१९९२.
स्थळः कराड
आमची, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एक बैठक.
बैठकीत निमंत्रित म्हणून आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जी. सी. मानकर सर आणि आमच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातले ज्येष्ठ प्राध्यापक डाॅ. जे. जी. मुळे सर.
बैठकीच्या शिरस्त्यानुसार बैठक सुरू होण्यापूर्वी सामील सदस्यांनी आपापला परिचय सर्वांना करून द्यायचा असतो. तसा तो एका शिस्तीत सुरू झाला.
मानकर सरांचा क्रमांक आल्यानंतर त्यांनी "मी जी सी मानकर, शिक्षक आहे." एव्हढाच परिचय दिला. एक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राचार्य हा शासनाच्या राजशिष्टाचारानुसार बर्याच मोठ्या अधिकाराचा मानकरी असतो. शिवाय त्या पदाला सामाजिक प्रतिष्ठाही फार मोठी असते. मानकर सर एक प्रशासक म्हणून तर खूप मोठ्ठे होते पण एक माणूस म्हणूनही खूप खूप मोठ्ठे होते. (त्यांच्या अंतरंगातील साध्या निर्मळ माणसाचे आम्हाला झालेले दर्शन हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.) पण त्या बैठकीत त्यांचा हा सहजसुलभ साधेपणाचा पैलू आम्हाला त्यांचे निराळेच दर्शन घडवून गेला.
त्यानंतर आमच्या मुळे सरांची स्वपरिचयाची वेळ होती. एक अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, एक उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक, कोयना भूकंपानंतर महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीतले भूगर्भशास्त्रीय तज्ञ असा त्यांचा प्रोफाईल खूप जोरदार होता. (शासकीय सेवेनंतर सरांनी चिखली आणि औरंगाबादला खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पद भूषविलेले होते.) पण परिचय देताना त्यांनी "मी जयकुमार मुळे, शिक्षक आहे." अशीच स्वतःची ओळख करून दिली होती. १९९२ मध्ये शिक्षणक्षेत्रात पी. एच. डी. असणारी खूप कमी आणि खूप थोर माणसे होती. पण मुळे सरांनी स्वपरिचयादरम्यान डाॅक्टर असल्याबद्दलचा स्वतःचा उल्लेखही त्या बैठकीत कटाक्षाने टाळला होता.
बैठकीचे कामकाज पुढे सरकले. बैठकीचा इतर तपशील लक्षात नाही पण आमच्या या दोन शिक्षकांचा खूप मोठ्ठा साधेपणा आमच्या हृदयावर कायमचा कोरला गेला हे मात्र नक्की.
आज ३० वर्षांनंतर मी सुध्दा त्याच शिक्षकी पेशात एकापेक्षा एक स्वप्रौढी मिरवणारे, आडात आणि पोहर्यातही काहीच नसलेले नमुने अनुभवतोय. त्या पार्श्वभूमीवर आमच्या शिक्षकांचे मोठेपण अगदी आभाळाएवढे होते. ज्ञानोबामाऊलींच्या "चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन" या उक्तीची प्रतिती देणारे.
आजची एकूणच शिक्षणक्षेत्रातली अवस्था पाहिल्यानंतर अशी मंडळी आजकाल कुठे गेलीत ? या प्रश्नाचे उत्तर एका आंग्ल भाष्यकाराने दिले आहे.
"When short people tend to cast long shadows, Its time for sun to set."
- कितीही काळ लोटला तरी स्वतःवर झालेले उत्तम संस्कार न विसरणारा कृतज्ञ विद्यार्थी, कुमार राम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment