आजकाल आपण आपापल्या व्यापांमध्ये फार व्यस्त झालोय ? की व्यस्ततेचा हा व्याप आपण अकारणच आपल्यामागे लावून घेतलाय ?
वपु काळे म्हणतात की "नाटकाच्या १५ व्या रांगेतली तिकीटे काढलेल्या दोन माणसांनी एकमेकांना किती बिचकायचे ? एकमेकांपासून किती अंतर ठेऊन रहायचे ?"
मला वाटते हा तर्क कुठल्याही दोन व्यक्तींसाठी लागू होईल. नाटकाच्या पहिल्या रांगेतल्या दोन व्यक्तीही त्या तीन तासांसाठी एकाच सामाजिक आणि आर्थिक पातळीवर असतील ना ? त्यांनी उगाच एकमेकांशी "शिष्टपणा" करीत वागण्याचे काहीच कारण नाही.
पूर्वी प्रवासादरम्यान एकमेकांशी बोलणे व्हायचे. शिदोर्यांच्या गाठी सुटायच्यात तशा मनांच्याही गाठी एकमेकांसोबत सुटायच्यात. सुखदुःखांची देवाणघेवाण व्हायची. माझ्यासारखाच दुसरा कुणीतरी या जगात आहे या भावनेने मनाला आधार मिळायचा. आपल्यापेक्षा हुशार व्यक्ति भेटल्यानंतर त्या व्यक्तिचा आदर्श ठेवला जायचा. तो एक बेंचमार्क म्हणून बघितला जायचा. त्यामुळे आपलीही वाटचाल प्रगतीपथावर होत असे.
आज आपण अकारण "शिष्टपणा" करायला लागलोय हे माझे निरीक्षण आहे. प्रवासातल्या शेजारच्या माणसाचे तर सोडाच आपल्याला आपल्या शेजार्यांविषयी, सहकर्मचार्यांविषयीही फारशी माहिती नसते. एकमेकांना उगाच बुजून आपण संबंध फारसे वाढवीत नाही. वास्तविक समानशील व्यक्ती असतात, चांगली मैत्री होण्यासाठी वाव असतो, पण दोन्ही बाजूंकडला अकारण बुजरेपणा आड येतो.
अगदी रक्तातल्या नात्यातल्या नातेवाईकांबाबतही आपण असेच वागतो. कौटुंबिक व्हाॅटसॅप ग्रुपवर एकमेकांच्या प्रत्येक पोस्टसना थंब्सप (तिथेही आपली कंजुसी असतेच. वास्तविक एखादी गोष्ट आवडली तर मनमोकळेपणे काॅमेंट लिहून दाद द्या ना. पण तिथेही आपला शिष्टपणाच आड येतो.) देणारी दोन मंडळी एकमेकांच्या घरी (जर वर्षा दोन वर्षांनी वेळ आलीच तर...) फोन करून, व्यवस्थित अपाॅइंटमेंट वगैरे घेऊनच जातात. वास्तविक ज्याच्याकडे जायचय तो मनुष्य त्या सुटीच्या दिवशी बर्म्युडा घालून लोळत लोळत व्हाॅटसॅपच बघत बसलेला असतो पण त्याची "अपाॅइंटमेंट" वगैरे घ्यावी लागते.
याचा परिणाम असा झालाय की या personal space वगैरे पाश्चात्य कल्पनांना कवटाळण्यांच्या नादात आपण प्रत्येकजण एकटेपणाकडे वाटचाल करतो आहे. देश म्हणून, समाज म्हणून एवढेच काय कुटुंब म्हणूनही आपण विसविशीत होत चाललोय. नात्यांची घट्ट वीण हळूहळू का होईना उसवत चाललीय. एकमेकांचा आधार सुटत चालल्याचा भास होतोय. खरेतर थोडा मोकळेपणाने संवाद झाला आणि लक्षात आले की पुढली व्यक्ति सुध्दा आपल्यासारखीच मानवी सहचर्याला आसुसलेली आहे तर दोन व्यक्तिंमध्ये नवा पूल बांधला जाईल. विचारांचे दळणवळण सुकर होईल, आधार वाढेल, व्यक्ति, समाज आणि पर्यायाने राष्ट्र सुदृढ आधाराने उभे राहतील.
पुढल्या काही दशकांमध्ये मानसिक रोग हाच जगातला सगळ्यात मोठा आजार असेल असे तज्ञ भाकित करतात हे याच आधारावर. चला, अकारण शिष्टपणा टाळूयात, नैसर्गिक प्रेरणेने (अर्थात समाजव्यवस्थेचे सगळे नियम पाळतच) जगूयात, जे आपण नाहीत ते दाखवण्याचा, तसे जगण्याचा अट्टाहास आवरूयात.
"सर्वे भद्राणि पश्यन्तु" कडे सगळेच एकसाथ वाटचाल करूयात.
- अनोळखी व्यक्तिंशीही गप्पांमध्ये रमणारा, अघळपघळ नागपूरकर, रामभाऊ.
No comments:
Post a Comment