Saturday, January 22, 2022

विरूद्ध आहार : एक आठवण

 परवा मकरसंक्रांत झाली आणि काल महाविद्यालयात सहका-यांना वाटायला तिळगुळाचे लाडू घेऊन गेलो होतो. आता हे लाडू म्हणजे टिपीकल नागपुरी - वैदर्भी संस्कृतीतले लाडू. उगाचच पावणेतीन ग्रॅम तिळांना, दीड ग्रॅम साखरेच्या पाकात घोळवून, वर सव्वा ग्रॅम गुळाचे लिंपण करून तयार झालेल्या (बहुतांशी दुकानांमध्येच. घरी तिळगुळ करणे जरा out fashioned, down market वगैरे आहे ना, म्हणून.) लिमलेटच्या आकाराच्या दातफोड गोळ्यांना "तिळगुळ" म्हणून खपवू नये.



आणि असे लाडू सुध्दा किमान ५० + असलेत तरच मजा. आईने दररोज नवनवीन डबे बदलत लपवून ठेवलेला तिळगूळ चोरून खाण्यात जी मजा आहे ती उजागरीने असे १० - १५ लाडू खाण्यात नाही. पण आजकाल सगळ्यांचेच खाणे कमी झाले आहे. सगळ्यांच्याच तब्ब्येती नाजूक. एकेकाळी असले ३० - ३० लाडू आम्ही संक्रांतीच्या मौसमात खात असू. लाडूचा डब्बा आईला लपवून ठेवावा लागत असे. पण आज एकच लाडू पाहून एक सहकारी म्हणाले, "सर, अहो एव्हढा लाडू खाल्ला तर आम्हाला पचणार नाही हो." 

"काही नाही होत, सर. फ़क्त हा लाडू खाल्ल्यानंतर अर्धा तास तरी पाणी पिऊ नका म्हणजे झालं" आमच्या आईच्या, मावश्यांच्या पारंपारिक शहाणपणातून आमच्या कानावर आलेला पारंपारिक तोडगा मी त्यांना सुचवला. तिळगुळाच्या लाडवावर लगेच पाणी पिले तर पोटात गडबड होते हे पारंपारिक शहाणपण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवले.

असेच एक शहाणपण आम्हाला मात्र एका भयानक अनुभवातून मिळाले होते. फ़ेब्रुवारी २००९, इंदूरला परम पूजनीय नाना महाराजांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी गेलेलो होतो. सकाळी परम पूजनीय नानांच्या घरी दर्शन घेतले. तिथे गेल्यानंतर आमच्या सौं ना तर अगदी माहेरी आल्यासारखे वाटते. परम पूजनीय नाना तिचे गुरू. त्यामुळे गुरूघरी तिला अगदी माहेरचा आनंद मिळतो.

इंदूरला आल्यानंतर दुपारी सराफ़्यातून एक चक्कर मारत खास इंदूरची खादाडी करणे आणि संध्याकाळी एक चक्कर छप्पन दुकान परिसरातून मारणे हा आमचा जणू शिरस्ताच झालेला आहे. परम पूजनीय नानांच्या घरीही सगळ्यांना आमच्या या सवयी माहिती आहेत आणि त्याबद्दल आमची बरीच चेष्टा मस्करीही होत असतेच. (इंदूरच्या पहिल्या भेटीतील खादाडीची हकीकत येथे) त्याप्रमाणे आम्ही दुपारी ३ च्या आसपास सराफ़्यात चक्कर मारायला निघालो.

सराफ़्यात यावेळी तो जोशी काकांकडला बहुचर्चित "भुट्टेका कीस" खायचा होता. तिथे दुपारी गर्दीही नव्हती. चांगल्या दोन प्लेट भुट्टेका कीस सोबत तिथली आलु कचोरी पण मस्त चापली. (बाकी त्या "भुट्टेका कीस" चे वर्णन "मक्याच्या कणसांचा फ़ोडणीचा कीस" असे करणे म्हणजे पुलंच्याच भाषेत आपल्या आईची ओळख "आमच्या बाबांची वाईफ़" असे करून देण्यासारखे आहे. नाही, technically ते बरोबर असेलही पण कुठल्याच संस्कृतीत बसत नाही. आणि माळव्याच्या खवय्या आणि गवय्या संस्कृतीत तर नाहीच नाही.) 

सरत्या दुपारी असा दोन तीन प्लेट नाश्ता केल्यानंतर संध्याकाळी छप्पन दुकान परिसरात खाण्यासारखे विशेष असे काही नव्हतेच. नागपूरला परतीची गाडी चांगली रात्री ९.३० ची होती. मध्ये भरपूर वेळ होताच. तरीही संध्याकाळी छप्पन दुकानाच्या कोप-यावरच्या रबडीचा मोह मला आवरला नाही. सुपत्नीचे पोट पूर्ण भरलेले होते त्यामुळे तिने रबडी खाण्यास नकार दिला. आमचे पिल्लू तर अगदीच छोटे होते. तिचा इवलासा पोटोबा तर कधीच भरला होता. मी एकट्यानेच कुल्हड मधून आलेली ती मस्त घट्ट रबडी चापली. रात्रीचे फ़ॉर्मल जेवण वगैरे करण्याच्या भानगडीत आम्ही पडलोच नाही.

रात्री ९.३० ला गाडीत बसलो. झोपीही गेलो. सुपत्नी आणि सुकन्या वरच्या बर्थसवर आणि मी खालच्या बर्थवर असे आम्ही त्या द्विस्तरीय वातानुकूल शयनयान डब्यात गाढ झोपी गेलो. प्रवासात रात्री साधारण २ ते २.३० च्या सुमारास, गाडी भोपाळ ते इटारसीच्या मध्ये बुधनी घाटात होती. मला जाग आली आणि जाणीव झाली ती तीव्र पोटदुखीची. बरे, ही पोटदुखी भुकेमुळे होती (रात्री जेवण न करता असेच सटरफ़टर खाऊन आम्ही निघालो होतो ना ?) की पोटात अन्न जास्त झाल्यामुळे होती हे मला कळेना ? वपु काळे म्हणतात की "खर्च झाल्याचे वाईट वाटत नाही, हिशेब लागला नाही की त्रास होतो." तसे मला आपल्याला काही शारिरीक दुःख झाल्याचा त्रास होत नाही फ़क्त ते का झाले ? या प्रश्नाचे माझे मलाच उत्तर मिळाले नाही की त्रास होतो. त्यामुळे आत्ता पोट कशामुळे दुखतेय ? हे कारण न कळणे आणि सोबतच दुखणारे पोट अशा दुहेरी त्रासात मी आपले मन रमविण्याचा प्रयत्न करू लागलो. खिडकीचा पडदा बाजूला करून त्यादिवशीच्या चंद्रप्रकाशात सुंदर घाटातल्या प्रवासाचा आनंद घेण्याचा, त्यात मन रमविण्याचा प्रयत्न करू लागलो. पण छे !

मग नाईलाजाने वरच्याच बर्थवर झोपलेल्या सुपत्नीला उठवले. माझ्यासारखीच ती ही एक परिपूर्ण प्रवासी पक्षी असल्याने प्रवासाच्या तयारीत प्रवासात लागणारी सर्वसाधारण सगळीच औषधे ती बॅगमध्ये भरत असतेच. तिच्याकडून पुदीन हरा गोळी मागून घेतली आणि ती गोळी घेऊन पुन्हा खालच्या बर्थवर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो.

पण छे ! सकाळी ८.३० ला नागपूर येईपर्यंत झोप लागली नाहीच. पोटदुखी सुरूच होती. तीव्रता कमी झाली होती एव्हढच पण दुखणे पूर्णपणे थांबलेले नव्हतेच हे ही खरेच. घरी पोहोचलो आणि स्वच्छतागृहाच्या सतत वा-या सुरू झाल्यात. या वा-या नागपूरपर्यंतच्या प्रवासात सुरू झाल्या नाहीत याबद्दल निसर्गाचे आभार मानावेत ? की या सततच्या वा-यांमुळे गळून जाण्याच्या भावनेची चिंता करावी ? अशा द्विधेत मी सापडलो. घरी आईला सगळा प्रकार कथन केला आणि मग या त्रासाचा उलगडा झाला. मका आणि दूध असा विरूद्ध आहार मी (अजाणतेपणी का होईना) घेतलेला होता आणि त्याची पावती लगेच मला प्राप्त झालेली होती. तेव्हापासून विरूद्ध आहाराच्या बाबतीत मी जागरूक झालो आणि स्वतः तर टाळायला लागलो्च शिवाय मित्रांना, परिचितांनाही त्यापासून परावृत्त करायला लागलो. थोडा त्रास झाला खरा पण नक्की त्रास कशामुळे झाला ? या शंकेचे निरसन झाले आणि ज्ञानात नवीन भर पडली याचा आनंद त्रासाहून मोठा होता.


- जमेल तेव्हढ्या आयुर्वेदिक पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करणारा भारतीय, राम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment