Sunday, September 26, 2021

रेल्वेफॅनिंग आणि खाद्यभ्रमंती - १

सगळे खवय्ये रेलफॅन्स नसलेत तरी सगळे railfans खवय्ये असतातच. रेल्वेतल्या खवय्येगिरीच्या प्रत्येकाच्या एक एक कथा असतातच. पु ल म्हणतात त्याप्रमाणे मथुरेच्या आसपास "ब्डीय" म्हणजे रबडी विकणारा आहे हे ज्याला कळले त्याला रेल्वे भरपूरच घडली आहे असे समजावे. तसेच "ट्यँय सांड्या" म्हणजे Times Of India, "सालादू" म्हणजे मसाला दूध आणि "चॅग्रँम" म्हणजे चहा गरम या हाका समजायला रेल्वेत किंवा रेल्वेच्या फलाटावर भरपूर वेळ व्यतित व्हायला हवा. 

बालपणी रेल्वेने दूरवर जाण्याचे योग तसे विरळाच आलेत. धाकटी मावशी तत्कालीन मध्यप्रदेशात दुर्गला रहायची. काही सणवार उत्सवप्रसंगांनी ती मंडळी इकडे आलीत की आमची ती मावसभावंडे दुर्ग ते नागपूर या ६ - ७ तासांच्या प्रवासात (तेव्हा ६ - ७ लागायचेत हो. आजकाल सुपरफास्ट रेल्वेने चार ते साडेचार तासात जाता येते) त्यांनी केलेल्या खादाडीची वर्णने करायची आणि आमच्या तोंडाला पाणी सुटायचे. ते खात असलेला "कटलेट" हा पदार्थ केवळ रेल्वेच्या पँट्री कारमध्येच मिळतो अशी आमची बरीच वर्षे प्रामाणिक समजूत होती. कारण हाॅटेलिंगची घरून फारशी परवानगी नव्हती आणि घरची सगळी मंडळी मिळून आम्ही हाॅटेल्समध्ये गेल्यानंतर खाण्याचे पदार्थ मर्यादित. दोसा नाहीतर वडासांबार. क्वचित वेळा आमचे दादा (वडील) राईस प्लेट मागवायचेत. पण कटलेट कधीच नाहीत. कटलेट हा शाकाहारी पदार्थ आहे की मांसाहारी पदार्थ आहे याविषयी आमच्या जन्मदात्यांच्या मनातच गोंधळ असावा म्हणून हा पदार्थ हाॅटेल्समध्ये कधीच आमच्या टेबलावर आला नाही. 

त्याकाळी सेंट्रल ऍव्हेन्युवरच्या चंद्रलोक बिल्डींगसमोरच्या इमारतीत शिवराज नावाचे हाॅटेल होते. आमच्या दादांना तिथली राईसप्लेट फार आवडायची. राईसप्लेट मागवली की "दादा, आज आपण नुसता भातच खायचा का हो ?" असा भाबडा प्रश्न आम्ही दादांना किंवा आईला विचारायचो. दादा नुसते हसायचेत. पण राईसप्लेट पुढ्यात आली की आमचे प्रश्न विरून जात. दादांच्या हसण्याचा गूढार्थ कळत असे. पण रेल्वे प्रवासाचे फारसे योग न आल्याने रेल्वेत खाण्याचेही फारसे योग आले नाहीत. १९८९ मध्ये कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यावर दरवेळी तो २५ तासांचा प्रवास करताना असे भरपूर योग यायला हवे होते. पण हाय रे, दुर्दैवा ! आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला पँट्री कारच नव्हती. (अजूनही नाही.) नागपूर ते कराड जाताना आई अत्यंत मायेने दोन तीन जेवणांचा डबा देत असे. त्या मायेसमोर स्टेशनवरच्या पंचपक्वान्नांची किंमत अत्यंत तुच्छ होत असे. फारतर दुसर्‍या दिवशी सकाळी नीरा स्टेशनवर मिळणारी फळफळावळ आम्ही आवर्जून खात असू. 

महाराष्ट्र एक्सप्रेसही नीरा स्टेशनात तब्येतीने थांबत असे. नीरा स्टेशननंतर सातार्‍याकडे जाताना लोणंद, वाठार, आदर्की असा घाट लागत असे. जुन्या काळी कोळसा एंजिनांमध्ये पाणी भरण्यासाठी गाड्या तिथे भरपूर वेळ थांबत असत. एंजिनांमध्ये पाणी भरण्याची ती मोठी सोंड निरा स्टेशनात बरीच वर्षे होती. कोळसा एंजिने जाऊन डिझेल एंजिने आलीत तरी वेळापत्रकात फारसा बदल झालेला नव्हता. कराड ते नागपूर प्रवासात 'घरी परतायचय' या आनंदात भुकेची फारशी जाणीव नसायचीच. तरीही पुण्याला गाडी ४० मिनिटे थांबत असल्याने आमच्यातली काही धाडसी मंडळी पुणे स्टेशनवर गाडी आल्याआल्या पटकन बाहेर पडून स्टेशनबाहेरच्या हाॅटेल्समध्ये पोटपूजा आठोपून अगदी गाडी हलण्याच्या वेळेला परतायचीत. आमच्यात तेव्हढी हिंमत नसल्याने आम्ही स्टेशनवरच्या हातगाड्यांवर मिळणारे गारेढोण वडासांबार किंवा भल्या सकाळी केलेल्या आणि रात्री १० पर्यंत कुल्फीसारख्या थंड आणि कडक असलेल्या इडल्या पोटात ढकलून आमची केवळ क्षुधा शमवीत असू. 

बाकी पुणे स्टेशन आणि वर्धा स्टेशनवर चहाचा काँट्रॅक्ट हा एका कुणालाच मिळत असावा अशी माझी खात्री आहे. दोन्हीकडे तीच सपक, पाणीदार फुळकवणी चव आणि तोच कोमट चहा. घरी कधी चहा बिघडला तर वेड्यावाकड्या झालेल्या माझ्या चेहेर्‍याकडे पाहून सौभाग्यवती विचारते, "खरंच का रे पुणे स्टेशन क्वालिटीचा झालाय का आजचा चहा ?" निम्नतम दर्जाचा benchmark म्हणजे वर्धा आणि पुणे स्टेशनचा चहा. धामणगाव स्टेशनवर छान चहा मिळायचा. तिथल्या माझ्या मुक्कामात अनेक रात्री आमच्या नाट्यचर्चा धामणगावच्या फलाटावर या चहाच्या साथीनेच रंगलेल्या आहेत. या चहाची कीर्ती ऐकून बर्‍याच सरळ जाणार्‍या (थ्रू) मालगाड्याही, सिग्नल हिरवा असतानाही, दोन मिनिटे धामणगावच्या अप थ्रू किंवा डाऊन थ्रू लाइनवर थांबायच्यात. असिस्टंट लोको पायलट धावपळीत खाली उतरून आपल्याजवळील थर्मास भरून चहा घेऊन घाईघाईतच एंजिनात परतायचे आणि गाडी पुन्हा हलायची. 

विदर्भ एक्सप्रेसने नागपूरकडे येताना रात्री कल्याण सोडल्यानंतर किंवा सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे येताना संध्याकाळी इगतपुरी सोडल्यावर "व्हेज बिर्याणी" नावाचा जो प्रकार गाडीत विक्रीसाठी येतो तो म्हणजे, एकदोन उकडलेले बटाटे, दोनतीन अर्धवट उकडलेली फुलकोबी (फ्लाॅवर) आणि अजिबात न उकडलेल्या फरसबीचे बारीक तुकडे भातासोबत असलेला पदार्थ. मिठा - तिखटाची चव ज्याला लागली त्याने आपल्या स्टेशनवर ताबडतोब लाॅटरी विकत घ्यावी ,नक्की लागेल. 

१२ वर्षांच्या मुंबईच्या वास्तव्यात मुंबई - नागपूर हा प्रवास अक्षरशः शेकडो वेळा केलाय. पण एका जिन्नसचा शोध बर्‍याच उशीरा लागल्याची खंत मला कायम राहील. विदर्भने मुंबई सोडल्यानंतर एस - २ कोचमध्ये एका मोठ्या टोपलीत पारशी डेअरीची कुल्फी घेऊन एक विक्रेता चढतो. गोल गरगरीत आणि छोट्या ताटलीच्या व्यासाच्या आकाराच्या आणि एक इंच जाडीच्या या कुल्फ्या म्हणजे अप्रतिम चवीचा एक नमुना असतात. तो विक्रेता सोबत गोल कागदी प्लेटस आणि आईसक्रीम स्टीक्स घेऊन चढतो. (अर्ध्या तासानंतरही ती कुल्फी इतकी कडक असते की तुकडा पाडण्यासाठी ती तोडताना बहुतांशी त्या आईसक्रीम स्टीकचाच तुकडा पडतो.) एस - २, एस - १ हे डबे करून तो बी - ५, बी - ४, बी - ३ असा वातानुकुलीत डब्यांकडे आपली वाटचाल करतो. ज्या खवय्यांना ही गोष्ट माहिती आहे ते सगळे त्या विक्रेत्याला एस - २ किंवा एस - १ मध्येच जाऊन गाठतात आणि कल्याणनंतर टिटवाळा येईपर्यंतच त्याची टोपली रिकामी होते. बर्‍याच जणांची निराशाही होते. थोड्या लागून आलेल्या दुधाची ही कमी गोड आणि घट्ट कुल्फी अशी हातोहात संपते. पहिल्या वेळेला ते दूध असे लागून आलेले असणे मला अपघात वाटला होता पण नंतर जाणवले की तोच याचा USP आहे. अतिशय अप्रतिम चव. विदर्भ एक्सप्रेसने केलेल्या शेवटल्या १० - १५ प्रवासात आम्हाला हा शोध लागल्यानंतर आम्ही आमचा डबा सोडून ४ - ५ डबे दूर आतून चालत चालत जात ती कुल्फी एखाद्या ट्राॅफीसारखी हस्तगत करीत असू. 

कलकत्त्याकडे जाणार्‍या हावडा मेल आणि गीतांजलीच्या पँट्रीत मिळणार्‍या कटलेटससारखी कटलेटस संपूर्ण भारतात कुठेच मिळत नाहीत. बंगाल्यांना दूध फाडून पदार्थ बनविण्यात आणि कटलेटस बनविण्यात विशेष नैपुण्य आणि रूची असली पाहिजे. मुंबई ते मडगाव जाणार्‍या मांडवी एक्सप्रेसला सगळे रेलफॅन्स "फुडी एक्सप्रेस" म्हणून ओळखतात ते केवळ तिच्या स्वच्छ, सुंदर सर्वोत्कृष्ट पँट्रीमुळे, मेन्युतल्या वैविध्यामुळे आणि अप्रतिम चवीमुळे. राजधानी गाड्यांमध्येही इतका सर्वसमावेशक मेन्यु नसतो. 








बाकी आम्ही एकदा चेन्नई ते नागपूर या प्रवासात राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्गाच्या आदरातिथ्याचा अनुभव घेतलाय. चेन्नईवरून निघाल्यानिघाल्या चाॅकलेटस, गाडी गुमीडपुंडीपर्यंत येते न येते तोच थर्मासभरून चहा आणि दुसरा थर्मासभरून दूध व सोबत बाऊलभरून काॅर्नफ्लेक्स, सुलुरूपेटा येईपर्यंत उपमा, ब्रेड, कटलेटस असा पोटभर नाश्ता आणि सोबत पुन्हा चहा. ओंगोल नेल्लोरपर्यंत थ्री कोर्स लंच आणि विजयवाड्याला जेवण संपवून वामकुक्षीची वेळ साधायला जातो न जातो तोच केबिनच्या दारावर टकटक आणि आमच्यासाठी आईसक्रीम आणल्याची वर्दी घेऊन रेल्वेतला सेवक उभा. वारंगलपर्यंत वामकुक्षी, लाॅबीमध्ये फेर्‍या वगैरे मार्गाने खाल्लेले अन्न जिरवण्याच्या प्रयत्नात असताना वारंगलनंतर "हाय टी" म्हणून चहा, समोसा, शेव, बिस्कीटे तयार. संध्याकाळी बल्लारशावरून निघाल्यानंतर वरोर्‍याला पुन्हा सकाळइतकेच जेवण. "बरे झाले, आपले तिकीट नागपूरपर्यंतच आहे. भोपाळ किंवा झाशीपर्यंत असते तर एवढे खाल्यानंतर आपण पार आडवेच झालो असतो आणि स्ट्रेचरवरूनच आपल्याला बाहेर काढावे लागले असते" या भावनेने व आमची तत्पर सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना मनापासून धन्यवाद देत आम्ही नागपूरच्या फलाटावर पाय ठेवला होता. रेल्वे आणि खानपान सेवेच्या अशा अनंत आठवणी आहेत. विस्तारभयास्तव हा भाग इथेच थांबवतो. 






पुढचा भाग लगेचच आपल्या सेवेत सादर करेन. (क्रमशः)

 - सर्व रेल्वेफॅन्ससारखाच खादाड रेल्वेफॅन, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment