Monday, September 7, 2020

आवडीने, भावे हरीनाम घेसी

 श्रीविष्णुसहस्त्रनामाच्या फलश्रुतीमधे,

"यशः प्राप्नोति विपुलं
ज्ञाति प्राधान्यमेवच
अचलां श्रियमाप्नोति
श्रेयः प्राप्तोत्तनुत्तमम" असे आहे.
(श्रीविष्णुसहस्त्रनामाच्या वाचकाला विपुल यश, अचल संपत्ती आणि उत्तम श्रेय मिळते.)
वाचून किती भारी वाटतं ना !
पण त्याआधीचा नेमका श्र्लोक आपण विसरतोय का ?
"भक्तिमान यः सदोत्थाय
शुचिस्तगदतमानसः
सहस्त्रं वासुदेवस्य
नाम्नां एतत प्रकीर्तयेत"
(जो भक्त भक्तीभावात उचंबळून जाऊन सदगदित अंतःकरणाने हे सहस्त्रनाम पठण करेल त्याला...)
एकनाथ महाराजांनीही नाही का, भक्तांना आश्वस्त करताना,
"तुझी चिंता त्यासी
सर्व आहे"
पूर्वी
"आवडीने, भावे
हरीनाम घेसी"
ही अट घातली आहे.
परमेश्वर हा भक्ताकडून फक्त शुध्द भावाचा भुकेला आहे हो. आजवर जगात झालेल्या सर्वात श्रीमंत माणसांमधे गणना होणार्या द्वारकाधीशाला आपण काय संपत्ती, हार फुले, पेढे देणार ? ज्याने फक्त स्वतःचाच राजवाडा सोन्याने मढवला नाही तर सर्व प्रजाजनांच्या घरावर सोन्याची कौले चढवली त्या राजासाठी आपण अर्पण करीत असलेल्या आपल्या संपत्तीची काय तमा ?
पण फार कमी लोक त्याला मनातला शुध्द भाव अर्पण करतात. ही गोष्ट त्यालाही दुर्मिळ आहे. त्याच भावापोटी त्याने अर्धी वाटी ताकाच्या लोभासाठी गोप बालिकांसमोर नृत्याविष्कार सादर केला. गोप गोपिकांच्या शुध्द भावामुळे त्यांनी अर्पण केलेल्या नैवेद्यावर समाधान न मानता, त्यांच्या घरचे लोणी, ताकादि पदार्थ चोरून खाल्लेत.
सुदाम्याच्या पोह्यांवर जीव लावत त्या पोह्यांचा अगदी चट्टामट्टा केला. कौरवाघरची पक्वान्ने सोडून देऊन विदुराघरी कण्यांवर ताव मारला. आणि "कृष्णाच्या देवत्वाविषयी अनभिज्ञ असलेल्या, त्याला केवळ आपला सखा मानून त्याच्यावर सहज प्रेम करणार्या गोपांना आपल्या हाताने घास भरवलेत."
"आवडीने" आणि "भावे"
एकनाथ महाराजांनी फार मार्मिक शब्द वापरलेत.
आता आठवड्याभरात बाप्पा आपल्या घरी येताहेत. त्यापाठोपाठ महालक्ष्म्या. (ज्येष्ठा - कनिष्ठा गौरी)
अगदी भावपूर्ण असे स्वागत या पाहुण्यांचे करूयात का ?
आणि हळूहळू या शुध्द भावालाच आपल्या सर्वकालीन उपासनेतला स्थायी भाव बनवूयात का ?
- परमेश्वराचा कायम उपकृत असलेला त्याचा सखा, साधक, भक्त राम

No comments:

Post a Comment