Saturday, November 30, 2024

रांगेचा फ़ायदा सर्वांना पण अनावश्यक रांगांचा अट्टाहास कुणाचा ?

सगळ्या सुपर मार्केटस मध्ये आणि सगळ्या पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या गरजेपेक्षा एक काऊंटर कमी सुरू ठेवून जर ग्राहकांना उगाचच रांगेत ताटकळत ठेवण्याचा कायदा असेल तर तो देशव्यापी चळवळ करून मोडून काढला पाहिजे.

आत्ताचीच गोष्ट. जवळच्या रिलायन्स मार्ट मध्ये गेलो होतो. मोजून ४ ग्राहक. एरवी इथे ३ - ४ काऊंटर्स सुरू असतात. पण आता ४च ग्राहक म्हटल्यावर इतर ३ काऊंटर्सवरची कामगार मंडळी काऊंटर सोडून इतरत्र टाईमपास करीत खिदळत बसली होती. आणि एकुलत्या एक काऊंटरसमोर रांग लागलेली.
एकदा मी सकाळी सकाळी ७ वाजता, हेच रिलायन्स मार्ट उघडल्या उघडल्या, तिथे गेलो होतो. खरेतर एवढ्या सकाळी मी एकटाच ग्राहक तिथे होतो. पण खरेदी झाल्यावर काऊंटरपाशी येतो तोच काऊंटरवर कुणीच नव्हतं. तोवर दुसरी एक दोन गिर्हाईके तिथे आली. त्यांचीही छोटीशी खरेदी आटोपली आणि काऊंटरवर दोघा तिघांची रांग होतेय असे पाहूनच तिथले एक काऊंटर सुरू झाले.
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातल्या माझ्या भटकंतीत सगळ्याच कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर अगदी हाच अनुभव मला आलेला आहे. आपले ग्राहक असे रांगेत ताटकळत बसल्याशिवाय त्यांच्या सहनशक्तीची वाढच होणार नाही अशीच या सगळ्या सुपर मार्केट वाल्यांची आणि पेट्रोल पंप कंपन्यांची समजूत दिसते.
सुपर मार्केट वाल्यांचे ठीक आहे. रांगेत ताटकळत असलेला ग्राहक इकडेतिकडे बघून कधीकधी फारशी आवश्यक नसलेली एखादी वस्तू खरेदी करूही शकतो. पण पेट्रोल पंपाच्या रांगेत ताटकळणार्या ग्राहकांचे काय ? पेट्रोलच्या रांगेत ताटकळणार्या एखाद्या गाडीवाल्याने वाट बघता बघता शेजारच्या डिझेल पंपावरून उगाच आपले ५ लीटर डिझेल खरेदी केलेय किंवा उगाचच तिथला सी एन जी गॅस आपल्या पेट्रोलच्या टँकमध्ये टाकलाय असे दृश्य मी तरी अजून बघितलेले नाही.
"ग्राहक राजा आहे. त्याला पटकन सेवा प्रदान करायला हवी" हा दृष्टीकोन फक्त कागदावरच उरलेला आहे. "रांगेचा फायदा सर्वांना" हाच कायदा समस्त सुपर मार्केटवाले आणि पेट्रोल पंप वाले अवलंबतात हेच खरे.
- अनावश्यक असताना कायम ताटकळावे लागल्याने वैतागलेला एक ग्राहक राजा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.