पौष महिन्याचा प्रत्येक रविवार मला माझ्या बालपणात ४० वर्षे मागे घेऊन जातो. कुहीकर वाड्यातले आमचे दिवस आठवतात. पौष महिन्यात दर रविवारी सुवासिनी सकाळी पाटांवर रांगोळ्या काढून (त्याला नारायणबुवा म्हणायचे. रांगोळ्याही विशिष्ट थेंबाथेंबाच्या असायच्यात.) त्या पाटांवर नारायणबुवासोबतच्या त्यांच्या राणुबाईसाठी हळदी कुंकू, आरसा, कंगवा इत्यादी साहित्यही असायचे. त्याच पाटावर या काळात विपुलतेने उपलब्ध होणा-या वालाच्या शेंगा, बोरे असला खाऊ पण असायचा. दिवसभर हा पाट अंगणात असायचा आणि संध्याकाळच्या आत आपापल्या घरात परत जायचा.
दर पुषाइतवारी घरोघर गोड पदार्थ व्हायचे. बहुतेक खीरच. दुपारी एखाद्या घरी, किंवा खूप थंडी असेल तर वाड्यातल्या अंगणात खाटा आणून टाकून त्यात कुहीकर आजी पुषाइतवाराची गोष्ट सांगायच्या. भर दुपारी थंडी मी म्हणत असताना, बोच-या वा-यांपासून संरक्षणापासून एखाद्या गोधडीच्या उबेत आईच्या, आजीच्या मांडीवर पडून राहून या गोष्टी ऐकायला फ़ार मजा यायची. सगळ्या गोष्टींमध्ये "बारा रेषांचे कमळ आणि अठरा रेषांचे मंडळ" काढणारी एखादी साध्वी स्त्री असे. तिच्यावर येणारी संकटे असत आणि मग नारायणबुवांना (श्रीसूर्यनारायणाला) "नारायणबुवा या" म्हणत घातलेली आर्त हाक असायची मग नारायणबुवा आणि राणुबाई धावून त्या कुटुंबाचे दुःख दूर करायचेत. थोड्याफ़ार फ़रकाने सगळ्या गोष्टी अशाच धाटणीच्या. खूप मौज वाटायची. ती बालपणीची गोधडीची ऊब आज पंचतारांकित हॉटेल्समधल्या अतिशय मऊ मुलायम ब्लॅंकेटसमध्ये येत नाही हे सत्य आहे.
लग्न झाल्यानंतर आम्ही मुंबई, नागपूर, सांगोला, शिरपूर आणि पुन्हा आता नागपूर असा प्रवास केला. बालपणीच्या रम्य आठवणींचा हा वारसा जपायचा म्हणून सौभाग्यवतीकडे आग्रह करून आजही मी पुषाइतवार साग्रसंगीत साजरा करतो. ती पण मोठ्या उत्साहाने सगळं करते.
आमच्याकडे या रविवारी काढलेले नारायणबुवा.
आज जरा खोलवर विचार केल्यानंतर या प्रथेतला अर्थ कळतोय. पौष महिन्यात थंडीचा अगदी कडाका असतो. यावेळी त्या सकल सृष्टीच्या पोषणकर्त्या सूर्यनारायणाचा उत्सव साजरा करणे हे एक प्रकारचे कृतज्ञता प्रदर्शनच असेल, नाही का ? फ़ार वर्षांपूर्वीच या पाटांवर ठेवलेल्या आरशापासून सूर्याची अक्षय्य ऊर्जा परावर्तित करून आपण आपल्या दैनंदिन उपयोगासाठी वापर करू शकतो याची कल्पनाही कदाचित कुण्या कल्पक संशोधकाला आलीही असेल. (रथसप्तमीला सौर उर्जेवर तयार केलेला खिरीचा नैवेद्य आपण करतोच की. त्याचे उगमस्थान अश्या प्रथांमध्येच असले पाहिजे.) आज आधुनिक वैद्यकानेही सूर्यकिरणरूपी व्हिटॅमीन डी आपल्याला मिळणे किती आवश्यक आहे याचे प्रतिपादन केलेलेच आहे की.
"जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरूनी टाका" असे जरी आधुनिक युगातले नव्या मनुचे शिपाई कवी म्हणत असलेत तरी अशा जुना प्रथांचा थोडा खोलवर आणि गांभीर्याने विचार करून त्यातला खरा अर्थ समजून घेण्यात खरी मौज आहे, नाही का ?
बालपणीचा काळ सुखाचा
ReplyDelete