Showing posts with label परम पूजनीय गोंदवलेकर महाराज. Show all posts
Showing posts with label परम पूजनीय गोंदवलेकर महाराज. Show all posts

Saturday, December 23, 2023

नामाचा अनुभव नामच

परम पूजनीय गोंदवलेकर महाराज म्हणतात "नाम घेत रहा. नामावर निष्ठा ठेऊन नाम घेत चला. त्याचा अनुभव वगैरे मागू नका."


एखाद्या बसने किंवा रेल्वेने प्रवास करताना आपण त्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवतोच ना ? त्या ड्रायव्हरला आपण गाडी चालवून गंतव्य स्थळाला पोहोचवून दाखवण्याचा अनुभव मागीत नाही. त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्या गाडीत बसतो आणि गंतव्याला पोहोचतो. आपण गंतव्याला पोहोचलो हाच आपला अनुभव.


मग एखाद्या ड्रायव्हरवर जेवढा आपण विश्वास ठेवतो तेवढातरी विश्वास आपल्या संतांवर ठेऊयात का ? ते स्वतः नाम घेऊन आपल्या गंतव्याला (परमेश्वरप्राप्तीला) गेलेत ना ? मग आपणही त्यांच्यावर विश्वास ठेऊन जर नाम घेतले तर आपणही आपल्या जीवनात प्राप्त करून घेण्याची सर्वोच्च वस्तू मिळवूच ना. पण आपण आजकालच्या आधुनिक, भौतिक जगात इतके गुरफ़टलेले आहोत की नामाचा अनुभव आल्याशिवाय आम्ही नाम घेणार नाही हा हट्ट करीत रहातो. आणि नाम घेत नाही.



बरे आपल्याला नाम घेऊन काय साधायचे असते ? हे जर आपण पाहिले तर आपल्याला खूप आश्चर्य वाटेल आणि ख-या आध्यात्मिक माणसाला स्वतःची लाजही वाटेल. या जगात आपल्याला आपण घेत असलेल्या नामाने, आपले भौतिक जगातले अगदी क्षुद्र, प्रयत्नसाध्य काम करावे ही अपेक्षा असते. 


वास्तविक नाम हे साधन आहे आणि नाम हेच साध्यही आहे. जीवनात आपल्याला नाम साधले पाहिजे. नाम हेच आपले अंतिम ध्येय असले पाहिजे. मला नामाशिवाय काहीही नकोय ही भावना ज्या साधकाची झाली त्याने हे लौकिक जीवन जिंकले आणि तसा भौतिक जगाचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की नाम हे साधन अगदी सोपे, कुठलेही बाह्य उपचार रहित आणि सर्वांना साधण्याजोगे आहे. हे साधन साधण्याला वयाची, पैशाची, हुद्द्याची, कुठल्याही विशेष बुद्धीमत्तेची गरज नाही. पण नाम हे साध्य अतिशय कठीण आहे. आयुष्यभर नाम घेतले आणि आयुष्याच्या अखेरच्या क्षणी नाम नाही आले तर ? ही जाणीव कुठल्याही सदभक्ताच्या काळजाचा थरकाप उडविणारी आहे. नाम साधणे म्हणजे कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही क्षणी नामच आपल्याला स्मरणे होय. मग ती आयुष्यातली सुखदुःख असोत किंवा आयुष्याच्या अखेरच्या क्षणी प्रत्यक्ष यमधर्म आपल्या समोर उभा असो. नाम साधणे म्हणजे अखेरच्या क्षणीही नामच मुखात असणे. 


नाम हेच साधन आणि नाम हेच साध्य. म्हणजे नामस्मरणाचा कुठला अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या मुखात नाम येतेय, आपल्याला नामाचे प्रेम वाटतेय हाच आहे. अहो, आज जगात इतर मंडळी सगळ्या अनुभवांच्या मागे लागलेली आहेत. आपल्याला नामाचा अनुभव यावा असे वाटणारी मंडळी एकूणच विरळा. आपल्याला अधिकाधिक नाम घावेसे वाटते हा आजवर घेतलेल्या नामाचाच अनुभव आहे असे आपल्याला वाटत नाही का ?


- मोक्षदा एकादशी (मार्गशीर्ष शुद्ध एकादशी) शके १९४५ चे सायंकालीन चिंतन.