Friday, February 19, 2021

भक्तिऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे.

 श्री तुकोबांचा परखड स्वभाव हा त्यांच्या सख्य भक्तिचा अत्युच्च आविष्कार आहे. त्यांची पांडुरंगाशी संभाषणे प्रत्येक भक्तिमार्गाने जाणा-याने आपल्या हृदयात कोरून ठेवावी अशीच आहेत.


तुकोबांनी किंवा इतरही संतमंडळींनी भक्ति केली ती केवळ भक्तिसाठीच. त्यात "मला देव दिसावा, मिळावा." हे सुद्धा प्रलोभन नव्हते. शुद्ध निस्वार्थ भक्ति. 


आपण सर्वसामान्य संसारी जन मात्र संसारातल्या नश्वर गोष्टींच्या प्राप्तीसाठी परमेश्वराला अक्षरशः वेठीला धरतो. व्रते, उपोषणे, अनुष्ठाने सगळे काही संसारातल्या या ना त्या सुखाच्या प्राप्तीसाठी.


असे म्हणतात की परमेश्वर कुठल्याही भक्ताचे ऋण आपल्यावर बाळगत नाही. तुमच्या भक्तिचे फ़ळ तुम्हाला तो निश्चितच परत देतो. भक्ति खरी असेल तर तुम्ही मागितलेली वस्तू तुम्हाला मिळते. आपल्या लेकराने कितीही वेडावाकडा हट्ट केला तरी आई ज्याप्रमाणे तो पुरविण्यासाठी प्रयत्न करते तसा परमेश्वर आपले हट्ट पुरविण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्या भक्तिऋणातून तो ताबडतोब उतराई होण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजे बघा, रोज १५ मिनीटांचीच पूजा. पण त्यातही आपण "रूपं देही, जयं देही, यशो देही, व्दिषो जही" सारखे मोठ्ठे मागणे मागतो आणि ती जगन्माता ते मागणे भक्तावरील पुत्रप्रेमाने पूर्ण करतेही.


म्हणजे आपण या अध्यात्मिक बॅंकेत १ लाख रूपये भरून २ लाखाचा ओव्हरड्राफ़्ट घेतो. जो आपल्याला आपल्या पुढल्या जन्मात फ़ेडायचा असतो. पण श्री तुकोबांसारख्या संतमंडळींचे तसे नाही. ते या अध्यात्मिक बॅंकेत नुसते संचयच करीत असतात. आपल्या स्वार्थासाठी, लौकिक मागण्यांसाठी आपल्या अकाउंटचा चेक ते कधीच देत नाहीत. मग तो परमेश्वर यांचा कर्जदार होतो. संतांचे देवावर ऋण एव्हढे होते देवाला संतांकडे काहीतरी गहाण ठेवण्याची वेळ येते. म्हणजे या अध्यात्मिक बॅंकेत देव ऋणको आणि भक्त धनको होतो.


त्या भावनेतूनच श्री तुकोबा विठठलाला बजावताहेत, बा विठठला माझ्या भक्तीचे जे तू ऋण घेतले आहेस त्याच्या बदल्यात तू तुझे चरण माझ्या हृदयात गहाण म्हणून ठेवले आहेत. माझे भक्तिचे ऋण पहिल्यांदा परत कर आणि माझ्या हृदयात जे तुझे चरण गहाण आहेत ते सोडवून घेऊन जा.


भगवंत कधीतरी हे असले ऋण फ़ेडू शकेल का हो ? एकतर हे असले ऋण फ़ेडण्याची त्याची कधी इच्छाच होणार नाही. आणि तशी इच्छा झालीच, तरी तो आपल्या भक्ताची भक्ति कशी करू शकेल ? आणि भगवंताने आपल्या भक्ताची भक्ति केलीच तरी ती निष्काम भक्ति कशी होईल ? भक्ताने तर कुठल्याही मागण्यांविना भक्ति केलेली आहे. पण आता भगवंत आपल्यावरचे ऋण फ़ेडण्यासाठी आपल्या भक्ताची भक्ति करतो असा त्याचा अर्थ होईल ना ? मग भक्ताच्या निष्काम भक्तिच्या उत्तरात भगवंताची आपल्या भक्ताप्रती ही सकाम भक्तीच झाली, नाही का ? 


नाही, तसा त्या भगवंताने तसा एकदा प्रयत्न केला होता खरा. सर्वश्रेष्ठ असलेल्या व्दारकाधीशाने संत एकनाथांच्या घरी एक दोन नव्हे तब्बल १२ वर्षे पाणक्याचे, स्वयंपाक्याचे काम केले होते. पण तरीही तो संतांच्या ऋणातून मुक्त होऊ शकला नाही. तो पैठण मधून निघून गेल्यानंतर संत एकनाथांनी डोळ्यात पाणी आणून भगवंताचे खरे स्वरूप न ओळखता आल्याबद्दल, त्या भगवंताला कामाला लावल्याबद्दल प्रचंड शोक केला होता. तेव्हा भगवंताला "तुज मज नाही भेद, केला सहज विनोद" असे सांगून भक्ताची त्याच्या शोकातून मुक्तता करावी लागली होती. पण म्हणजे ऋणातून मुक्तता राहिली ती राहिलीच.


आपण सगळे अध्यात्माच्या मार्गावरील मंडळी आहोत. भगवंताला अशा प्रकारे आपला अंकित करण्याची मनिषा आपण बाळगूयात का ? 

"रूपं देहि, जयं देहि, यशो देहि, व्दिषो जहि" या मागण्यांपासूनचा आपला प्रवास "किती भार घालू रघूनायकाला, मजकारणे शीण होईल त्याला" या जाणीवेपर्यंत नेऊयात का ?


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर (रथसप्तमी, १९/०२/२०२१)




1 comment: