गुरूदत्त संप्रदायात परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वतींनी रचलेल्या करूणात्रिपदीचे अनन्यसाधारण महत्व आहे. सायंकालीन कातर वेळेला मनापासून ही प्रार्थना तालासुरात गायली, (दत्त संप्रदायात गायनाचेही महत्व फ़ार आहे. "गायनी आमुची प्रीती" असे श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी सांगून ठेवलेले आहे.) तर मन शांत, स्थिर आणि आश्वस्त व्हायला मदत होते असा सर्वांचा (माझाही) अनुभव आहे. याच करूणात्रिपदीतले "कळवळले ते कळवळो आता" हे मला अत्यंत आवडते.
भगवंत हा अकारण करूणामयी आहे. त्याची करूणा, त्याचा कृपाप्रसाद भक्तांना अकारणच लाभत असतो आणि म्हणूनच प.पू. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी त्या दत्तात्रेयांची करूणा भाकताना त्यांना त्या सगळ्या प्रसंगांची आठवण करून दिलीय की ज्या प्रसंगांमध्ये लेकरू भक्तांसाठी या माऊलीला अकारण पान्हा फ़ुटलेला आहे.
आपण जर श्रीगुरूचरित्र ग्रंथाचा या दृष्टीने सूक्ष्म अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की या पदात वर्णन केलेल्या सगळ्या प्रसंगात श्री दत्तात्रेयांचे मन अकारण कळवळले आहे. श्रीपादश्रीवल्लभांच्या दर्शनाला निघालेला तो व्यापारी काय (चोरे द्विजासी मारिता मन जे), पोटशुळाने व्यथित झालेला बासर क्षेत्राचा ब्राम्हण काय (पोटशुळाने द्विज तडफ़डता), पुत्रशोकाने व्याकुळ झालेली ती द्विजस्त्री काय (द्विजसुत मरता वळले ते मन) किंवा नव-याच्या अकाली मृत्यूने व्यथित झालेली ती तरूणी काय (सतीपती मरता वळले ते मन) ? या सगळ्यांना श्री दत्तात्रेयकृपेचा निधी हा अकारणच प्राप्त झालेला आहे. केवळ श्रीदत्तात्रेयांचे मन कळवळले म्हणून त्यांनी या सगळ्या प्रसंगात कृपा केलेली आपल्याला दिसतेय. अशीच कृपा आपल्याला प्राप्त व्हावी, तुमचे मन असेच आमच्यासाठीही कळवळू द्या अशी प्रार्थना करूणात्रिपदीतून प.पू. वासुदेवानंद सरस्वतींनी भगवंताजवळ आर्ततेने केलेली आपल्याला आढळते.
आपल्यात ती आर्तता आहे का ? की आपण फ़ार कोरडे झालोत ? याचा विचार करता आपल्या लक्षात येत की आज आपण स्वतःला धार्मिक म्हणवून घेतो आणि सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळताहेत हा आपला हक्कच आहे असे समजतो. त्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळण्यामागे आपले सदगुरू, आपले आईबाप, आपला समाज आहे ही कृतज्ञतेची भावना आपण विसरूनच जातो. अशावेळी ओशोंच्या प्रवचनातला एक दृष्टांत आठवतो. ते म्हणतात "आपण आत्ता याठिकाणी बसलोय आणि आपल्यामागील भिंत भूकंपामुळे पडत नाही हाच अपघात आहे." आपल्याला अपघाताने, चांगल्या गोष्टी, चांगले आयुष्य मिळालेय ही भावना जीवनाच्या क्षणभंगुरतेला अधिक दृढ बनविते आणि आपल्याला माणुसकी जपण्याच्या अधिक जवळ आणते. केवळ सदगुरूंची, भगवंताची कृपा आहे म्हणून आपण आज जे आहोत तसे आहोत ही भावना परमेश्वराजवळ जाण्यास अधिक पात्र बनविते.
एक आणखी कथा आठवते. एका मनुष्याला त्याच्या स्वप्नात त्याचा आणि भगवंताचा संवाद घडतो. भगवंत त्याचा संपूर्ण जीवनपट एका किना-याकाठी दाखवताना तो बघतो. त्याच्या बालपणापासून ब-या वाईट प्रसंगांचे त्या किना-यावर प्रतिबिंब पडलेले तो बघतो. सूक्ष्मावलोकन करताना त्याच्या असे लक्षात येते की काही वेळेला त्या किना-यावरील वाळूत चार पावले उमटली आहेत तर काही अंतरावर फ़क्त दोनच पाऊले उमटलीयत. चार पावलांचे स्पष्टीकरण तो भगवंताला विचारतो तेव्हा भगवंत सांगतो की बाबारे ती माझी आणि तुझी अशी चार पावले आहेत. अधिक थोड्या सूक्ष्मावलोकनानंतर त्याच्या लक्षात येत की त्याच्या जीवनाच्या आनंदी काळात त्या वाळूवर चार पावले उमटली आहेत तर दुःखी आणि परीक्षेच्या काळात त्या वाळूवर फ़क्त दोनच पावले उमटलीयत.
प्रचंड खिन्न होऊन तो भगवंताला विचारतो, "देवा, माझ्या कठीण काळात मला सगळ्यांनी सोडून दिलय हे मला माहिती होत. पण अशा वेळी तू सुद्धा मला सोडून गेलास ना ?"
भगवंत उत्तरतो, "बाळा, नीट बघ. तुझ्या चांगल्या काळात तू आणि मी बाजुबाजूने मिळून चाललोय आणि तुझ्या कठीण काळात मी तुला कडेवर उचलून घेतलंय. ती उमटलेली पावले फ़क्त माझी आहेत."
तुकोबारायांच्या "चालविसी हाती धरोनिया" ची आठवण झाली की नाही ?
म्हणून संपूर्ण शरणागतीसाठी, "आपण काही विशेष साधना करू मग तो आपल्यावर प्रसन्न होईल आणि साधनेचे फ़ळ देईल" हा अहंकार चुकीचा आहे. आपण आपली कर्तव्यकर्मे करतच राहून त्याच्या अकारण कळवळ्याची वाट बघितली पाहिजे. त्याला आठवण व्हावी म्हणून "कळवळले ते कळवळो आता." ही प्रार्थना.