Friday, March 25, 2022

मराठी माणूस आणि व्यावसायिकता.

नागपूरात "विष्णुजी की रसोई" सुरू झाल्यानंतर वर्षात साधारणतः १० ते १२ वेळा या दराने आम्ही तिथे गेलो असू. वेगवेगळ्या निमित्ताने, वेगवेगळ्या गटांमध्ये, कधी नुसते कुटुंबियांसह. इथले सात्विक वातावरण आणि सात्विक अन्न हे मन मोहून टाकणारे आहे. केवळ उदरभरण न करता यज्ञकर्म पार पाडत असल्याची अनुभूती आपल्या घरानंतर विष्णुजी की रसोई, मालेगावचा " साई कार धाबा" (यावर मी एक लेख आणि ब्लाॅग लिहीलाय.) आणि देऊळगावराजा इथला "चैत्रबन धाबा" (यावर मी एक सविस्तर लेख लिहीणार आहे.) इथेच येते.


आजही आम्ही सात्विक भोजनाचा आनंद घेण्यासाठी "विष्णुजीं" कडे गेलो होतो. आमच्या दिनचर्येत रात्रीचे जेवण ७ ते ७.३० पर्यंत आटोपून घेतो. त्यापेक्षा अधिक उशीर झाला तर जेवण न करता आम्ही सगळे अगदी अल्पोपहारच घेतो.

आम्ही संध्याकाळी ७.३० ला तिथे पोहोचलो तेव्हा जेवणाची सिध्दता नुकतीच सुरू होती. आजकाल सगळीच मंडळी रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान जेवत असतात त्या अंदाजाने संध्याकाळी ७.३० च्या "विष्णुजीं"च्या तयारीत काही त्रुटी असणे स्वाभाविक होते. आम्हाला त्याचा अनुभव आल्यावर आम्ही सुरूवातीलाच त्याविषयी थोडी नाराजी तिथल्या व्यवस्थापक मंडळींकडे (बहुधा विष्णुजींचे धाकटे भाऊ) यांच्याकडे तोंडीच व्यक्त केली.

एका सामान्य माणसाच्या थोड्याशाच नाराजीवर भराभर सूत्रे हललीत आणि अक्षरशः दोन मिनिटांमध्ये "विष्णुजीं" च्या नावलौकिकाला साजेशी अशी सुव्यवस्था तिथे प्रस्थापित झाली होती. आमचे जेवण झाल्यानंतर निघताना मी त्या व्यवस्थापकांचे या बाबतीत आवर्जून आभारही मानलेत.

"मराठी माणूस व्यावसायिकतेत मागे पडतो.", "मराठी व्यावसायिक आत्ममग्न आणि ग्राहकविन्मुख आहेत." ही ओरड आपण नेहेमी ऐकतो पण विष्णु मनोहरांसारख्यांकडे बघितल्यावर याचा अगदी विपरीत अनुभव येतो. इतकी आतिथ्यशीलता पंजाबी, गुजराथी व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्येही अनुभवायला येत नाही.

माणसे उगाचच मोठी व्यावसायिक होत नाही.

अत्त्युच्च पदी असलेल्या व्यावसायिकाच्या अंगचे सदगुण,त्याची तत्वे त्या आस्थापनात काम करणार्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत झिरपून त्याप्रमाणे सगळ्यांचे आचरण घडते ते आस्थापन एकसंधपणे, एकदिलाने आणि एक एकक म्हणून काम करतेय हे निश्चित. त्यासाठी ग्राहकांच्या आशिर्वादाचे असे भरपूर पुण्य पाठीशी असावे लागते.
- एक सर्वसामान्य आणि तृप्त ग्राहक, राम भोजनभाऊ.

No comments:

Post a Comment