Sunday, February 13, 2022

माघाची थंडी माघाची _ थंडी across सिझन्स.

(आजकाल असे mixed mode मध्ये लिहीण्याची फ़ॅशन का काय ते आहे म्हणे. मी म्हटले आपण ही लिहूयात. विचार पोहोचण्याला महत्व.)


आश्विन लागला आणि शारदीय नवरात्राला सुरूवात झाली की गुलाबी थंडीला सुरूवात होते. कपाटातले स्वेटर्स, शाली बाहेर काढल्या जातात. त्यांना दुपारचे ऊन दाखवले जाते. त्यांची धुलाई वगैरे होते. सकाळी सकाळी देवीच्या मंदिरात दर्शनाला जाताना अगदी थोडे गारठल्यासारखे होते पण तळहात एकमेकांवर घासले की पळून जाणारी. आश्विन संपता संपता दिवाळीच्या सुमारास थंडीत थोडी वाढ होते खरी पण दिवाळीच्या फ़टाक्यांच्या उष्णतेत आणि फ़राळाच्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात त्या थंडीची म्हणावी तेव्हढी जाणीव होत नाही.


कार्तिक सुरू झाल्यानंतर ८ -१० दिवसांनी कार्तिकाच्या बोच-या थंडीची जाणीव व्हायला सुरूवात होते. पण या थंडीचे कौतुकच जास्त असते. गेल्यावर्षी इतकी थंडी यावर्षी पडेल की नाही ? याचा अंदाज घेण्यात मंडळी दंग असतात. एखादे स्वेटर, जर्किन, विंडचिटर जास्त खरेदी होते खरे. शहरात उघड्यावर राहणा-या, झोपणा-या अभागी जिवांसाठी गरम कपडे गोळा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची टूम निघते आणि तरूण मंडळी उत्साहात त्यात सहभागी होतात.


मार्गशीर्ष येईपर्यंत थंडी चांगली स्थिरावलेली असते. मार्गशीर्षात श्रीगुरूचरित्र पारायणासाठी अगदी पहाटे उठून अंघोळ करावी लागल्यावर या बोच-या थंडीची जाणीव भाविकांना होते. पण श्रीगुरूचरित्र वाचनाच्या दृढनिश्चयापुढे भाविकांना या थंडीची तमा नसते. त्यातच या थंडीत पहाटे पहाटी दुलईच्या बाहेर निघण्याचा कंटाळा करणारी सूर्यवंशी मंडळी पहाटे उठून अंघोळ, पूजा करणा-यांचे कौतुक करून त्यांना हरभ-याच्या झाडावर चढवत असतात. त्या कौतुकाच्या धुंदीत पहाटेच्या थंडीचा बोचरेपणा बोचत नाही. पण मार्गशीर्ष पौर्णिमेला श्रीदत्तजयंती झाली की मग ही थंडी बोचायला लागते. "आपण एव्हढ्या थंडीत एव्हढ्या पहाटे उठून अंघोळ वगैरे कसेकाय आटोपत होतो ?" याचे स्वतःच स्वतःला कौतुक वाटण्याचा हा काळ. याच दरम्यान २२ डिसेंबरचा दिवस येतो. उत्तर गोलार्धात सूर्य पृथ्वीपासून सगळ्यात दूर असण्याचा हा दिवस. खगोलप्रेमी मंडळी "उद्यापासून सूर्य अधिकाधिक उत्तरेकडे सरकणार आणि त्यामुळे थंडी आता हळूहळू कमी होत जाणार." अशी मनाची "भौगोलिक" समजूत घालत मानसिक रित्या थंडी कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. 


पौष महिन्यात तर थंडी अगदी मी म्हणत असते. पौष महिना हा भारतीय परंपरेनुसार सूर्योपासनेचा महिना. दर रविवारी "पुषा इतवार" चे व्रत साजरे करणे, अंगावर उन्हे घेत वर्षभराचे व्हिटामिन डी साठवून घेणे. याच महिन्यात येणा-या मकर संक्रांतीच्या दिवशी (आणि नंतर पंधरवाडाभर) भरपूर तिळगूळ खाऊन शरीरात उष्णता साठवून घेणे अशा अनेक उपायांनी भारतीय जनमानस पौषाच्या थंडीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. सर्वसामान्यांसाठी "मकर संक्रांतीनंतर सूर्य तिळतिळ वाढून थंडी कमी होते." हा पारंपारिक शहाणपणा थंडीला मानसिक रित्या सहन करण्याची ताकद देतो. पण पौषापर्यंत थंडीला सगळे थोडे वैतागलेलेच असतात हे नक्की. "बापरे ! यावर्षी काय थंडी ! हा उदगार जवळपास प्रत्येकाच्या तोंडातून एकदातरी एव्हाना निघालेला असतो.


माघ महिना लागतो. वसंत पंचमी पासून वसंत ऋतू सुरू होतो. आता अत्यंत आल्हाददायक वातावरणाला सुरूवात होणार या जाणिवेने भारतीय मन हरखून जाते. रथसप्तमीपासून तर सूर्यनारायण आपल्या सातही घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन चौफ़ेर उधळणार या जाणिवेने मन सुखावते. उन्हाळा कितीही कडक असला तरी आता त्याची वाट पहाणे सुरू होते. आणि नेमके आताच थंडी जाताजाता तडाखा द्यायला सुरूवात करते. या अनपेक्षित हल्ल्याला आपण तयार नसतो. एकवेळ पौषातल्या थंडीला आपण सहन करतो पण थंडीने जाताजाता दिलेल्या या तडाख्या्ने मात्र आपण बावरून जातो. पौषातल्या थंडीत थोडावेळ सूर्यनारायणाच्या आस-याला गेलो तरी ती थंडी पळत असते पण आता माघात मात्र सूर्यनारायण सुद्धा आपली मजा पहात असतो. पौषापेक्षा माघात सूर्य अधिक जवळ आलेला आहे पण तरी थंडी पळवायला आपली मदत का करीत नाही ? हा प्रश्न आपल्यापैकी सगळ्यांना पडत असतोच. म्हणूनच "माघाची थंडी माघाची, थंडीची धुंदी थंडीची. अशा थंडीचा फ़ुललाय काटा..." वगैरे गीते प्रतिभवंतांना सुचली नसती तरच नवल. ज्या ठिकाणाहून आपल्याला धोका होणार नाही अशी खात्री असते त्याच ठिकाणाहून दगाफ़टका झाल्यावर जी मनाची अवस्था होते तशी या माघाच्या थंडीने होत जाते. "शिवरात्रीशिवाय थंडी कमी होणारच नाही." अशी काही जुनी जाणती मंडळी बोलायला लागतात. 


माघातली थंडी म्हणजे थोडी Love and Hate रिलेशनशिपसारखी असते. सुंदर थंडी निघून चालली म्हणून तिच्याविषयी ओढ आणि जाताजाता कसले असह्य तडाखे देतेय ! म्हणून तिच्याविषयी "जा की आता पीडा, टळ एकदाची" अशी भावना अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ.


अशातच फ़ाल्गुन येतो. होळीपासून अधिकृतरित्या थंड पाण्याने अंघोळ करण्याची परवानगी मिळते आणि उन्हाळ्याला सुरूवात होते. थंडीच्या आठवणी उरतात आणि पुढल्या वर्षीच्या थंडीची वाट पहाणे सुरू होते.


अर्थात हे सगळे वैभव सगळे ऋतू अनुभवणा-या मनांसाठीच बर का. सदानकदा ए. सी. त बसून राहणा-यांना कसले आलेय पौषाचे आणि माघाचे कौतुक ? शहरातल्या उंच उंच इमारतींमध्ये सूर्यदर्शन कधी होतेय ?, कधी नाही ? याची अजिबात तमा न बाळगणा-या तथाकथित ’उत्क्रांत’ लोकांकरिता कसली आलीय संक्रांत ? आणि कसली आलीय रथसप्तमी ? "सगळे जुनाट विचार आणि सण." असे मानणा-यांना निसर्ग समजेल कसा ? आणि केव्हा ?


- निसर्गासोबत स्वतःची दिनचर्या आखू इच्छिणारा, परमेश्वराच्या प्रत्येक नैसर्गिक देणगीबद्दल त्याचा आणि निसर्गाचा कृतज्ञ, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.


4 comments:

  1. हे मात्र खर् आहे, मुंबईतील अति शहररम्य अशा इमारतीतील रहिवाशांना पौष आणि माघाचे कौतुक काय ...

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, स्वप्नीलजी

      Delete
  2. ऋतुबदलांचे आणि त्यातील बारीकसारीक तपशीलांचे उत्तम शब्दांकन !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, प्रसादजी

      Delete