Wednesday, January 12, 2011

घाट

वेळ: संध्याकाळी ६.३०: स्थळ पुणे. लक्ष्मी रोड वरून रिक्षा भरधाव धावतेय. आजुबाजुला रंगीबेरंगी घोळके.

वेळ: संध्याकाळी ६.४५: स्वारगेट बसस्थानकावरून घाईगर्दीत पकडलेली पुणे-मिरज ही प्रतिष्ठीत सेवेची बस. कशीबशी मिळवलेली जागा.

वेळ: संध्याकाळी ७.१५: बसने कात्रज घाट चढायला सुरुवात केलीय."माझा कात्रज केला" ही म्हण अचानक आठवली."कात्रज करणे" म्हणजे ’मामा बनविणे’. या घाटालाच ही म्हण का प्राप्त झाली ? किंबहुना ह्याच घाटाचं नाव या म्हणीत कसे ? एक मूलभूत प्रश्न.(हो ना. कारण "माझा खंडाळा केला" किंवा "माझा कसारा केला" असं कुणीही म्हणताना दिसत नाही.). कात्रज उतरतानाच ’घाट’ या विषयावर चिंतन सुरू.

वेळ: रात्री ८.३०: बसने खंबाटकी घाट चढायला सुरुवात केलीय. त्यावेळी जाणवलेलं एक साधं पण सोपं सत्य. ’सत्य ही कायम साधीच असतात’ असं म्हणतात त्याची प्रचीती येतेय. घाट चढताना गाडी कायम पर्वतांच्या बाजुला असते तर उतरताना दरीच्या बाजुला.

जीवनाचंही तसंच आहे. रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यातून (नशिबाने पायघड्यांवरूनही) चालताना पुढे घाट पार करायचे आहेत याची जाणीव ठेवलीच पाहिजे. घाटच तर जीवनात आणि प्रवासात खरी मजा आणतात.

इतक्यात समोरून एक कर्नाटक राज्याची एस.टी. भरधाव उतरतेय. आमची बस मात्र एन्जिनचा भला मोठा आवाज करत चढतेच आहे. आमच्या ड्रायव्हरला उतरणार्या गाड्यांची असूया वाटत असेल का ?

आता थोड्या वेळाने आमचीही गाडी संपूर्ण घाट चढणार मग उतरायला सुरूवात. त्यावेळी विरूद्ध बाजुने घाट चढणा-या ड्रायव्हरांना आमची असूया वाटेल का?

वाटून उपयोग नाही. घाटाचा शेवट हे जर आपल्या जीवनाच अंतिम उद्दिष्ट मानलं तर अशी असूया वाटून उपयोग नाही. घाट चढताना सोबतीला वडीलधारा डोंगर असतो त्याप्रमाणे जीवनाचा हा घाट चढताना वडीलधार्यांचे आशीर्वाद डोंगरासारखे असतात.भलीमोठी चूक टाळली तर दरीत कोसळण्याचा अजिबात संभव नाही. अशावेळी आपल्या जीवनाची चढण सफ़लपणे चढून त्याच मस्तीत उताराकडे धावणा-या माणसांकडे असूयेने नव्हे तर आदर्श म्हणून बघायचं असतं. आपलीही गाडी प्रयत्नांचं इंधन जाळून, बुद्धीमत्तेच्या विविध गिअर्स ना वापरून, सद्सदविवेकअबुध्दीचे हॊर्न्स स्वतःच्या आणि इतरांच्याही फ़ायद्यासाठी वापरून घाट्माथ्यावर जाईल असा दुर्दम्य आशावाद बाळगायचा असतो.

घाट्माथा म्हणजे जीवनसाफल्य नव्हे . (हे न कळल्यामुळे कित्येक जण तिथेच थांबतात किंवा एकदम पायथ्याकडे झेप घेऊन गड्गडतात.) तिथून तर खरी परीक्षा सुरू होते. ऊतरताना वेग असतो, घाट चढल्याचा अनुभव असतो, मस्ती असते पण डोंगरांची साथ नसते. थोडीसुद्धा चूक गडगडायला कारणीभूत ठरू शकते. बुद्धीमत्तेचा गिअर जर न्युट्रल ला आणला गेला तर अमर्याद वेग वाढून फार नुकसान होऊ शकते. घाट (जीवनाचा किंवा रस्त्यावरचा) चढण्यापेक्षा उतरण्यातच जास्तं कौशल्य असतं. नाही का ?

(हा लेख यापूर्वी दै. तरुण भारत च्या नागपूर आवृत्तीत दि. ३१/०७/१९९३ रोजी प्रकाशित झाला आहे.)

2 comments:

  1. "घाट चढताना गाडी कायम पर्वतांच्या बाजुला असते तर उतरताना दरीच्या बाजुला."

    हे वाक्य वाचल्याक्षणी नाशिकचा घाट आठवला... कसार्‍याचा म्हणजे. दरी डाव्या बाजूलाच आहे. म्हणजे चढताना बाजूला दरी असते...

    ReplyDelete
  2. हे सगळ्याच घाटांबाबत खरं नसेल. शक्य आहे. प्रतिकात्मक लिहीलय.

    ReplyDelete