आज संध्याकाळी काही कामानिमित्त बर्डीवर जायचे होते. आजकाल शनिवार रविवारी नागपुरात बाहेर पडून गाडी चालवणे म्हणजे एक शिक्षाच वाटते. त्यातून बर्डीसारख्या गर्दीच्या ठिकाणी गाडी कुठे पार्क करावी ? हा एक वेगळाच प्रश्न. रस्त्यावरच वेडीवाकडी गाडी लावून स्वतः खरेदीसाठी बिनधास्त निघून जाण्याचा निर्लज्जपणा आमच्या अंगी बाणलेला नाही. अर्थात तो बाणावा ही इच्छाही नाही. बरे बर्डीवर जाणे खूप दिवसांपासून लांबणीवर टाकत आलेलो आहे. आता फ़ार लांबणीवर टाकणे जिवावर आलेले होते.
सकाळी सकाळी या समस्येचा विचार करताना सोपा उपाय सुचला. सुपत्नीला तो विचार सांगितला आणि चटकन तिलाही पटला.
संध्याकाळी महाविद्यालयातून घरी आलो. चहा घेतला. फ़्रेश झालो आणि आम्ही दोघे दुचाकीवर निघालो ते थेट जवळच्या जयप्रकाशनगर मेट्रो स्थानकावर. दुचाकी मेट्रो स्थानकात पार्क करून आम्हा दोघांचे जयप्रकाशनगर ते बर्डी जाण्यायेण्याचे प्रत्येकी १० रूपयांचे तिकीट काढले. (बर्डीवर दुचाकी पार्किंगसाठी १५ रूपये आणि चारचाकी पार्किंग साठी ५० रूपये मोजावे लागतात.) १० मिनीटांच्या आत मेट्रो आली आणि वातानुकुलीत गारेगार मेट्रोने रस्त्यावरच्या वाहतुकीची चिंता न करता आम्ही चक्क पुढल्या ३० मिनीटांत बर्डीवर होतो.
बर्डीवर चारचाकी पार्क करून आमच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी जेव्हढी पायपीट करावी लागते तेव्हढीच पायपीट मेट्रो स्टेशनपासून आमच्या नियोजित स्थळी जायला आम्हाला करावी लागली. अक्षरशः ४० व्या मिनीटाला आम्ही परतीच्या मेट्रोत होतो.
दीड तासात आम्ही आमच्या घरापासून बर्डीवर जाऊन विना चिंतेचे परतलो. गर्दीतून ड्रायव्हिंग करण्याचा ताण नाही, वाटेत होणा-या ट्रॅफ़िक जामची कटकट नाही, पार्किंग शोधण्याचा त्रास नाही. मस्त गारेगार आणि स्वस्तात मस्त जलद प्रवास. बस्स. यानंतर बर्डीवर जायला नेहेमी हाच मार्ग घ्यायचा हे आम्ही नक्की केले. आता तर नागपूर मेट्रोची ऍक्वा लाईन इतवारीपर्यंत सुरू होण्याची आम्ही मनापासून वाट बघतोय. एकदा ती झाली की इतवारी आणि महालच्या आमच्या वा-याही मेट्रोनेच करायच्यात हे आम्ही नक्की केले.
यापूर्वी मेट्रोची जॉय राइड आम्ही सहकुटुंब घेतली होती. अगदी खापरी ते बर्डी ते लोकमान्य नगर आणि परत अशी एकूण साडेतीन तास मेट्रो प्रवासाची मजा आम्ही लुटलेली होती. पण हा प्रवास उपयुक्त आहे आणि त्याची उपयुक्तता आपण वाढवली पाहिजे ही भावना आज दृढ झाली.
मेट्रो स्टेशन्स पासून आसपासच्या परिसरात पूरक सेवा म्हणून इलेक्ट्रीक रिक्षा / आपली बस सेवा अगदी रास्त दरात उपलब्ध झाल्यात (५ रूपये ते १० रूपये प्रतिमाणशी) तर मेट्रोला अधिक चांगली पसंती मिळू शकेल असे वाटले. एकंदर नागपूर मेट्रो हळूहळू बाळसे धरतेय हे पाहून मनस्वी आनंद झाला.
- एक उत्साही प्रवासी पक्षी रामूभैय्या नागपूरकर.
No comments:
Post a Comment