तान्ही बाळे आपल्या आईच्या कुशीत किती आश्वस्त असतात, नाही ? ते मूल आपल्या जगातच दंग असते. आपल्या भरणपोषणाची आणि रक्षणाची सर्व काळजी आपली आई घेतेय हे त्याने अध्याहृतच धरलेले असते.
आपण भगवतीची उपासना करताना तितके आश्वस्त, तितके निश्चिन्त असतो का ? उपासना करीत असताना दरम्यान आपल्या सर्व भल्या बुऱ्याची काळजी आपली ही आई घेणार आहे ही भावना मनात स्थिर होते का ? चंडी कवच वाचत असताना ती भगवती आपल्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहे ही आपली भावना दृढ होते का ? मला होणारे सर्व आधिभौतिक, आधिदैविक किंवा अध्यात्मिकही त्रास आपल्याला ज्या जगदंबेने स्वतःच्या हृदयाशी धरलेले आहे ती वाघिणीसारखी झडप घालून दूर करणारच याची आपल्याला खात्री आहे का ?
अर्गला कवच वाचताना आपण आपल्या आईकडे काही काही गोष्टींचा हट्ट करतोय आणि बालकाच्या नुसत्या चुळबुळी वरून त्याच्या मनाची अवस्था जाणून त्याचा हट्ट पुरवणाऱ्या प्रेमळ मातेप्रमाणेच आई भवानी आपला तो हट्ट ती पुरविणारच आहे अशी आपल्या मनाची धारणा होते का ?
आता दोनच दिवसांनी शुभकृत नामक नूतन संवत्सर सुरू होते आहे. या महिन्यात प्रतिपदेपासून श्रीराम नवरात्र आणि सोबतच आई भगवतीचे नवरात्रही सुरू होत असते. या संवत्सरात आपल्या उपासनेत हा जननी - बालक भाव आणूयात का ? आणि "सकळ जीवांचा करितो सांभाळ, तुज मोकलिल ऐसे नाही." या नाथ उक्तीचा अनुभव घेऊयात का ?
- अनंत जन्मांपासूनचा रेणुकादास आणि आताशा "किती भार घालू रघूनायकाला ?" या भावनेने चित्तात गलबलून जाणारा बालक, राम प्रकाश किन्हीकर
No comments:
Post a Comment