आज माझ्या मुलीचा संस्कृत चा प्रथम सत्र परीक्षेचा पेपर होता. पेपरच्या आधी अभ्यास वगैरे घेण्याचे काम आमच्या सौभाग्यवतींकडे असले तरी परतल्यानंतर "पेपर कसा गेला ?" " बघू, कायकाय आलं होतं ते ?" वगैरे विचारपूस करण्याचं पितृकर्तव्य मात्र अस्मादिकांकडे असतं.
तसंच आज तिचा पेपर बघताना मन भूतकाळात ३० वर्षे मागे गेल. सी.पी. ऍण्ड बेरार शाळेत शिकताना आम्हाला श्री. हरीभाउ महावादीवार म्हणून संस्कृतचे उत्तम शिक्षक होते. तेव्हा संस्कृत भाषा प्रचारणी सभा, नागपूर तर्फ़े इयत्ता ५ वी, ६ वी आणि ७ वी साठी संस्कृत परीक्षा घेतल्या जायच्या. (राष्ट्रभाषा प्रचारणी सभा, वर्धा तर्फ़े हिंदीच्या आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फ़े मराठीच्या परीक्षा घेतल्या जायच्यात. आमची गणना स्कॉलर विद्यार्थ्यांमध्ये उगाचच होत असल्याने, या सगळ्या परीक्षा देणं आम्हाला अनिवार्य असायचं) त्या ३ वर्षांमध्ये त्यांनी शिकवलेली सुभाषितमाला मला अजूनही तोंडपाठ येते. इतकं जबरदस्त पाठांतर त्यांनी आम्हा सगळ्यांचच करून घेतलं होतं.
आजही अगदी " अयं निजः परोवेती " पासून म्हणायला सुरूवात केली की आमची गाडी " तपः सर्वं समाप्ययेत " पर्यंत न अडखळता घडाघड म्हणू शकतोय. त्यातलंच एक मजेशीर सुभाषित आज आठवलं. ते सुभाषित आणि त्याचा अर्थ इथे आज सर्व गीर्वाण प्रेमींसाठी देतोय. त्या काळात देवांची ही टिंगल संस्कृत सुभाषितकार करू शकायचेत हे पाहून आश्चर्य वाटेल.
कमले कमला शेते, हरः शेते हिमालये
क्षीराब्धौच हरिः शेते, मन्ये मत्कुण शंकया.
लक्ष्मी कमळात वास करते, हर (शिव) हिमालयात वास करतो, हरी क्षीरसागरात वास करतो म्हणून कवी म्हणतो की यांच्या घरात मत्कुण (ढेकूण) झालेत की काय ? (यांना असे चांगले आपले घर सोडून इकडे तिकडे रहावेसे वाटतेय तर )
यात "मन्ये मत्कुण शंकया" या शब्दाचा इतरही काही अर्थ निघत असल्यास संस्कृतच्या जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
No comments:
Post a Comment