Tuesday, June 21, 2022

कोरडेपणाच्या झळा

एखाद्या वर्षी पर्ज्यन्यवृष्टी झालीच नाही तरी मागल्या अनेक वर्षात झालेल्या वृष्टींच्या संचितातून निभावून जाऊ शकत. एखाद्या वर्षीच्या अनावृष्टीत लगेच शंभर वर्षांच्या अनावृष्टीचा अनुभव आल्यासारखे माणसे वागीत नाहीत. मार्ग काढीत जातात, जगणे शोधीत जातात.

पण नातेसंबंधात, स्नेहसंबंधांमध्ये मात्र गेल्या १०-१२ वर्षात याच्या अगदी विपरीत वागणूक आपल्या सगळ्यांनाच अनुभवायला येतेय. मतलबापुरत्या नातेसंबंधाच्या कोरडेपणाची व्याप्ती इतकी वाढत चाललीय की एकेकाळी ज्या दोन व्यक्ती एकमेकांच्या सुखदुःखात मनःपूर्वक सहभागी होत्या त्यांनाही तो ओलावा, ते मार्दव आठवणीतून पूर्णपणे पुसल्यासारखे झाले आहे.
एकेकाळी माणसे जगण्यासाठी एकमेकांवर बर्यापैकी अवलंबून होती. समाजातल्या, नातेसंबंधातल्या लहानातल्या लहान व्यक्तीचीही प्रत्येकाच्या जीवनात निश्चित अशी भूमिका असे. त्यामुळे तो ओलावा होता. गेल्या २५ वर्षातल्या तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे माणसांचे एकमेकांवरचे अवलंबन कमी कमी होत होत आताशा ओलावा तितकासा राहिलेला नाही किंवा क्वचित संपूर्ण कोरडेपणाच उरलाय.
दुष्काळाची आणि कोरडेपणाची भीती नाही पण एकेकाळच्या वृष्टीच्या आठवणींवर विश्वास ठेऊन पुढेही वृष्टी होईल हा भरोसा गमावणे आणि कधीच ओल नव्हती इतकी तीव्र जाणीव होणारा नातेसंबंधांमधला कोरडेपणा भयावह आहे.
या सगळ्या गदारोळात कोरडेपणाच्या झळा जाणवतात त्या फक्त महत्प्रत्सायाने ही ओल घट्ट धरून ठेवणार्या जमिनीला आणि व्यक्तीला.
वास्तविक समर्थांच्या "लोकाचारे वर्तावे" या उक्तीला धरून ती व्यक्ती वागली तर सार्वत्रिक कोरडेपणाचा स्वीकार करून अशी संवेदनशील व्यक्तीही जगाच्या 'बँडवॅगन' मध्ये सामील होऊ शकते आणि वरवरचे, कृत्रिम, बेगडी नातेसंबंध निभावून नेऊ शकते. पण यात ज्या संवेदनशीलतेचा, ओलाव्याचा बळी जातो ती स्थिती मनुष्यमात्रांच्या भविष्यासाठी कायमस्वरूपी भयावह आहे.
किंबहुना अशा एखाद्या संवेदनशील व्यक्तीने सगळ्यांसारखेचच कोरडे होऊन वरवरचे, कृत्रिम, बेगडी नातेसंबंध जपत रहावेत हीच बाकी सगळ्या शेपूटतुटक्या कोल्ह्यांची अपेक्षा असते आणि तसे प्रयत्नही असतात.
बरोबर ना ?
- "As one writes more and more personal, it becomes more and more universal" या आंग्ल वचनांवर पुरेपूर विश्वास ठेवणारा, नातेसंबंधांमध्ये ओलावा जपून ठेवण्याची पराकाष्ठा करताना कोरडेपणाच्या झळा सहन करणारा, शेपूटशाबूत कोल्हा आणि मनमोकळा माणूस, रामशास्त्री किन्हईकर.

No comments:

Post a Comment