समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकातला हा श्लोक.
"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तो ही पुढे जात आहे
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते
म्हणोनी जनी मागुता जन्म घेते."
या जगातल्या मानवी जीवनातल्या अनित्यतेचे चिंतन आणि हे जीवन अनित्य आहे हे जाणून घेऊन या जगात कसे वागायचे हे चिंतन या श्लोकातून आलेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परवा महाविद्यालयातून परतताना गाडीत हे श्लोक लागले होते. त्यातल्या "पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते" या ओळींनी माझे मन वेधून घेतले आणि चिंतन सुरू झाले.
हे जग कर्मभूमी आहे. इथे कुठलेही कर्म न करता, अकर्मण्य अवस्थेत कुणीही राहू शकत नाही. आणि सगळ्या सहेतूक, अहेतूक कर्मांचे चांगलेवाईट फ़ळ आपल्याला मिळतच असते. संतकवी दासगणू महाराजांनी श्रीगजाननविजय ग्रंथात "मागील जन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे, ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे" हा संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा उपदेश लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे कर्मे आणि त्यांची फ़ळे यातून मनुष्याची सुटका नाही. आणि कर्माची फ़ळे भोगीत राहण्यासाठी वारंवार जन्म घेत राहणे यातूनही सुटका नाही. जगदगुरू शंकराचार्यांनी "पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम" या ओळींद्वारे या वारंवार जन्म घेणे आणि मृत्यू पावणे या फ़े-यातली भयानकताच विषद केलेली आहे. कारण पुढला जन्म कुठला मिळेल ? हे आपल्या हातात नाही. त्या जन्मात आपल्या देहाला भगवंताचे स्मरण, अनुसंधान राहीलच याची खात्री नाही. मग आपली साधना पूर्णत्वाला जाईपर्यंत, आपण कायमचे भगवंत चरणी सामावून जाईपर्यंत या मृत्यूलोकात जन्म मरणाचे किती फ़ेरे घ्यावे लागतील याच्यावर आपले कसलेही नियंत्रण नसणे ही अत्यंत भयावह आणि भगवत्भक्तांच्या हृदयाचा थरकाप उडवणारी अवस्था आहे.
मग यावर उपाय श्रीमदभगवतगीतेत, श्रीमदभागवतात प्रत्यक्ष भगवंताने सांगून ठेवलेला आहे. अनेक जन्मांना कारणीभूत होणारी कर्मे करणे जर आपण टाळू शकत नसू तर किमान ती कर्मे भगवंताच्या स्मरणात करू, त्याला ती कर्मफ़ळे अर्पण करून आपण श्रीमदभागवतात सांगितलेल्या "नैष्कर्म्य" अवस्थेत जाऊ. त्यासाठीचे पथ्यच श्रीसमर्थांनी या मनाच्या श्लोकात सांगितले आहे. जर आपल्याला अशा "नैष्कर्म्य" अवस्थेत जायचे असेल तर लोभ आणि क्षोभ या दोन्हीहीपासून आपल्याला दूरच रहावे लागेल.
परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा एक दृष्टांत आहे. ते म्हणायचे, स्टेशनवर गाडी पकडायला जाताना एखाद्या गृहस्थाशी भांडण झाले म्हणून गाडी चुकली काय ? किंवा स्टेशनवर जाताना एखादा मित्र भेटला आणि त्याच्यासोबत सुखाच्या चर्चेत गाडी चुकली काय ? दोन्हींचा परिणाम एकच झाला; गाडी चुकली.
तात्पर्य आपण एकवेळ क्षोभावर मात करू शकू पण इथल्या वस्तूंच्या ममतेवर, लोभावर मात करणे कठीण आहे. मोठमोठ्या योगी पुरूषांना अखेरच्या क्षणी झालेल्या लोभामुळे त्यांच्या साधनेतले तेवढे न्यून पुरे करायला पुन्हा जन्म घ्यावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. श्रीमदभागवतात वर्णन केलेल्या जडभरताची कथा अशीच. म्हणून श्रीसमर्थ आपल्याला आधीच जागृत करत आहेत. मृत्यूच्या पथावर चालणे या जगात कुणीही चुकवू शकलेला नाही. आज एक तर उद्या आपण हे नक्की आहे. किंबहुना या जगात तेच आणि तेव्हढेच नक्की आहे. म्हणून या जगात आपल्या मनात कुणाविषयीही अपुरा क्षोभ तर नसावाच पण कुणाहीविषयी असा पूर्ण न होणारा लोभसुद्धा नसावा. "हे होऊच नये" असे म्हणणे योग्य नाही तसेच "हे झालेच पाहिजे" असेही म्हणणे योग्य नाही. जे होतेय ते त्या सृष्टीनियंत्याच्या मनाप्रमाणे होतेय हे समजावे. आपण फ़क्त साक्षीभावाने त्याकडे बघावे. त्याविषयी क्षोभ किंवा लोभ ठेऊन त्यात अडकून राहू नये. तरच ते कर्म आपल्याला चिकटणार नाही आणि कर्मांचा हा बॅलन्स बरोबर झाला की "पुनरपि संसारा येणे नाही" ही सकल जीवमात्रांची अत्त्युच्च अवस्था आपण गाठू शकू.
- प्रभातचिंतन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर भाद्रपद शुद्ध अष्टमी, ३१ / ८ / २०२५
No comments:
Post a Comment