कराडला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ज्या काही अविस्मरणीय वल्ली भेटल्या त्यातली एक वल्ली म्हणजे चित्तरंजन सुरेश भट. आम्ही पहिल्या वर्षाला असताना चित्तरंजन दुस-या वर्षाला होता. अत्यंत कुशाग्र बुद्धी पण तितकाच हळवा आणि कविमनाचा हा "सिनियर" आमचा मित्र कधी झाला ते कळलंच नाही. सुरेश भटांचा वारसा तो समर्थपणे चालवायचा. "सुरेश भट" ही काय चीज असेल! याचा अनुभव आम्ही चित्तरंजन कडे बघूनच करत असायचोत. तो सुद्धा तेव्हढाच प्रतिभावान आणि कलंदर कलावंत होता.
मला आठवतं १९८९ मध्ये आमची प्रथम सत्र परीक्षा सुरू होती आणि त्याच वेळी भारतात सार्वत्रिक निवडणुका होत होत्या. त्या निवडणुकांच्या निकालाबद्द्ल सर्वांनाच मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. (बोफ़ोर्स प्रकरणात विश्वनाथ प्रताप सिंघ बाहेर पडल्यानंतर झालेल्या या निवडणुका. धक्कादायक निकाल येतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती आणि ती फ़लद्रुप झालीदेखील. मला आठवतंय विश्वनाथ प्रताप सिंघांचा शपथविधी झाला म्हणून पराग लपालीकरने ए ब्लॊकमधल्या लोकमान्य मेस मध्ये थाळीनाद करून पेढेही वाटले होते.)
त्याकाळी दूरदर्शनवरून दर तासा दोन तासांना निवडणूकविषयक विशेष वार्तापत्र सादर व्हायचे. परीक्षा सुरू होती आणि त्यातच निवडणूक निकालांचीही उत्सुकता अशा द्विधा मनस्थितीत आम्ही सारे जण होतो. (तेव्हा आम्ही सारे सी. ब्लॊक मध्ये रहायचोत)
असाच एकदा अभ्यास आटोपून (की गुंडाळून) आम्ही निवडणूक वार्तापत्र पहायला सी. ब्लॊकच्या टी. व्ही. रूममध्ये बसलेलो होतो मागे जोरदार आवाज येउ लागलेत म्हणून मागे वळून पाहिलं तर चित्तरंजनने त्याच्या परीने अभ्यास आणि निवडणुकींची उत्सुकता यावर मार्ग शोधून काढला होता. त्याने आपल्या खोलीतला अभ्यासाचा भलामोठा आणि अवजड टेबलच उचलून टी. व्ही. च्या रूममध्ये आणला होता आणि तसाच टी. व्ही. समोर अभ्यास त्याने त्या सत्रात केला. (एव्हढं करूनही त्याला क्लास कसा मिळाला? हे आम्हाला आजवर पडलेलं कोडंच आहे.)
महाविद्यालयीन जीवनात मी पण थोड्याफ़ार कविता करायचो त्यामुळे चित्तरंजनची आणि माझी मैत्री झाली. एकदा मी तिस-या वर्षात असताना माझ्या डी. ब्लॊकच्या खोलीत तो आला तेव्हा मी असाच काहीतरी शब्द जुळवत बसलो होतो. अनामिक हुरहूर, अज्ञात प्रिया, कलंदर कवी अशी काहीतरी कल्पना होती. चित्तरंजनला ती कळली आणि त्याने माझ्या पुढ्यातला कागद ओढून त्याच्या खूप सुंदर हस्ताक्षरांत एकदम लिहायला सुरूवात केली.
" मी एक प्रवासी पक्षी, क्षितीजावर भरकटलेला,
तुजला कैसे शोधावे, आसमंत धुरकटलेला,
मी निघून गेल्यावरती, म्हणतील लोक सारे,
होता तो फ़कीर वेडा, आपल्यातच गुरफ़टलेला"
आणि म्हणाला आता ही कविता पूर्ण कर आणि तुझ्या नावावर "मुक्तांगण"मध्ये (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) देउन टाक.
मी ब-याच लटपटींनंतर ती कविता पूर्ण केली.
"पूर्वक्षितीजी लाल उषेचा रंग हा कसा रसरसलेला,
मोरपंखी लेवून पालखी आसमंत हा मुसमुसलेला,
तो झडून गेल्यावरती म्हणतील लोक सारे,
होता तो फ़कीर वेडा आपल्यातच गुरफ़टलेला"
पण माझं कडवं हे त्या कवितेला लावलेल्या ठिगळासारखंच होतं ही माझी तेव्हापासूनची भावना आजतागायत आहे. त्यानंतर मी
ब-याचदा या कवितेचं वाचन खाजगी मैफ़िलीत आणि मित्रमंडळींमध्ये केलं पण दरवेळेची दाद चित्तरंजन साठीच होती हे माझ्या पुरतं ध्यानात होतं.
माझा हा प्रवासविषयक लेखनाचा ब्लॊग. याला समर्पक मथळा म्हणूनही मला हीच कविता सुचली आणि म्हणून " मी एक प्रवासी पक्षी"
(होळीवर लिहिलेल्या आणखी एका कवितेत चित्तरंजनने मला शब्द नीट वृत्तामध्ये आणि गझलेच्या वृत्तीमध्ये बांधायला मदत केलेली आहे. त्याविषयी नंतर कधीतरी.)
Ram tu swatachi kavita banav, tyat kathin ase kahich nahi. Tu sudhha dad milvashil
ReplyDeleteश्री. चित्तरंजन सुरेश भट यांच्याविषयी आपण लिहिलेला ब्लॉग, विशेषतः त्यातील ती कविता मला अत्यंत आवडली. आपण आणखी अवश्य लिहावे अशी अगत्याने विनंती करतो.
ReplyDeleteमंगेश नाबर.
धन्यवाद किन्हीकर ! तू खरच जुन्या आठवणीला उजाला दिलास. जेव्हा श्री. चित्तरंजन भट त्याच्या काही गझलांचा शब्दात अर्थ सांगायचा, तेव्हा त्याच्या प्रतिभेची व माझ्यातील मागासलेल्या पणाची मला जाणीव व्हायची. मला त्याच्या नवीन गझली वाचायला मिळतील काय ? तसेच तुझ्या मिमिक्री, विशेषतः हातावर तंबाखू घेवून सांगितलेली अजूनही आठवते, किवा लिखाण मिळेल काय ?
ReplyDeleteनरूभाऊ, अरे किती दिवसांनी भेटतोय आपण! खरंच खूप आनंद झाला तुला इथे भेटून.
ReplyDeleteएक मात्र खरंय. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अनेकरंगी व्यक्तीमत्वं होती आणि त्यामुळेच चार वर्ष अक्षरशः सोनेरी पानं झालीत आयुष्याची.
तुझा मेल आय. डी. कळव. संपर्कात राहूयात.
my mail id paninisabyosachi@yahoo.com.