मी अगदी ठरवून मृण्मय मूर्ती आणतो. संध्याकाळच्या आर्तीनंतर घरीच विसर्जन करतो. देवघर ते अंगण या छोट्याश्या मिरवणुतीत आम्ही तिघेच (मी, सुपत्नी आणि सुकन्या) असतो. उभ्या मोठ्ठया टबात मूर्ती विधिवत विसर्जन करतो आणि जड मनाने आणि पावलांनी घरात परततो. 

"गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला" ही घोषणा आजही देतो पण त्या घोषणेत बालपणाच्या निसटून गेलेल्या मजेचे, वडीलांच्या सुखद, दु:खद स्मृतींचे, आपण मोठे का झालो ? या जाणिवेचे स्वर ठळक ऐकू येत असतात.

- राम प्रकाश किन्हीकर (०१०९२०२०)








No comments:

Post a Comment