Thursday, June 29, 2023

पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती.

 


आज सकाळी सकाळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक श्री. विंदा करंदीकर यांची कविता आठवली.


पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा

सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा

खूप करतो दंगा मस्ती, खोड्या करण्यात आहे अट्टल

मास्तर म्हणतात "करणार काय ? न जाणो असेल विठ्ठल."


पांडुरंग हे सगळ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत. शैव आणि वैष्णव या दोन्हीही सांप्रदायांना सारखेच प्रिय. आपण मराठी माणसे आपल्या देवाशी इतके सख्य करतो की आपल्या मित्रासारखी त्याचीही चेष्टा आपण करतो. म्हणूनच विंदांना ही कविता सुचली असावी. या कवितेत पांडुरंगाच्या काळ्या रंगावरून त्याला चिडवण्यात विंदांची सख्यभक्तीच मला जास्त दिसली.


पंढरपूरला पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती खरेतर काळ्या पाषाणाची आहे. पांडुरंग म्हणजे पांढरा रंग. "पांढरा" हा शब्दच मुळी पांडु या शब्दापासून आलेला आहे. त्या काळ्या रंगाच्या मूर्तीतून अत्यंत दिव्य अशा प्रकारची तेजस्वी प्रभा बाहेर पडत असल्याचे भक्तांना दिसत आलेली आहे. बरे ही अनुभूती फ़क्त संत मंडळी घेतात काय ? नाही. पांडुरंग हा सर्वसामान्य माणसाचा देव आहे. आपल्या वारकरी भक्तांसारखा भाजी भाकरीवर राजी असणारा हा देव आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या मूर्तीतून चैतन्यमय असणारे हे तेज आपण सर्वसामान्यही सहज बघू शकतो. कधीतरी पंढरपूरला गेल्यावर सगळे व्यापताप विसरून. स्वतःचा देह, स्वतःला विसरून एकदा फ़क्त आपण विठ्ठलाकडे नीट डोळे भरून बघितले की त्या काळ्या विठ्ठलातून अत्यंत दिव्य अशा प्रकारची प्रभा, तेज बाहेर पडत असल्याचे आपल्यालाही दिसेल. आपण बाह्य जगात फ़ार गुंततो. तेच गुंतणे आपण देवासमोरही घेऊन जातो. मग दर्शन हा फ़क्त एक उपचार उरतो. दर्शन घेणे, आपल्या मागण्या मागणे आणि बाहेर पडणे यात आपल्या चित्तात त्याच्याविषयी काय आणि किती प्रेम उत्पन्न झाले ? या प्रश्नाचे उत्तर आपण शोधतच नाही. पण स्वानुभवावरून सांगतो की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिक माणसालाही ही दिव्य प्रभा अनुभवण्याचा हा अनुभव येणे फ़ार कठीण नाही.


"देवाच्या सख्यासाठी, पडो जिवलगांच्या तुटी" या स्थितीपर्यंत अगदी आपण नाही पोहोचलो तरी क्षणभर स्वतःला विसरून त्याच्या ’दर्शना’ साठी आपण आलोय ही भावना मनात स्थिरावली की आपोआप ती मूर्ती चैतन्यरूप होते आणि त्यातून एक दिव्य तेज, अलौकिक प्रभा बाहेर झळकत असल्याचा ज्ञानोबामाऊलींचा अनुभव आपणही घेऊ शकतो.


मी पहिल्यांदा तिरूपतीला गेलो होतो तेव्हा हा अनुभव मला तिथेही आला होता. तिथली बालाजीची मूर्तीही अशीच काळ्या पाषाणातली आहे. मी पहिल्यांदा तिथे जातोय म्हटल्यावर तिथे नेहेमी जाणा-या माझ्या एका मामेभावाने मला एक टीप दिली. तो म्हणाला, "राम, तू मुख्य सभामंडपात जाशील ना तेव्हा तिथे खूप गर्दी असते. बालाजीसमोर गेल्यानंतर तिथे डोळे भरून पाहीपर्यंत आपल्याला तिथली मंडळी थांबू देत नाहीत. तितका वेळच नसतो. तेव्हा तू मुख्य मंडपात प्रवेश करशील त्या क्षणापासून सरळ बालाजीकडे लक्ष ठेव. तिथे बालाजीकडे जाताना थोडा उतार आहे, त्यामुळे दूरून तुला दर्शन होत राहील. अगदी पुढे मूर्तीसमोर जाईपर्यंत दोन तीन मिनीटे तुला डोळेभरून दर्शन घेता येईल. इतर बहुतांशी मंडळी त्या मंडपात गेल्यानंतर सुरूवातीला तिथे असलेले सोने चांदी जड जवाहिरेच निरखत बसतात आणि बालाजीसमोर आल्यानंतर तिथे थांबू न दिल्याबद्दल, त्याचे डोळा भरून दर्शन न झाल्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाला दोष देतात. ते सगळे वैभव आपल्याला प्रदक्षिणा करतानाही बघता येते. मुख्य मंडपात फ़क्त बालाजीच." 


मी त्याचा सल्ला ध्यानात ठेवला आणि अगदी तसेच केले. बालाजीची मूर्ती मला चांगली दोन तीन मिनीटे निरखून बघता आली. त्या मूर्तीतूनही अशीच दिव्य प्रभा बाहेर पडतानाचा हा जन्म धन्य करणारा अनुभव माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिकाला आला. त्यानंतर मी दोन तीन वर्षातच पंढरपूरजवळ सांगोला येथे नोकरीनिमित्त गेलो. तिथे गेल्यावर काय ? पंढरपूर फ़क्त पंचवीस किलोमीटरवर. अगदी अर्ध्या तासात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणे येणे व्हायचे. पांडुरंगाचे मनसोक्त दर्शन दरवेळी व्हायचे. दरवेळी माझ्या लक्षात आले की त्या मूर्तीतून बाहेर पडणारी प्रभा आपण बघू शकतोय. त्यासाठी स्वतःला, स्वतःचे इतर व्याप ताप विसरण्याची विशेष कवायत मला करावी लागत नाही. माझा हा मित्र एव्हढा दयाळू आहे की त्याच्यासमोर गेल्यावर तो आपसूकच माझ्या मनात इतर कुठलीही भावना राहू देतच नाही. फ़क्त तो आणि मी हेच दोघे या जगात उरलोत. आम्ही दोघे आणि त्याचा माझा शब्देवीण संवादू.


हा अनुभव तर आला. आता तो आणि मी ह्या दोन व्यकी नाहीतच, तो आणि मी एकच आहोत. "क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकली." हा ज्ञानोबामाऊलींचा अद्वैतानंदाचा अनुभव आलेला नाही. तो अनुभव यावा असे विशेष मागणेही नाही. तसा अट्टाहासही नाही कारण त्याच्या माझ्या नात्यातले आजवरचे सगळे आनंदी अनुभव, त्यानेच, मी न मागता सुद्धा दिलेले आहेत. मग हा अनुभव सुद्धा तोच देईल. योग्य वेळी. या जन्मात, पुढच्या जन्मात, कदाचित आजही. तो जगन्नियंता आहे. त्यालाच हे सगळे ठाऊक आहे. भक्ताने कसलाही अट्टाहास न धरता फ़क्त त्याचे सान्निध्य अनुभवत रहावे याविणा दुसरा आनंद कुठलाच नाही हे आता मला कळलेले आहे.


॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ॥


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर (आषाढी एकादशी, शोभन नाम संवत्सर, शके १९४५ ) 

No comments:

Post a Comment