आजकाल सर्वच वृत्त वाहिन्यांवर वादविवादाचे एक विकृतच रूप बघायला मिळतेय. त्या कार्यक्रमाला हे लोक "वादविवाद" हे नाव तरी का देतात ? हेच मला कळत नाही. आपल्या वाहिनीवर तज्ञांना बोलवल्यानंतर त्यांना आपापसात झुंजवत ठेवणे किंवा त्यांना बोलूच न देता आपला मुद्दा रेटणे या गदारोळाला ही मंडळी "वादविवाद" म्हणतात याची अक्षरश: कीव कराविशी वाटते. आणि ही तथाकथित तज्ञ मंडळी तरी त्या अक्कलशून्य सूत्रधाराकडून स्वत:चा अपमान का करून घेतात ? हे सुद्धा न उलगडणारे कोडे आहे. एका तासासाठी ४००० - ५००० रूपये "मानधन" देऊन (खरेतर त्याला "अपमानधन" म्हणायला हवे.) केवळ दोन तीन वाक्ये तुम्हाला बोलायला देऊन ही सूत्रधार मंडळी स्वत:चाच मुद्दा रेटत असतात. आणि तुम्ही त्यांना जरा्सा जरी विरोध केलात तरी तुमचा सार्वजनिक अपमान करायला ही मंडळी टपलेली असतात. या सर्व प्रकाराला "वादविवाद" म्हणणे तर सोडाच, वितंडवाद सुद्धा म्हणवत नाही.
भारतीय दर्शनानुसार वादविवाद असे होत नाहीत. मुळात वादविवाद कशाला ? याबाबत आम्हा भारतीयांची दृष्टी अगदी स्पष्ट आहे. "वादे वादे जायते तत्वबोध:" वादविवादांमधून एकाच गोष्टीचे विविध पैलू समजून घेऊन श्रोत्यांनी स्वत:ला तत्वाचा बोध करून घेणे, शहाणे होणे हे वादविवादाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या संसदीय प्रणालीतले वादविवाद बघा. वादविवादाची सुरूवात एक जण प्रस्ताव मांडून करतो. त्या प्रस्तावावर खंडन आणि मंडन दोन्ही प्रकारची विद्ववत्तापूर्ण चर्चा होते. (होय, संसदेत / राज्यांच्या विधीमंडळात, बहुतांशी विधेयकांवर अशा प्रकारची गांभीर्यपूर्ण चर्चा होत असते. किंबहुना एखाद्या पंतप्रधानांनी / मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विश्वास प्रस्तावावर किंवा विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर सुद्धा अशीच चर्चा होत असते. केवळ प्रश्नोत्तर तासातला गदारोळ बघून आपण आपल्या विधीमंडळांविषयी मत कलुषित करू नये. शक्य असल्यास लोकसभा / राज्यसभा टीव्ही दुपारी संध्याकाळी बघावा.) आणि सरतेशेवटी ज्याने वादविवाद सुरू केलेला आहे त्याला पुन्हा बोलण्याची, आपल्या प्रस्तावाविरोधात मांडल्या गेलेल्या मुद्द्यांचे खंडन करण्याची संधी मिळते. (आठवा, १९९५ मध्ये, स्व. अटलजींच्या १३ दिवसीय सरकाराच्या समर्थनार्थ मांडल्या गेलेल्या विश्वास प्रस्तावावर समारोपाचे ते अटलजींचे भाषण. भारतीय संसदेत झालेल्या सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक असेच त्याचे वर्णन करावे लागेल.)
नागपूरला शाळेत शिकत असताना आणि कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात सुद्धा अनेक वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. पार जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय बक्षीसेही मिळवलीत. सर्वत्र असेच शालीन, संसदीय वादविवाद. सध्याचे आपले गृहराज्यमंत्री असलेले श्री. सतेज पाटील आमच्या विद्यापीठाचे "विद्यापीठ प्रतिनिधी" होते. १९९३ मध्ये कोल्हापूरला डी वाय पाटील शैक्षणिक संकुल परिसरात झालेल्या विद्यापीठस्तरीय वादविवाद स्पर्धेत, संपूर्ण शिवाजी विद्यापीठातून आलेल्या महाविद्यालयीन प्रतिनिधींच्या साक्षीने, सतेज पाटलांसमोर, त्यांच्याच पक्षाविरूद्ध (त्यावेळी ते कॉंग्रेसचे होते) भूमिका वादविवादातून मांडून त्यांची दाद आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळवलेले होते. आज ही सहिष्णुता, तो मोकळेपणा कुठेच दिसत नाही.
कराडला प्रथम वर्षाला शिकत असताना सुधीर मुतालीकच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थी परिषदेतर्फ़े "विद्यार्थी संसद" आयोजित केलेली होती. त्या आयोजनात आम्ही हिरीरीने पुढे होतो. खूप शिकायला मिळाले आणि खूप मजेचाही अनुभव घेतला. मला आठवतेय सुधीर घळसासीच्या नेतृत्वाखालील सरकारवर आम्ही त्या संसदेत अविश्वास प्रस्ताव आणून तो संसदीय मार्गाने, वादविवाद वगैरे करून पारितही करून घेतलेला होता. सुधीर गोखलेचा बिनतोड युक्तीवाद आम्हा विरोधी पक्षांना त्याप्रसंगी कामी आला होता. (१९९० मधली ही अशी ’त्रि सुधीरधारा’ आमच्या कायमची लक्षात राहिल. प्रेरक / मार्गदर्शक - सुधीर मुतालिक, सरकारस्थापक - सुधीर घळसासी आणि सरकारविरोधक प्रमुख - सुधीर गोखले.) आमच्या दोस्त कंपू पैकी एकेकजण असा लखलखीत हिरा आहे. त्यामुळे आजकालचा बाजारूपणा, सवंगपणा चटकन नजरेतून उतरून जातो.
मधल्या काळात एका हिंदीभाषाबहुल महाविद्यालयात अध्यापन करताना एका वादविवाद स्पर्धेचे परीक्षकपद प्राप्त झाले होते. आजकालच्या ९० % विद्यार्थ्यांचे वाचन आणि बाहेरील जगाविषयीचे आकलन तोकडे पडते हे माहिती होते, त्याचा पुनर्प्रत्यय आला. विद्यार्थ्यांनी वादविवादासाठी आपली संसदीय पद्धत सोडून देऊन टी. व्ही. वरची वादविवाद पद्धत निवडली होती. जो जेव्हढा आक्रस्ताळेपणा करेल तेव्हढा त्याचा मुद्दा बरोबर अशीच स्पर्धकांची समजूत दिसली. प्रेक्षकांमधूनही अशाच आक्रस्ताळेपणाला टाळ्या, दाद मिळताना पाहिली आणि "यानंतर इथे कुठल्याच वादविवाद स्पर्धेत प्रेक्षक म्हणून सुद्धा यायचे नाही" असा मनाशी चंग बांधला आणि त्या ठिकाणी अध्यापन करत असेपर्यंत तो पाळलादेखील.
आपल्या संस्कृतीतली ही उच्च आणि उदात्त वादविवाद प्रथा सोडून, सार्वजनिक नळांवरच्या भांडणांना लाजवेल अशा प्रकारांना आपण सर्वच भारतीय "वादविवाद" म्हणत चाललोय, याहून दुर्दैव ते अजून काय असेल ? आपलीच संस्कृती आपल्याच हाताने मातीमोल करणारे आमच्यासारखे नतद्र्ष्ट आम्हीच.
- म्हणूनच अर्णब गोस्वामीने मांडलेले मुद्दे कितीही बरोबर असले तरी त्याच्या एकंदर मांडणीमुळे त्याचे पटत नसलेला, वादविवादपटू, राम प्रकाश किन्हीकर.
(आता अर्णबच पटत नाही म्हटल्यावर इतर सगळे चिल्ले पिल्ले आवड्ण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एन डी टी व्ही, एबीपी माझा वगैरेंचा ’नॉट’ पणा फ़ेसबुक वगैरे तून वाचायला मिळतो. मुद्दाम लावून ती चॅनेल्स बघावीत एव्हढा वेळ, रूची आणि उत्साह नसतो.)
No comments:
Post a Comment