माझ्यातल्या प्रवासी पक्षाच्या पंखांना बळ देण्यात माझ्या दिवंगत वडीलांचा खूप मोठा वाटा आहे. १९७८ मध्ये मी अगदी पहिल्या वर्गात असताना नागपूर ते चंद्रपूर बस प्रवासाचे वेळी त्यांनी एस. टी. बस वर लिहिल्या जाणा-या म.का.ना., म.का.दा., म.का.चि. इत्यादींचे अर्थ समजावून सांगितले होते. (त्याकाळी औरंगाबाद कार्यशाळेत तयार होणा-या बसेसवर म.का.चि. असे लिहीले असायचे. म.का.औ. लिहीण्याची सुरूवात ८० च्या दशकात झाली. चि.= चिकलठाणा) दरवेळी एखाद्या नवीन जागी जायचे असेल तर त्यांची हौस दांडगी असायची. त्याकाळच्या तुटपुंज्या परिस्थितीतही त्यांनी आमच्या इच्छा आकांक्षांच्या वारूंना लगाम घातले नाहीत की आमच्या गगनभरारीचे पंख छाटले नाहीत.
मला आठवतय १९७८ च्या नोव्हेंबरमध्ये मी पहिल्या वर्गात (वय वर्षे ६), माझा धाकटा भाऊ चि. महेश (वय वर्षे ३) आणि सगळ्यात धाकटा चि. श्रीकांत (वय ० वर्षे ८ महिने) आमच्या आई आणि दादांसोबत (माझे वडील) एका मोठ्या प्रवासाला निघालो. आमच्या सोबत ती. दादांच्या शाळेतले त्यांचे सहकारी श्री. देशपांडे (कुटुंबासहित) व श्री टोपले (एकटेच) होते. त्याकाळी उपलब्ध असलेल्या प्रवासाच्या आणि निवासाच्या एकंदर सोयी सुविधांचा विचार करता हा प्रवास, त्याचे नियोजन व त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने आमच्या दादांनी केली त्याचा खूप मोठा ठसा माझ्यावर उमटला आहे. त्या प्रवासाने माझा प्रवासी पक्षाचा पिंड घडला. मी लहान होतो तरीपण ती. दादांनी मला या नियोजनात आणि प्रवासातल्या खूप गोष्टींमध्ये सहभागी करून घेतले होते. त्याची पुसटशी काही चित्रे.
१. नागपूरवरून प्रस्थान तत्कालीन नागपूर-दादर एक्सप्रेस ने होते. (आताची १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस). एक्सप्रेस गाडीत बसायचा हा माझा तरी पहिलाच अनुभव. शयनयान वर्गात आमची तिकीटे होती. रात्री झोप न येता उत्सुकतेपोटी प्रत्येक स्टेशनावर जागे होउन बाहेर बघण्याच्या माझ्या प्रयत्नांना आरडाओरड्याची साथ होतीच. रात्री १० वाजून १० मिनीटांनी ही गाडी नागपूरवरून निघायची आणि डबे निळ्या रंगातले (खिडकीच्या वरील भागावर पिवळ्या पट्ट्याचे) होते एव्हढे आठवतेय. त्यावेळी शयनयान डब्ब्यांमध्ये बर्थसना कुशन्स नव्हते. साधी लाकडी बाकडीच बर्थ म्हणून असायची. (शयनयान डब्ब्यांना काथ्याची व रेक्ज़ीनची कुशन्स मधू दंडवते रेल्वेमंत्री असल्याच्या काळापासून सुरू झालेली होती. १९७९ पासून). वर्धा शेडचे कोळसा एंजिन गाडीला लागायचे.
सकाळी ६ च्या सुमारास भुसावळ स्टेशनवर कोळसा एंजिन बदलून इलेक्ट्रीक एंजिन लागण्याच्या सोहोळ्याला इतर अनेक लोकांप्रमाणे आम्हीही गेलो होतो. इलेक्ट्रीक एंजिन बघण्याचा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग.
२. मनमाडला आम्ही साधारण सकाळी १० च्या सुमाराला पोचलो. तिथून शिर्डीसाठी जायला गाडी बदलायची होती. मनमाड स्टेशनवर जवळपास दोन अडीच तासांचा मुक्काम झाला. काचीगुडा कडे जाणारी छोटी गाडी तिथल्याच फ़लाटांवर बघायला मिळाली. (काचीगुडा म्हणजेच हैद्राबाद हे उमगायला १९९२ उजाडावे लागले.) मनमाड स्टेशनला बाहेर जाउन शिर्डीकडे जाणा-या बसेस, खाजगी वाहने यांचाही शोध घेण्याचा प्रयत्न मधल्या काळात झाला असल्याचे स्मरते. पण ते आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे नसल्याने प्रस्ताव बारगळला.
३. मनमाड ते कोपरगाव हा प्रवास मनमाडवरून दौंडकडे जाणा-या पॆसेंजर गाडीने झाला. कोळसा एंजिनाची ठिणगी उडून डोळ्यात गेल्याने सुजलेला डोळा आठवतोय. खूप रडारड, सतत खिडकीपाशी बसतोय आणि नाही म्हणत असतानाही बाहेर बघतोय म्हणून आईच्या हातचे खाललेले धपाटे आठवतात. या धबडग्यात शिर्डीत कसे पोहोचलो हे स्मरत नाही.
४. शिर्डीत एकच भक्तनिवास होता. नवीन असल्याने खूप आवडला. दर्शनही निवांत आणि ब-याच वेळा घेतले. प्रसादालयात एव्हढ्या मोठ्या संख्येने एकाचवेळी प्रसाद घेण्याचेही खूप अप्रूप वाटले होते. बरोबर २०-२२ तासाने शिर्डी सोडले. पुन्हा कोपरगाववरून कालच्याच वेळेवर धावणारी मनमाड-दौंड (चू.भू.द्या.घ्या.) पॆसेंजर पकडण्यासाठी.
५. कालच्या प्रसंगातून धडा घेउन यावेळी गाडीच्या धावण्याच्या विरूद्ध दिशेकडे तोंड करून प्रवास सुरू झाला. ठिणग्यांपासून जरी थेट बचाव झाला तरी कोळश्याच्या धुळीपासून बचाव होत नसे. कपडे अगदी काळे कुळकुळीत व्हायचेत. खिडकीच्या गजांना धरून सतत असल्याने हात पण काळे होत. तो एक विशिष्ट प्रकारचा कोळशाचा आणि जंग लागलेल्या लोखंडाचा मिश्र वास आजही माझ्या नाकात भरून आहे.
रात्री ९, ९.३० च्या सुमाराला दौंडला गाडी आली. आम्ही अर्थातच गाढ झोपी गेलेलो होतो. आम्हाला कसेबसे उठवून आम्ही सगळे फ़लाटावर आलो. दौंडला फ़लाटावरच्या शाकाहारी भोजनालयात जेवण केल्याचे स्मरते. नंतर फ़लाटावरच पथारी टाकून पहाटे येणा-या सिद्धेश्वर एक्सप्रेसची वाट पहात झोपी गेल्याचे स्मरते.
६. पहाटे पहाटे कधीतरी सिद्धेश्वर एक्सप्रेस आली. गर्दी खूप. एंजिनला लागून असलेल्या डब्यात कशीबशी आम्ही सगळ्यांनी जागा मिळवली. सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणजे माझा पहिला डिझेल एंजिनच्या गाडीतूनचा प्रवास. आजही माझ्या कानात तो डिझेल एंजिनच्या धडधडण्याचा आवाज आहे. आमचा डबा अगदी एंजिनाला लागूनच होता.
७. सोलापूर शहरात उतरून एका धर्मशाळेत मुक्काम ठोकल्याचे आठवतेय. त्या काळी हॊटेल मध्ये उतरायचे वगैरे म्हणजे फ़ारच उच्च्भ्रू समजले जायचे. तिथे सगळ्यात धाकटा चि. श्रीकांत ती. दादा दाढी करीत असताना रांगत रांगत त्यांच्याजवळ गेला आणि दाढीचे ब्लेड त्याने उजव्या हाताच्या मुठीत धरून दाबले. मग काय ! रक्ताची धार आणि सोलापुरातल्या डॊक्टरांचे उंबरठे झिजवणे.
८. सोलापूर ते गाणगापूर रोड हा प्रवास बहुतेक मुंबई-मद्रास मेल ने केला. गाणगापूर रोड ते गाणगापूर हा प्रवास, टांग्यातून खूप धक्के खात. गंमत म्हणजे १९७८ नंतर आता थेट २०१३ मध्येच गाणगापूरला गेलो. मधल्या काळात भीमेतून, कृष्णेतून बरेच पाणी वाहून गेले असावे पण कर्नाटक सरकारचे रस्त्यांबद्दलचे धोरण बदललेले दिसले नाही. कुठल्याही पक्षाचे सरकार कर्नाटकात येवो पण गाणगापूरचे रस्ते सुधारले नाहीत. निव्वळ महाराष्ट्रद्वेश. दुसरे काय ?
९. गाणगापूर मात्र अगदी ठळक आठवते. उतरलो ती धर्मशाळा, तो संगम, ते मंदीर. ती माधुकरी मागण्याची प्रथा सगळ अगदी ठळक आठवतय. मला वाटत आम्ही तिथे दोन दिवस मुक्काम केला. तिस-या दिवशी तुळजापूरला जाण्याचे ठरवून तिथल्या बसस्थानकावर जाउन मी आणि ती दादा त्या दिवशी निघणा-या बसची आरक्षणेही घेउन आलोत. महाराष्ट्र राज्यात फ़िरताना आरक्षण करून फ़िरण्याचा एक दांडगा अनुभव गाठीशी होताच. पण "कानडाउ विठ्ठलूं" शी अजून पुरती भेट व्हायची होती हे आम्हाला प्रवासाच्या दिवशी कळले.
१०. ठरलेल्या दिवशी आम्ही पंधरा मिनीटे अगोदर गाणगापूरच्या बस स्थानकावर गेलो तर आमची कर्नाटक राज्य परिवहनची तुळजापूरला जाणारी बस तिथे होती फ़क्त तुडूंब भरली होती. आमच्या आरक्षित जागा असूनही कुणीही आम्हाला जागा द्यायला तयार नव्हते. तिथे आरक्षित जागा वगैरे तशी संस्कृतीच रुजलेली नव्हती. बस कंडक्टरनेही जागा मिळवून देण्यास असमर्थता दर्शवल्यावर आम्ही तिकीटे परत करून पुन्हा परतलो. भाषेचाही मोठा प्रश्न होता. आम्ही वाहिलेली शेलकी विशेषणे त्यांना कळत नव्हती. त्यांनीही काही भद्र स्वरूपाचे उद्गार आमच्या बाबतीत काढले असण्याची शक्यता नाही. आम्हाला कळले नाही म्हणून बरे.
११. पुन्हा एकदा टांग्याने धक्के खात गाणगापूर रोड स्टेशन. तिथून पुन्हा एकदा दुपारी निघणा-या मद्रास-मुंबई मेल ने सोलापूर आणि तिथून पंढरपूर.
१२. पंढरपूरची ठळक आठवण म्हणजे विठ्ठलाच्या पायापाशीच उभे राहून बाजार मांडणा-या बडव्यांना ती. दादांनी सुनावले ती. त्यांनी स्वतःच्या तोंडाने अमुक एक रक्कम इथे टाका म्हटले. आम्हाला सर्वांना हा असला प्रकार अनपेक्षित होता. ती. दादांनी असले काही करायला नकार दिला. त्या बडव्याने तिथेच शिव्याश्राप द्यायला सुरूवात केली. "तुम्हाला पुण्य मिळणार नाही" वगैरे भाषा ऐकून मात्र मग ती. दादा भडकलेच. "अरे, मी आणि माझा विठ्ठल काय तो पापपुण्याचा हिशेब बघून घेऊ. तू दलाली करू नकोस." असे त्याला स्पष्ट सुनावून आम्ही बाहेर पडलो. हाच प्रकार इथे अगदी २०१४ पर्यंत सुरू होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या बडव्यांना विठठलापासून दूर करण्याच्या निर्णयाने मला मनापासून आनंद झाला.
१३. पंढरपूरवरून पुण्यापर्यंत. पुण्यात आमचे कौटुंबिक स्नेही श्री. जोशी साहेब यांचेकडे सदाशिव पेठेत उतरलो आणि पी.एम.टी. च्या पुणे दर्शन बसने पुण्यात फ़िरल्याचे आठवतेय.
१४. परतताना पुणे-शेगाव (बहुतेक महाराष्ट्र एक्सप्रेसने) आणि मग शेगाव-मूर्तिजापूर-कारंजा-यवतमाळ-नागपूर असा प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत केलेला प्रवास. फ़ार धूसर आठवतोय. मूर्तिजापूरला श्री शामकाका (ती.दादांचे धाकटे चुलतभाऊ) आणि कारंज्याला श्री अशोककाका (ती. दादांचे थोरले चुलतभाऊ) यांच्याकडला मुक्काम आठवतो.
आता खूप सोयी झाल्यात. रेल्वेची हॊटेल्सची आरक्षणे इंटरनेटवरून सहजगत्या मिळतात पण नातेवाईकांमधला जिव्हाळा आटल्याचे सर्वत्र जाणवते. पूर्वी मुक्कामाचे पाहुणे म्हणजे गृहिणीच्या कपाळावरच्या आठ्या नसत. पाहुण्यांनाही संकोच वाटत नसे. परिस्थिती खूप चांगली नसली तरी आहे त्यात सगळ्यांना स्वीकारून पुढे जायची मनाची तयारी असायची. आता एकमेकांसाठी वेळ, जिव्हाळा उरलेला नाही. कालाय तस्मै नमः. दुसरे काय ?
या सगळ्या पार्श्वभूमीवर मी पण माझी मुलगी चि. मृण्मयी पहिल्या वर्गात असताना २००८ मध्ये असाच एक लांबचा प्रवास करायचा ठरवला. भारतीय रेल्वेचा बराच प्रवास तोवर घडला असला तरी तो केवळ "नागपूर-पुणे-कराड" आणि "नागपूर-मुंबई" या पट्टयातच बहुतांशी होता. नाही म्हणायला २००६ मध्ये उत्तरेला वैष्णोदेवी-हरिद्वार हा प्रवास झाला होता पण नागपूरच्या दक्षिणेला तर बल्लारशाहच्या पलिकडे आपण गेलेलो नाही ही जाणीव वारंवार व्हायला लागली. आपण स्वतःला रेल्वेचे फ़ॆन म्हणवतो आणि चेन्नई, हैद्राबाद, बंगलोर आदी परिसर आपण पाहिला नाही ही जाणीव अस्वस्थ करायला लागली आणि नोव्हेंबर २००८ मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी मी माझ्या कुटुंबासोबत बाहेर पडलो.
(क्रमशः)
No comments:
Post a Comment