Sunday, March 27, 2022

काश्मीर फाइल्स , कराडच्या आठवणी

कराडला शिकत असताना मी वर्षभरात किमान ५०० पत्रे तरी पाठवायचो. (प्रत्येक पाठविलेल्या पत्राचा हिशेबही आहे.) मलाही दिवसाला सरासरी १ याप्रमाणे सगळ्या नातेवाईक, मित्र मंडळींची पत्रे यायची. होमसिक असलेल्या हाॅस्टेलरसाठी ही पत्रे खूप मोठा आधार होती. त्यातली बरीच नातेवाईक मंडळी अशी आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यातले एकमेव असे पत्र मला लिहीले असेल.





कराडला गेल्यावर पहिलाच मुक्काम तिथल्या संघ कार्यालयात झाला होता. आणि हाॅस्टेलला थोडे स्थिरस्थावर झाल्यावर समविचारी मित्रांसह विद्यार्थी परिषदेच्या कामात आम्ही गुंतलो होतो. १९९०, जानेवारी महिन्यापासूनच काश्मीरात काहीतरी गडबड सुरू असल्याची जाणीव झाली होती. आम्ही सगळेच धडपडे आणि बहुश्रुत तरूण होतो. वेगवेगळ्या माध्यमांमधून बातम्या वाचून "Reading between the lines" करत आम्ही ती भीषणता अनुभवत होतो. त्यातच काश्मीरातून विस्थापित झालेल्यांच्या अनुभवकथनाचा कार्यक्रम संघाशी संबंधित एका संस्थेने पुण्यात ठेवला होता. त्यांच्या मदतीसाठी सर्वसामान्यांना आवाहनही केले होते. आम्हाला आठवतय आम्ही कराडच्या चावडी चौकात या स्थलांतराच्या निषेधाचाही कार्यक्रम आयोजित केलेला होता. जोरदार घोषणाबाजी, फलकबाजी यांनी आम्ही सुधीर मुतालिकच्या नेतृत्वाखाली चावडी चौक दणाणून सोडला होता.
त्याकाळी आम्हा तरूणांना एखाद्या सद्यस्थितीबद्दल महत्वाच्या विषयावर अभ्यास करून बोलावे लागत असे. त्यासाठी कराडच्या नगर वाचनालयाचे सभासदत्व आम्ही घेतले होते (वार्षिक शुल्क रू. ३ फक्त) एखाद्या विषयावर ग्रंथालयात जाऊन, संदर्भ ग्रंथ चाळून, ताज्या बातम्यांचा अभ्यास करून आपले मत त्याठिकाणी मांडावे लागत असे. त्या भाषणानंतर श्रोत्यांसह प्रश्नोत्तरांचाही कार्यक्रम होत असे. ज्ञानात भर टाकणारा, सामाजिक दृष्ट्या सजग करणारा, व्यक्तिमत्व सर्वांगाने फुलविणारा हा तत्कालीन उपक्रम.
आज #TheKashmiriFiles बद्दल वाचताना, ऐकताना मनात कसलीच उत्सुकता का वाटत नाहीये ? याचा मनोमन धांडोळा घेतला असताना मला ही जुनी पत्रे सापडलीत आणि माझा मलाच उलगडा झाला. या सगळ्या अनुभवातून आम्ही तर १९९० मध्येच गेलोय. तेव्हाचा चटका ताजाच आहे. आता त्यावर हा नवा चटका बसतच नाहीये.
- संघ आणि अभाविप कार्यकर्ता, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment