उदो + अस्तू मिळून उदोस्तू होतं, उदयोस्तू नाही. जगदंबेचा उदो असो. ("उदे गं अंबे उदे" किंवा "उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा" ह्या वाक्यरचना लक्षात घ्यावात.) आजकाल जगदंबेचा "उदयोस्तू" असे ब-याच ठिकाणी ऐकायला / वाचायला आले म्हणून लिहीले. उदयोस्तू चा विग्रह उदय + अस्तू असा होईल. जगदंबेचा उदय असो असा त्याचा अर्थ होईल आणि ते विसंगत ठरेल. त्या जगज्जननीचा उदय हा सकल देवांच्या प्रार्थनेने सृष्टीच्या प्रारंभीच झालेला आहे. त्यामुळे आपण भक्त मंडळींनी तिचा जयजयकार असो = उदो असो या अर्थाने "उदोस्तू" हाच उच्चार बरोबर आहे.
तसेच "ॐ नमो भगवते वासुदेवाय" किंवा "ॐ नमो नारायणाय" किंवा "ॐ नमः शिवाय" या सगळ्या मंत्रांमध्ये त्या त्या देवांना नमो या शब्दाद्वारे वंदन आलेले आहे. त्यात पुन्हा "ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः" किंवा "ॐ नमो नारायणाय नमः" असे आपल्या मताने करणे योग्य नाही. दोनवेळा वंदन केल्याने मूळचाच दयाळू असलेला देव रागावत नाही हे जरी खरे असले तरी मंत्रांच्या विशिष्ट शब्दरचनेमागे आपल्या ऋषीमुनींचा एक अत्यंत शास्त्रीय आणि जगकल्याणाचा दृष्टीकोन होता हे लक्षात घेता एखाद्या मंत्राची सिद्धी ही मूळ मंत्र उच्चारणानेच होईल हे सुद्धा लक्षातच ठेवले पाहिजे. "मननात त्रायते इति मंत्रः" (ज्याचे मनन केल्याने तारतो तो मंत्र) हे आपण भाविक मंडळींनी लक्षात ठेवून त्यानुसार उच्चारण करावे ही साधी अपेक्षा.
- साधनात शुद्धतेचा आग्रह धरणारा एक साधक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment