आश्विन पोर्णिमेला विदर्भात आसनीचा सण साजरा करतात. या दिवशी संध्याकाळी प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ अपत्याला वाढदिवसाप्रमाणे ओवाळतात. त्या अपत्याला नवीन कपडे भेट म्हणून देतात.
साधारणतः ८० च्या दशकात या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरा-वाड्यांमध्ये भुलाबाइ चा खेळ रंगायचा. एका ठिकाणी शंकर-पार्वतीची (भुलोजी आणि भुलाबाई) च्या पार्थिव मूर्तीची स्थापना व्हायची. (सोवळे वगैरे नाही. गणपतीच्या पार्थिव मूर्तीची होते त्याप्रमाणे साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा पण नाही.) संध्याकाळी लहान मुले आणि आसपासच्या मुली एकत्र येउन भुलाबाईची गाणी म्हणत.
गाणी मजेदार असत. तत्कालीन किंवा थोड पूर्वकालीन स्त्री जीवनाचे प्रतिबिंब त्या गाण्यात पडलेले दिसायचे. महत्वाची गाणी थोडी आठवतात
" या या भुलाबाई, आमच्या आई, तुमच्या आई, तुमच्या अंगात लाल चोळी, लाल चोळीवर बसला मोर, बसला मोर. बसल्या मोरावर सांडले अत्तर, भुलोजी डॊक्टर घरी नाही, घरी नाही "
" यादवराया राणी रुसूनी बैसली कैसी, सासूरवाशि सून घरात येना कैसी "
" अडकीत जाउ खिडकीत जाउ, खिडकीत होता बत्ता, भुलोजीला मुलगा झाला, नाव ठेवा दत्ता "
" आला माझ्या माहेरचा वैद्य, डोक्याला टोपी जरीकाठी, अंगातला सदरा मखमली "
त्यानंतर प्रत्येक घरातून खिरापत यायची. ही खिरापतही रहस्य असायची आणि कुठल्या डब्यात काय हे ओळखण्याचा आणि त्यासाठी क्ल्यु म्हणून तो खाद्यपदार्थ असलेला डब्बा वाजवून त्या घरातील सदस्य इतर सगळ्यांना तो पदार्थ ओळखायला लावायचा. त्यासाठी दुपार पासूनच मोर्चे बांधणी सुरू व्हायची. आपल्या घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत कुणी पोहोचू नये मात्र आपण काही ना काही कारण काढून दुस-यांच्या स्वयंपाकघरातले गुपीत माहिती करून घ्यायची धडपड चालायची. खूप मजा यायची आणि त्यातच रात्री ती खिरापत आणि आटवलेले दूध पिउन कोजागिरीची सांगता व्हायची.
त्या वेळी दूध एव्हढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नसायचे. सकाळी उठून दूध केंद्रावर रांगा लावाव्या लागयच्या. कोजागिरीच्या आधी दोन तीन दिवस शासकीय दूध योजनेतून कोजागिरी निमित्त ज्यादा दूध उपलब्ध होणार असल्याची बातमी चक्क वर्तमानपत्रांमध्ये यायची आणि आपल्याला जर त्यादिवशी ज्यादा दूध लागणार असेल तर त्या केंद्र प्रमुखाला तशी दोन दिवस आधी सूचना आणि आदल्या दिवशी आठवण करून द्यावी लागायची.
पण एव्हढ करून जी मजा यायची ती आज मुबलक दूध उपलब्ध असताना, भरपूर साधनं असताना येत नाही हे खरंय. माणसं हरवलीयत. माणसा माणसातल्या नातेसंबंधांची, त्यातल्या अकृत्रिम बंधांची मजा हरवलीय अस प्रामाणिकपणे वाटतय.
We enjoyed in Kuhikar Wada !!!
ReplyDelete