Saturday, January 1, 2022

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 2 (मराठवाडा)

 यापूर्वीच्या या लेखात प्रतिपादन केल्याप्रमाणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठवाडा हा निझामाच्या ताब्यात होता. आणि त्यामुळे मराठवाड्यातले बहुतांशी रेल्वेमार्ग निझाम स्टेट रेल्वेच्या अखत्यारित येत होते. आजही सिकंदराबाद येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यात मराठवाड्यातले बहुतांशी मार्ग आहेत. त्यामुळे या भागाच्या विकासाविषयी त्यांना विशेष प्रेम असणे शक्य नाही.  मनमाड ते काचीगुडा या संपूर्ण मार्गाचे रूंदीकरण व्हायला इसवीसन १९९८ उजाडले होते. तर अकोला ते पूर्णा मार्गाच्या रूंदीकरणासाठी २००८ पर्यंत वाट पहावी लागली होती. संपूर्ण आंध्र प्रदेश आणि तेलंगण येथे एकाच रेल्वे विभागाची सत्ता असावी म्हणून अत्यंत टोकाचे आग्रही असणारे सत्ताधारी त्या दोन राज्यात आहेत. तेलंगणात एकही किमी रेल्वे मार्ग हा मध्य रेल्वे किंवा दक्षिण - पश्चिम रेल्वेच्या अखत्यारित नाही. मग महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या विभागात सर्वच्या सर्व रेल्वेमार्ग परप्रांतियांच्या अखत्यारित का ?

 1. नांदेड विभाग हा मध्य रेल्वेत जोडला गेला पाहिजे. किंबहुना दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग, मध्य रेल्वेचा सोलापूर विभाग, नागपूर विभाग आणि भुसावळ विभागाचा काही भाग मिळून "मध्यवर्ती मध्य (Centrally Cenral)" असा विभाग निर्माण करून त्याचे मुख्यालय अकोला किंवा औरंगाबादला ठेवावे. विभागातल्या सर्व सुदूर ठिकाणांसाठी हे ठिकाण मध्यवर्ती ठरेल.

2. जालना - खामगाव हा रेल्वे मार्गे मराठवाड्याला आणि विदर्भाला जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे हे जाणून या मार्गाच्या कार्यवाहीसाठी मराठवाड्यातील खासदारांनीही जोर लावायला हवा.


3. नगर - बीड - परळी हा रेल्वेमार्ग तर त्रेतायुगापासून होणार म्हणून ऐकत आलेलो आहे. एव्हढ्यातच तो पूर्ण झाल्याचे वृत्त वाचायला मिळाले. आनंद झाला. पण आता त्या मार्गाला काटकोनात छेद देणारा सोलापूर - उस्मानाबाद (जं) - वाशी - मांजरसुंबा - बीड (जं) - गेवराई - औरंगाबाद (जं) - वेरूळ - चाळीसगाव (जं) - धुळे (जं) असा नवीन मार्ग आखण्याची गरज आहे. दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा आणखी एक जवळचा मार्ग यानिमित्ताने उपलब्ध होईल. सध्या सोलापूर - दौंड - अहमदनगर - मनमाड - भुसावळ - खांडवा - इटारसी - भोपाळ असा जवळजवळ २०० किमी लांबीचा फ़ेरा पडतो तो या नव्या मार्गामुळे कमी होईल.

 या मार्गावर बीड जिल्ह्यात महादेवाच्या डोंगररांगा तर धुळे जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगा रेल्वेमार्गाच्या आड य़ेण्याची शक्यता आहे. पण भारतीय रेल्वे आणि स्थापत्य अभियांत्रिकीतले तंत्रज्ञान आता खूप पुढे गेलेले आहे. ब्रिटीशांनी रेल्वेमार्गांची आखणी करताना ज्या गोष्टींसाठी काही विशिष्ट रेल्वेमार्ग करण्याचे टाळले त्या गोष्टींवर आता नव्या तंत्रज्ञानाने मात करणे सहज शक्य झालेले आहे. आपण आज सहज डोंगरातून मोठमोठे पूल उभारून, मोठमोठे बोगदे खणून या नैसर्गिक अडथळ्यांवर मात करू शकतो. आता हाती असलेल्या उपलब्ध संसाधनांचा, नवीन तंत्रज्ञानाचा, प्रशिक्षित मनुष्यबळाचा विचार करून भविष्याच्या दृष्टीने हे नवे रेल्वेमार्ग आखले जायला हवे आहेत. या नव्या रेल्वेमार्गांमुळे भारतीय अभियंत्यांच्या एका पूर्ण पिढीला काम मिळू शकते आणि इतर अनेक उद्योगांना आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला या रेल्वेमार्गामुळे चालना मिळू शकते हे लक्षात घेऊन नव्या रेल्वेमार्गाची आखणी व्हायला हवीय.

4. असाच आणखी एक रेल्वेमार्ग म्हणजे औरंगाबाद - अहमदनगर - पुणे हा रेल्वेमार्ग. जुन्याकाळी नद्यांवर पूल बांधण्याचे तंत्रज्ञान फ़ारसे प्रगत नसल्याने व त्यावर खर्च करण्याची ब्रिटीशांची इच्छा नसल्याने एखादी नदी न ओलांडता तिच्या काठाकाठाने ब्रिटीशांनी रेल्वेमार्ग आखले होते. भीमा नदी एकदाच ओलांडण्यासाठी, औरंगाबाद जिल्ह्यातली गोदावरी नदी ओलांडणे टाळण्यासाठी, शिरूर परिसरात असलेली कठीण भूगर्भशास्त्रीय रचना (Dykes and fractures) टाळण्यासाठी ब्रिटीशांनी पुण्यावरून आग्नेयेकडे भीमा नदीच्या काठाकाठाने दौंडपर्यंत मार्ग नेऊन मग परत ईशान्येकडे तो मार्ग आणून पुणतांब्याला गोदावरी नदी ओलांडली होती. आज उपलब्ध असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे गोदावरी नदीजवळ नवा पूल करून, आणि शिरूर येथेही रेल्वेमार्गाचे बांधकाम करून औरंगाबाद - अहमदनगर - पुणे हा रेल्वेमार्ग केला तर मराठवाड्याच्या विकासाला भरपूर हातभार लागू शकेल. सध्या औरंगाबादवरून पुण्याला जाताना दौलताबाद - नगरसूल - मनमाड - येवला - कोपरगाव - पुणतांबा - काष्टी - दौंड - केडगाव मार्गे उलटसुलट वळसा घेऊन ६० % जास्त लांबीच्या (२४० किमी ऐवजी ४१० किमी अंतराच्या) रेल्वेमार्गाने जावे लागते ते टळेल.


 
5. नगरसूल - पुणतांबा रेल्वेमार्ग हा शिर्डीसाठी सगळ्यात जवळचा रेल्वेमार्ग  होऊ शकेल. या मार्गाचीही घोषणा ऐकून बरेच दिवस झालेले आहेत. मार्ग कधी अस्तित्वात येईल ? याबाबत सगळ्याच स्तरांवर उदासीनता आहे.

6. लातूर रोड ते नांदेड या प्रवासासाठी सध्या परळी - परभणी - पूर्णा असे अकारण फ़िरून जावे लागते त्याऐवजी लातूर रोड - चाकूर - लोहा - नांदेड असा एक पर्यायी लोहमार्ग उपलब्ध व्हायला हवा आहे. हा मार्ग झाला तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र जवळच्या मार्गाने सांधला जाणार आहे. सेवाग्राम - नांदेड - लोहा - लातूर - बार्शी - कुर्डूवाडी हा सलग लोहमार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

खरेतर रेल्वे विकासाच्या बाबतीत आजवर सगळ्यात जास्त अन्याय मराठवाड्यावर झालाय पण मराठवाड्यातले राजकीय नेतृत्व याबाबत अनाकलनीयरित्या उदासीन राहिलेले आहे. आज रावसाहेब दानवेंच्या रूपाने रेल्वे राज्यमंत्रीपद मराठवाड्याकडे आलेले आहे. त्यांचा जास्तीत जास्त फ़ायदा मराठवाड्यासाठी करून घेण्याची सुवर्णसंधी आताच साधली पाहिजे.

 - महाराष्ट्राभिमानी रेल्वे प्रेमी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment