Tuesday, May 3, 2016

चैत्र चाहूल



चैत्र सुरू व्हायचा तोच पुढे येऊ घातलेल्या परीक्षांच्या तयारीसाठी भल्या पहाटे उठण्याच्या उपक्रमाने. पोथी गल्ली, इतवारी नागपूरच्या कुहीकरांच्या वाड्यात तर आम्हाला सदा सर्वकाळ पहाटेच उठावे लागे. कारण पहाटे ४ -.३० ला येणारा वाड्यातल्या ५-६ बि-हाडांमधला एकुलता एक नळ. हा नळ सकाळी ६ वाजण्याच्या आसपास बंद होत असे त्यामुळे नळ जाण्याआधी सगळ्यांच्या आंघोळी उरकून पुन्हा बादल्या वगैरे भांडी दिवसभराच्या वापरासाठी भरून ठेवावी लागत असत. आमच्याकडे उतरणा-या पाहुण्यांनाही या नियमाचे पालन करावेच लागे. पण तरीही पाहुणेमंडळी भरपूर यायचीत आणि प्रेमाने आमच्या घरी सगळ्या गैरसोयी सहन करून रहायचीत. याचे कारण म्हणजे आमच्या दादांचा (वडील) लोकसंग्रह आणि आईचा सोशिक आणि कष्टाळूपणा. आम्हालाही पाहुणे मंडळी येणार म्हटली की कोण आनंद व्हायचा !

पहाटे साडेपाच पावणेसहाच्या सुमारास "बोलो, श्रीराम जयराम जय जय राम" असा विशिष्ट लयीत, मृदंग आणि मोठ्या झाजांवर जप करीत, काही पोक्त मंडळी सुस्नात होऊन, गंध लावून, स्वच्छ शुभ्र धोतर आणि नेहरू सदरा वगैरे घालून घरासमोरच्या रस्त्यावरून जायचीत. तो त्यांचा आवाज, ती लय अजूनही माझ्या कानात आहे. अजूनही स्वच्छ धोतराच्या बाबतीत माझी कल्पना ही त्यांच्या धोतराशीच निगडीत आहे.  पोथी गल्लीच्या तोंडाशी एक मारूती मंदीर होते, त्याला रंगरंगोटी सुरू झालेली असायची. लगबगीने परीक्षेसाठी निघालेली मुले, मॉडेल मिल, एम्प्रेस मिलचे नागपुरात सर्वत्र ऐकू येणारे भोंगे. (आमच्या बालपणी तो भोंगा म्हणजे एक घड्याळ होते. .४० : पहिला भोंगा झाला, चप्पल घाला, बाजूच्या आपल्या सवंगड्यांना शाळेत चलण्याविषयी हाक घाला. .५० : दुसरा भोंगा झाला, लगबग वाढवा, .५५ : तिसरा भोंगा, मित्र येवो अथवा न येवो, घराबाहेर पडा आणि शाळेचा रस्ता धरा.) आम्हाला ते भोंगे आमच्या वेळापत्रकासाठीच आहेत असे वाटायचे. ते भोंगे मिल कामगारांसाठी आहेत हे सत्य आम्हाला फ़ार उशीरा कळाले.

गुढीपाडव्याला घरात नववर्षाचा आनंद आणि त्याच बरोबर परीक्षांची तयारी हे दोन्ही सारख्याच जोषात असायचे. श्रीराम नवमी मात्र खास असायची. बहुतांश वेळा परीक्षा संपलेल्या असायच्या किंवा शेवटचे ड्रॉइंग, इतिहास भुगोल असे सोप्या विषयांचे पेपर्स उरलेले असायचेत. म्हणजे शेवटल्या १८ चेंडूंमध्ये ८ गडी बाकी असताना २ धावा काढणे बाकी असणा-या सोप्या प्रक्रियेसारखे. श्रीराम नवमी निमित्त पोद्दारेश्वर राम मंदीरातून निघून जवळपास अर्ध्या नागपूरला वळसा घालणारी शोभायात्रा हे आमचे अगदी खास आकर्षण असायचे. मग ती यात्रा बघण्यासाठी दादांच्या खांद्यावर बसून, थोडे मोठे झाल्यावर टाचा उंचावत गर्दीत उभे राहून, कधी कुणाच्या दुकानाच्या पुढल्या फ़ळीवरून बघण्याचे आमचे प्रयत्न असत. दरवर्षी जवळपास त्याच झाकी असूनही पायाला आणि पाठीला रग लागेपर्यंत ती शोभायात्रा आम्ही उत्साहात आणि आनंदात बघायचो हे नक्की.

परीक्षा संपली रे संपली की त्याच दिवशी दुपारी दादांच्या शाळेत जाऊन तिथल्या लायब्ररीतून अक्षरशः पोतभर पुस्तके, कादंब-या कथासंग्रह वगैरे आणून पुढल्या दिवसांची बेगमी करण्याच काम आम्ही उत्साहात करीत असू. लायब्ररीयन काकांनाही आमची ही पुस्तके खाण्याची सवय माहिती असल्याने ते आम्हाला आडकाठी करीत नसत. दादांच्या बुक कार्डावर अनलिमीटेड पुस्तके आम्हाला उपलब्ध होत असत. चौथ्या वर्गापर्यंत समग्र पु.ल. आणि व पू वाचून काढलेत. पाचव्या वर्गानंतर मग सुहास शिरवळकरांपासून ते थेट व्यंकटेश माडगूळकरांपर्यंत सगळे लेखक वाचलेत. पु. ल. आणि वपू दरवेळी वाचलेत की गेल्या वेळी वाचताना उलगडा न झालेला एखादा संदर्भ नव्याने उमजायचा आणि पुढल्या वर्षी तेच पुस्तक पुन्हा नव्याने वाचून नवीन संदर्भांचा धांडोळा घेण्याचा बेत पक्का व्हायचा. आजही पु.लं. ची एखादी साहित्यकृती वाचताना एखादा नवीन संदर्भ कळतो. एखादे गाव फ़िरताना त्या गावाविषयी पु.लं. नी काही लिखाण करून ठेवले असेल तर तो मजकूर नव्या अर्थाने कळतो. ते गाव पुलंच्या नजरेने पाहिले जाते. आजही मी पार्ल्याला जातो तो "पार्लेश्वराचे मंदीर, सुभाष रोड, कवडीबुवांचा राम, गल्ल्या रूंद करण्यासाठी न तोडलेला पिंपळ" पाहण्यासाठी जातो. वेड्यासारखाच. वेड लावणारंच चिरंतन लिखाण होत त्यांच. आमचे किती तरी चैत्र त्यांच्यामुळे समृद्ध झालेले आहेत.

आमचा पिंड मुळातच बैठा. मैदानी वगैरे खेळांचा मक्ता आम्ही आमच्या दोन्ही धाकट्या बंधुराजांकडे दिलेला. तरी पण दरवर्षी घराजवळच्या गांधीबागेत जाऊन सूर्यनमस्कार, दंडबैठका काढूच यात अशी आमच्या वाड्यातल्या मुलांमधे टूम निघायची. एक आठवडाभर तसे आम्ही जायचोही. मग "एकेक पान लागले गळावया" सारखे आम्ही काही ना काही कारणांनी अनुपस्थित राहत असू आणि मग तो बेत साहजिकच पुढल्या चैत्रापर्यंत लांबायचा.

चैत्र पौर्णिमेला मात्र मजा असायची. महालातल्या चितार ओळीतल्या दोन दोन हनुमान मंदीरांमध्ये सकाळी सहाला हनुमान जन्म व्हायचा. कीर्तनाला आणि दर्शनाला खूप गर्दी असायची. दादा अगदी उत्साहाने आम्हाला तिथे न्यायचेत. तिथले सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे पळसाच्या पानांच्या द्रोणात प्रसाद म्हणून मिळणारी चण्यांची उसळ. सकाळी सकाळी ती तिखट उसळ खाऊन डोक्यावर आलेला घाम आणि पाणावलेले डोळे पुसले की पूर्ण उन्हाळाभर आम्हाला नागपूर आणि चंद्रपूरचा अगदी कडक उन्हाळा बाधेनासा होई. आज या क्षणीही देशमुख पेंटरसमोरच्या त्या मारूती मंदीरातल्या तिखट उसळीची चव अगदी तश्शीच जिभेवर आहे.

वाड्यात सगळ्यांकडे चैत्रगौरींच्या हळदीकुंकूवांची धूम सुरू व्हायची. आमचे दादा मुळातच कल्पक आणि कष्टाळू असल्याने आमच्याकडल्या गौरींसाठी वाड्यातला आमच्या अंगणाच्या कोप-यात पहाड बनविण्याचे काम सुरू होई. वाड्यातली सगळी लहान मुले आमच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पात गुंतून जात. अगदी खूप आनंदाने आणि निमूटपणे. २-३ दिवसांच्या मेहेनतीनंतर दादांच्या डोक्यातून अशी काही कल्पना आणि हातांतून अशी काही कलाकृती निर्माण होई की तिची आम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ती चैत्रगौरीची सजावट पहायला आजूबाजूच्या बायकाच नाही तर मुले आणि त्यांची वडील मंडळीही यायचीत मग आमची छाती फ़ुगून दुप्पट व्हायची. अगदी टाकाऊ वस्तूंपासून फ़ुकट तयार झालेली ती सुंदर कलाकृती आणि "बाकी, प्रकाशराव म्हणजे हौशी हो !" ही दाद आईलाही सुखावून जायची. मग अशावेळी अंगावर नसलेल्या नवीन साडीची किंवा नसणा-या खूपसा-या दागिन्यांची खंत तिला जाणवतही नसे.

एकदा हे आटोपले की मग तो पहाड दुस-या दिवशीपासून आम्हाला आमचे बस, गाड्या इत्यादी खेळ खेळायला मिळत असे. पण मग वेध लागायचेत ते चंद्रपूरला आजोळी जाण्याचे. कारण आजोळी असणारी मामेभावंड, खूप माया करणारे आजोबा आजी, आपल्या सख्ख्या मुलांपेक्षाही आमच्यावर जास्त प्रेम करणारे मामा मामी. आजोळी होणा-या या लाडांनी, कौतुकाने तो चंद्रपुरी वैशाखवणवा आम्हाला आश्विनातल्या चांदण्यांसारखा भासत असे. चैत्र चाहूल तर गुढीपाडव्यालाच द्यायचा पण चंद्रपुरच्या खेळांमधे, मस्तीमधे कधी संपायचा ते मात्र कळायचे नाही.

4 comments: