Showing posts with label बोलगाणी. Show all posts
Showing posts with label बोलगाणी. Show all posts

Saturday, August 13, 2022

"बोलगाणी"च्या प्रभावाची कविता.

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे शिकत असताना खूप गुणी मित्रमंडळींचा सहवास लाभला. त्याकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा तर ९० % च्या वर गुण १२ वीच्या परिक्षेत मिळवावे लागत. इथे येणारी मुले बुद्धीमत्तेने तर हुशार असतच पण इतरही अनेक क्षेत्रात त्यांना चांगली गती असे. वक्तृत्व, गायन, काव्य, अभिनय,, मैदाने खेळ, बैठे खेळ या क्षेत्रात खूप आघाडीवर असणारी मंडळी आमची सहाध्यायी होती. त्या त्या क्षेत्रात त्यांचे इतके प्रावीण्य होते की त्यांच्यापैकी कुणीही अभियंता न होता त्या त्या क्षेत्रात आपापले करीयर सहज करू शकले असते. 


आम्ही तृतीय वर्षात असताना प्रथम वर्षाच्या शारदा गाडगीळ (आता सौ. शारदा सतीश तानवडे) ची ओळखी झाली आणि दोघांमधल्या समान साहित्यप्रेमाच्या धाग्यामुळे आम्ही मित्र झालोत. तोवर आमच्या गृपमध्ये सतीश तानवडेसारखा उत्तम गायम, विश्वास सुतार, सुधीर गोखले, विजय कुलकर्णी सारखे उत्तम लेखक आणि कवी होते. आता या प्रथम वर्षाच्या मुली आमच्या गृपमध्ये सामील झाल्यात. शारदाच्या घरी तिच्या वडीलांचे कोल्हापुरात पुस्तकांचे दुकान होते. मौज प्रकाशनाची सगळी पुस्तके कोल्हापुरात पहिल्यांदा त्यांच्याकडेच उपलब्ध व्हायचीत. आणि शारदा त्यातले एखादे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक एखाद्या सुटीत घरी गेली असताना तिथून आणायची आणि आम्हाला वाचायला द्यायची. 


{अर्थात आमच्या वाचनसवयी तिला चांगल्या ठाऊक होत्या म्हणून. वाचनखूण साठवायची म्हणून पुस्तकांचे कोपरे दुमडणे, त्यावर पेन्सील, पेनाने नोटस लिहिणे, त्यावर शाई, खाण्याचे पदार्थ यांची सांडलवंड करणे ह्या सगळ्या प्रकाराची मला विलक्षण चीड आहे. प्रत्येक पुस्तक हे धार्मिक पोथीच्याच पवित्रतेने सांभाळले पाहिजे, जपले पाहिजे यावर माझी श्रद्धा आहे. आज घरी जवळपास १००० पुस्तकांचा संग्रह आहे पण सगळी कशी गेल्या आठवड्यात घेतल्यासारखी नवीन आहेत. आणि माझ्या या व्यवस्थितपणाचा मला अभिमान आहे. सुरूवातीला भीडेखातर मी माझ्या संग्रहातली पुस्तके मित्र / नातेवाईकांना देत होतो पण एकतर ती परत कधी यायचीच नाहीत (प्राचार्य राम शेवाळकरांचे आत्मचरित्र "पाणियावरी मकरी" मी तीन वेळा विकत घेतलय. पहिल्या दोन वेळा ज्यांनी माझ्याकडून नेलय ती मंडळी आता सोयीस्कर रित्या विसरलेली आहेत. त्यांच्या घरी गेल्यावर माझे पुस्तक मला दिसते पण आता ते माझे आहे याच्यावर माझाच विश्वास नाही.)  आणि परत आली तरी त्यात मला चीड आणणा-या उपरोल्लिखित गोष्टींसह परतायचीत. आता कुणालाही माझ्या संग्रहातली पुस्तके देण्याच्या बाबतीत मी भीड सोडून बोलतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संग्रह टिकलाय.}


मला वाटत १९९१ च्या डिसेंबरमध्ये अशाच एका सुटीत घरी जाऊन आल्यानंतर शारदाने माझ्या हातात मंगेश पाडगावकरांचा "बोलगाणी" हा अप्रतिम कवितासंग्रह ठेवला. तत्पूर्वी शालेय जीवनात पाडगावकरांचा "जिप्सी" हा कवितासंग्रह वाचनात आलेला होता. पण त्यातली रूपके कळण्याइतके आम्ही तेव्हा प्रगल्भ नव्हतो त्यामुळे तो कवितासंग्रह आम्ही वाच्यार्थाने घेतला होता आणि त्यात फ़ारसे गमक आम्हाला वाटले नव्हते. कॉलेजमध्ये असताना "जिप्सी" पुन्हा वाचला आणि त्यातला अर्थ अधिक प्रगल्भतेने उलगडला. एकतर वयाच्या विशी पंचविशीत थोडेफ़ार साम्यवाद, समाजवाद, अन्यायाविरूद्ध चीड, जुनी व्यवस्था मोडून नवी व्यवस्था उभारण्याचा आदर्शवाद याच्याकडे तरूण मने झुकलेली असतातच. पाडगावकर तसेच लिहायचेत. म्हणून त्यांचा "जिप्सी" तेव्हा खूप भावला.


पण १९९० मध्ये प्रकाशित झालेला "बोलगाणी" हा कवितासंग्रह खूप वेगळा होता. (तोपर्यंत स्वतः पाडगावकरांच्याही विचारांमध्ये समाजवाद, साम्यवाद, आदर्शवाद यापासून थोडी उत्क्रांती झालेली असेल, कुणी सांगाव ?) त्यातले "प्रेम म्हणजे प्रेम असतं", "सांगा कसें जागायचं", "तिनं लाजून होय म्हटलं", "यात काही पाप नाही" सारख्या कविता तरूण मनांना प्रचंड सका्रात्मकतेच्या आणि म्हणूनच मनाला थेट साद घालणा-या वाटल्यात. या कवितासंग्रहाची असंख्य पारायणे झालीत. त्यातल्या ब-याचशा कविता पाठही झाल्यात, त्यांचे अनेक खाजगी व सार्वजनिक मैफ़िलींमध्ये सादरीकरणही झाले. थोडक्यात "बोलगाणी"च्या प्रचंड प्रभावात आम्ही ती दोन तीन वर्षे होतो.




आमच्या महाविद्यालयात आमचा एक कवींचाही ग्रुप होता. सगळी मंडळी आपापल्या कविता तिथे सादर करायचीत. त्यावर सगळी मंडळी आपापली प्रांजळ मते व्यक्त करायचीत. वाईट कवितांचे आयुष्य तिथेच संपायचे तर चांगल्या कविता उचलून धरल्या जायच्यात, वाखाणल्या जायच्यात. 


त्याच कालावधीत मी केलेली ही एक कविता. "बोलगाणी"तल्या शब्दरचनेचा, विचारांचा प्रचंड प्रभाव यावर आहे हे माझे मलाच मान्य आहे. किंबहुना आजही मला त्याचा अभिमानच आहे.


तुमचे काय होणार ?


श्रावण म्हणजे बेलफ़ुलांचे भांडार ?

की नेहमीचा आपला सर्दीचा आजार ?


पहिलं बरोबर ?; तुम्ही हिरवे आहात

दुसरं बरोबर ?; तुम्ही गळून पडणार.


समर्थनार्थ तुम्ही म्हणणार की व्यक्ती तितक्या प्रकृती, 

हीच आपली खरी संस्कृती 

अहो पण ही तर झाली विकृती.


शिकाल जेव्हा तुम्ही

स्वतःचे व्यक्तित्व विसरून

दुस-याच्या व्यक्तित्वात डोकावून

तेव्हाच होईल खरी जागृती.


आता ही जागृती खरी ?

की तुमची विकृती खरी ?


पहिलं बरोबर ?; तुम्ही हिरवे आहात

दुसरं बरोबर ?; तुम्ही गळून पडणार.


आषाढातल्या धबधबणा-या धारा

अंगावर घेत तुम्ही कधी नाचला नाहीत.

त्यानंतरच्या सर्दीच्या भितीने

आनंदामागे धावलाच नाहीत.


तुम्ही आपले बंगल्यात

मऊ दुलईत आणि दाट आनंदात.

कुडकुडणारं जग तुम्हाला कळणार तरी कसं ?

सांजावणारं नभ तुम्हाला दिसणार तरी कसं ?

फ़ाटक्या कपड्यातून बोचणा-या थंडीच दुःख तुम्हाला जाणवणार तरी कसं ?

घामाचे जेवण तुमची भूक भागवणार तरी कसं ?


आता हे घामाचे जेवण खरं ?

की दुलईतलं सुख खरं ?


पहिलं बरोबर ?; तुम्ही हिरवे आहात

दुसरं बरोबर ?; तुम्ही गळून पडणार.


तसं प्रत्येकच जगत असतो

जीवनात सुख मिळवायला.

काट्याकुट्यांचा मार्ग टाळून

फ़ुलांच्या पायघड्यांवर चालायला.

सुख हे सुद्धा सापेक्ष असतं

कधी मोटारीत बंगल्यात

तर कधी देशासाठी मरण्यात असतं.

कधी कधी प्रेमात

तर कधी प्रेमभंगातही असतं.


आता हे प्रेमातलं सुख खरं ?

की प्रेमभंगातलं सुख खरं ?


पहिलं बरोबर ?; तुम्ही हिरवे आहात

दुसरं बरोबर ?; तुम्ही गळून पडणार.


- राम प्रकाश किन्हीकर, 

तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी, 

२८/०५/१९९२