तुमच्यापैकी किती जणांना "मी केलेले खूप मोठ्ठे काम नेहेमी नेहेमी कवडीमोल होतेय. माझ्या एव्हढ्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाची कुणी साधी दखलही घेत नाही. जगातला सर्वात दुर्लक्षित असामी मी एकटाच आहे." असे फ़ीलिंग येतेय ? बहुतेक सगळ्यांनाचा, नं ? थांबा. खालील उदाहरण लक्षात घ्या मग तुम्हाला तसे वाटणार नाही.
कुठल्याही महाराष्ट्रीय लग्नाचा अविभाज्य भाग म्हणजे मंगलाष्टके. लग्नात वरमाला, वधूमाला अर्पण करायला उभे असलेल्या वधू, वरांच्या मनात लग्न या संस्थेविषयी पवित्र विचार उत्पन्न व्हावेत आणि त्यांना शुभाशिर्वाद मिळावेत म्हणून मंगल सुविचारांचे अष्टक (आठ कडव्यांचे शार्दूलविक्रिडीत वृत्तात लिहीलेले गीत) म्हणून मंगलाष्टक म्हणायचे असते. अशी प्रथा आहे. साधारण ३० - ३५ वर्षांपासून एक नवीन प्रथा यात आलेली आहे. लग्ने ठरली की नियोजित वधूकडील, नाहीतर नियोजित वराकडील (हौशी असतील तर दोन्हीकडील) मंडळी एखाद्या मंगलाष्टके करणा-या कवी / गीतकाराला गाठतात. त्याच्याकडून मंगलाष्टके आली की ती ए - ६ आकाराच्या रंगीबेरंगी कागदांवर रंगीत शाईने छापून लग्नात ती लग्नवेळी उपस्थित
व-हाड्यांमधे वाटतात. लग्न हा विधी वधूवरांसाठी तसा रंगीबेरंगी असतोच. इतरांसाठी ही रंगांची उधळण व्हावी म्हणून रंगीबेरंगी कागदांची युक्ती असावी.
प्रातिनिेधिक चित्र. मजकुराशी संबंध असेलच असे सांगता येणार नाही.
या मंगलाष्टक नामक काव्यात मोठ्या खुबीने वधू वरांच्या आई वडीलांचे, प्रत्यक्ष वधूवरांचे, त्यांच्या आजीआजोबांचे नाव गुंफ़लेले असते. ही मंगलाष्टके सगळ्यांना वाटण्यामागचा उदात्त हेतू हाच की बोहोल्यावरच्या भटजींची पहिली एक दोन "गंगा सिंधू सरस्वती च यमुना..." किंवा तत्सम एक दोन कडवी म्हणून झालीत; (या प्रसंगी काहीकाही भटजींनाही आपली सुप्त गायनी कळा दाखवण्याची लहर हमखास येते. मग समस्त व-हाड्यांना या "थोडक्यात हुकलेल्या भीमण्णांची" गायकी ऐकावीच लागते, तो एक निराळाच मुद्दा आहे, असो.) की सगळ्या व-हाडी मंडळींनी या समूहगायनात सामील व्हावे आणि वधूवरांना सुरेल, संगीतमय आशिर्वाद मिळावेत.
कुठल्याही हॉलीवूड सिनेमांमधे बघा. एखाद्या लग्नात, शाळेत, चर्चमधे एखादे गीत सुरू झाले की समस्त उपस्थित मंडळींना ते गीत नुसतेच पाठ असते असे नव्हे तर ते सुरावटींसकट त्यांच्या गळ्यात बसलेले असते हो. किती छान वाटत न त्यांचे ते समूहगान ऐकताना ?
पण आपण महाराष्ट्रीय नामक मंडळी काय ऐकतोय काय ? अहो, सा्धी मंत्रपुष्पांजली म्हणताना कुणी "आविक्ष्यतस्यकामप्रे...." पर्यंत पोहोचलेला असतो तर कुणी अजूनही "स्वस्ती साम्राज्यं..." पर्यंतच कसाबसा पोहोचलेला असतो. त्यात एकेकाच्या सुरांची विविधता ती काय वर्णावी ? कुणी मंद्र सप्तकात, अती मंद्र सप्तकात तर कुणी एकदम टीपेचा सूर लावलेला. सगळा कोलाहल आणि गलबला. एक सुरात गाणार कसे ? बरे नेमक्या मंगलाष्टकांच्या त्या शार्दूलविक्रीडीत वृत्ताची चाल आपण सातव्या, आठव्या वर्गात शिकलेलो असतो, त्यानंतर मराठी भाषेच्या शार्दूलाच्या विक्रीडीताशी आपण अजिबात संबंधीत नसतो त्यामुळे चालीबाबत सगळे चाचपडतच असतात. म्हणून बोहोल्याच्या आजुबाजूला उभी असलेली दोन्ही बाजूंकडील हौशी मंडळी वगळता कुणीही मंगलाष्टके म्हणण्यात आपला सूर सामील करीत नाहीत. (बरे ह्या हौशी मंडळींमधे उपवर मुलीच भरपूर असतात, हे माझे एक सामाजिक निरीक्षण. "कार्टे, त्या पिंकीच्या लग्नात जरा मंगलाष्ट्के म्हण. तिथे आमचे साहेब येणार आहेत. त्यांचा मुलगा / भाचा लग्नाचा आहे. तू लगेच डोळ्यात भरशील त्यांच्या." असे संवाद लग्नापूर्वी मी या कानांनी ऐकले आहेत हो.)
इतर व-हाडी मंडळी हातात तो रंगीबेरंगी कागद घेऊन, इकडे मंगलाष्टके सुरू असतानाच, "रामराव, कधी मिळणार आहेत हो सातव्या वेतन आयोगाचे ऍरीअर्स ?" किंवा "शामराव, काय झाल हो त्या तुकाराम मुंडेंच ?" या चर्चांमधे दंग असतात. तर समस्त स्त्री मंडळी , " ती देशपांडीण बघ, वधूपेक्षा हिचाच मेकप जास्त. शोभत नाही हो ह्या वयात." या आणि तत्सम चर्चांमधे दंग असतात. काहीकाही उद्दाम मंडळी तर त्या कागदाचा बोळा करून खिशात टाकतात, इतस्तत: फ़ेकतात. काही मंडळी त्या मंगलाष्टकांच्या कागदाचा मिळालेल्या अक्षता ठेवण्याचे पात्र म्हणून वापर करीत असतात. प्रत्येक वेळी बोहोल्यावरून "मंगलम" कानी पडले की आपली चर्चा थांबवून दोनचार अक्षता बोहोल्याच्या दिशेला उडवून आपले पवित्र कर्तव्य पार पाडतात. वधूवर तर आपल्याच तालात, आजुबाजूच्या मित्रमैत्रिणींच्या चिडवण्यात दंग असतात. वधूकडला किंवा वराकडला एखादा हौशी नातेवाईक तो मंगलाष्टकांचा कागद जपून ठेवतो किंवा लग्नात उपस्थित असलेल्यांपैकी एखाद्याच्या मुलाचे / मुलीचे लग्न ठरले असेल असा वरपिता / वधूपिता तो कागद आपल्या कार्यात त्या कवीला गाठायचेय म्हणून जपून ठेवतो. (या मंगलाष्टकांच्या कवींना याची कल्पना असतेच. म्हणून मंगलाष्टकांच्या शेवटी तो / ती आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर वगैरे छापून ठेवून आपली जाहिरात करण्याचा व्यावसायिक हक्क जपून ठेवतोच.)
लग्न लागते. सगळ्यांची धाव सुलग्न लावून वधूवरांना आशिर्वाद द्यायला किंवा ब्युफ़ेकडे असते. मांडवभर पडलेल्या कागदांकडे, कागदांच्या बोळ्यांकडे कुणाचेही लक्ष जात नाही. काहीकाही निसंतानी लहान पोट्टे (खास वैदर्भिय शब्द) एखाद्या बुकेमधली, हारामधली फ़ुले काढून त्यातल्या पाकळ्या काढून भिरकाव, वधूवरांच्या खुर्चीचा (उसवली असेल) तर फ़ोम काढून तुकडे काढून भिरकाव असले उपद्व्याप करीत असतात. (त्यांचे मायबाप मात्र मोठ्या कौतिकाने त्यांचे हे प्रताप बघत असतात, कधी काणाडोळाही करीत असतात.) त्यांच्या हातात जर हे कागद लागलेच तर त्या कागदांचेही तुकडे व्हायला वेळ लागत नाही. लग्न मांडवात सर्वत्र हे कागदाचे तुकडे विखुरलेले दिसत असतात.
थोड्या वेळाने मांडव झाडणारी मंडळी येतात आणि इतर कच-यासोबत कवीच्या अनेक तासांच्या मेहेनतीचा कचरा टोपलीत जमा झालेला आपल्याला बघायला मिळतो. अनेक तासांची प्रचंड मेहेनत, कधीकधी यमक जुळवायला, छान कल्पना सुचायला जागवलेली रात्र याची मेहेनत अवघ्या दहा पंधरा मिनीटात अक्षरश: जमीनदोस्त होते. मला नेहेमी असे वाटते की लग्नात जर त्या कवीला निमंत्रण असेल तर त्याला हे सगळे बघून नेमके कसे वाटत असेल ?
मग आत्ताही तुमचा दावा आहे का की तुम्ही केलेली मेहेनत ह्यापेक्षा कमी वेळात जमीनदोस्त होते म्हणून ?
- खूप लग्नप्रसंगांमधे सहभागी झालेला नसला तरी ज्या लग्नप्रसंगांमधे सहभागी झालोय ते डोळसपणे आणि पूर्णपणे झोकून सहभागी झालेला व-हाडी, राम किन्हीकर
No comments:
Post a Comment