करोनानंतर शाळा नियमित सुरू झाल्यात. सकाळी माझ्या कामावर जाण्याच्या वेळेत बहुतांशी शाळांच्या बसेस दिसतात आणि खूप दिवसांपासून मनात असलेली एक गोष्ट सर्वांसमोर विचारार्थ मांडण्याची इच्छा होते.
नागपूरला एका चांगल्या शिक्षण संस्थेच्या ६ शाखा आहेत. एक उत्तर नागपुरात, एक पूर्व नागपुरात, एक दक्षिण नागपुरात, एक नैऋत्य नागपुरात, एक शाखा अगदी मध्यवर्ती भागात तर आणखी एक शाखा नागपूरच्या पश्चिमेस ४० किमी अंतरावर असलेल्या एका गावात. मी नैऋत्य नागपुरात राहतो. तिथली मुले मला नागपूरबाहेरच्या किंवा थेट उत्तर नागपुरातल्या शाळेच्या बसने तिथे तिथे जाताना दिसतात. असेच चित्र पूर्व नागपुरात राहणार्या माझ्या बहिणीच्या मुलांबद्दल दिसते. त्यांना घराजवळ १ किमी अंतरावरच्या त्याच संस्थेच्या शाळेत प्रवेश मिळालेला नाही तर १० किमी दूर दक्षिण नागपुरातल्या त्याच संस्थेच्या शाखेत प्रवेश मिळालाय.
७ -८ वर्षांची कच्चीबच्ची आपला खेळण्याचा, अभ्यासाचा अमूल्य असा दोन अडीच तासांचा वेळ, अशा नाहक प्रवासात का घालवतात ? या भावनेने त्यांच्याविषयी अपार कारूण्य दाटून येते. एकाच संस्थेच्या ६ शाखांमधल्या शाळांच्या दर्जात काय फरक असणार ? मग पालक मंडळी त्याच संस्थेच्या विशिष्ट शाखेतच प्रवेश मिळायला हवा हा हट्टाग्रह का धरतात ? आणि ईश्वरचिठ्ठीद्वारे सोडत काढून प्रवेशनिश्चिती करणारी संस्थासुध्दा, शाळेच्या एखाद्या शाखेपासून विशिष्ट परिघात राहणार्या मुलांचे प्रवेश त्याच शाखेत करण्याचा आग्रह का धरीत नाही ? ही न उलगडणारी कोडी.
आपण बालपणातले नक्की काय गमावतोय ? हे त्या बालकांना आज कळत नसेल पण त्यांच्या पालकांनाही कळत नसेल तर ही शोकांतिका आहे. कळत असूनही एकाच संस्थेच्या एखाद्या विशिष्ट शाखेच्या दर्जाविषयी भ्रामक कल्पना करून घेत "माझ्या पाल्याला याच शाखेत पाठवायचे / पाठवायचे नाही." असा हट्ट करणारे पालक किती मोठा अपराध करतायत हे त्यांना कळायला हवे.
शाळेच्या एकाच कुठल्यातरी शाखेचे सगळेच विद्यार्थी आय आय टी त जातात आणि इतर शाखेतला एकही जात नाही ही किती भ्रामक कल्पना आहे ? हे पालकांना कधीच कळणारच नाही का ?
- २७ वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केल्यावर प्राथमिक शिक्षणातच आमूलाग्र बदल घडवून आणणे अत्यंत जरूरीचे आहे या ठाम जाणिवेचा, राममास्तर.
No comments:
Post a Comment